दापोली (रत्नागिरी) - महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिल्लीच्या शहेनशाहसमोर नतमस्तक होणारा नसेल, यासाठी शिवसेनेला विजयी करण्याचे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दापोली येथील प्रचारसभेत केले. सुर्यकांत दळवी यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते.
कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा...
काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसने तुमची पिढी बरबाद केली आहे. आता जर तुमच्या मुला-बाळांचे भविष्य अंधकारमय करायचे असले तर पुन्हा त्यांना निवडून द्या, असा उपरोधीक सल्ला उद्धव ठाकरेंनी यावेळी कोकणातील जनतेला दिला. त्याच वेळी त्यांनी भाजपला मतदान केले तर, छत्रपती शिवाजी महाराजही डोक्याला हात लावून म्हणतील, अरे, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा... असा टोला त्यांनी भाजपला लगावला.
महाराष्ट्राच्या भल्यासाठी, दिल्लीश्वरांपुढे ताठ मानेने उभा राहाणारा मुख्यमंत्री निवडण्यासाठी शिवसेनेला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. उद्धव ठाकरे म्हणाले, 'शिवाजी महाराज कधीच दिल्लीश्वरांपुढे झुकले नव्हते. शिवसेना देखील कधीच, कोणत्याही शहेनशाहपुढे झुकणार नाही.'
उद्धव ठाकरे मुंबईत मोठी घोषणा करणार
प्रचाराचा उद्या शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज प्रचाराचा आज सुपर संडे आहे. कोकणातील सभा आटोपून उद्धव ठाकरे आज बांद्रा-कुर्ला कॉम्पलॅक्स येथे जाहीर सभा घेणार आहेत. या सभेत ते मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्या या सभेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.