आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivsena MLA Pradip Jaiswal And Sanjay Shirsath File Nomination In Aurangabad

औरंगाबाद : शिवेसेनेचे जैस्वाल - शिरसाठ, MIMचे गाडे - इम्तियाज जलील रिंगणात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांची युती होते, की तुटते हे अजूनही स्पष्ट झाले नसतानाच पितृपक्ष संपल्यानंतर गुरुवारी अनेक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. औरंगाबाद मध्य मधून विद्यामान आमदार प्रदीप जैस्वाल आणि औरंगाबाद पश्चिममधून संजय शिरसाठ यांनी शिवसेनेकडून उमेदवारी दाखल केली आहे. तर, ऑल इंडिया मजलीस इत्तेहादूल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाकडून पँथर रिपब्लिकन पार्टीचे नेते गंगाधर गाडे यांनी पश्चिममधून तर इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद मध्यमधून उमेदेवारी अर्ज दाखल केला आहे. औरंगाबाद पूर्वमधून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे डॉ. भालचंद्र कांगो यांनी मिरवणूक काढून अर्ज दाखल केला. शहराच्या विविध भागातून मिरवणूक काढून उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे आज (गुरुवार) औरंगाबादमध्ये निवडणुकीची वातवरण निर्मीती झाली आहे.
विधानसभा निवडणूक जाहीर होऊन आठ दिवस झाले आहेत. काही अपक्ष सोडले तर, मोठ्या पक्षाच्या एकाही उमेदवाराने बुधवारपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केले नव्हते. बुधवारी पितृपक्षाची समाप्ती झाली आणि सेना-भाजप युती टिकते की फुटते हे देखील निश्चित होत नसल्याने शिवसेनेच्या औरंगाबादमधील विद्यमान आमदारांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले. औरंगाबाद मध्यमधून प्रदीप जैस्वाल तर पश्चिममधून संजय शिरसाठ यांनी उमेदवारी अर्ज भरला. क्रांतीचौक येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन शिवसेनेने शहरातून मिरवणूक काढली आणि त्यानंतर अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी शिवसेनेने मोठे शक्ती प्रदर्शन केले. शिवसेनेच्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज भरताना सगळीकडे भगवे झेंडे आणि कार्यकर्त्यांच्या गळ्यात शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हांकीत असलेले उपरणे होते. निळे झेंडेही काही कार्यकर्त्यांच्या हातात दिसत होते, मात्र भाजपचा एकही झेंडा या मिरवणुकीत दिसला नाही. त्यामुळे युती तुटली का, अशी चर्चा मिरवणूक मार्गावर सुरु होती.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार डॉ. भालचंद्र कांगो यांनी औरंगाबाद पूर्व मधून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी सिडको मधील कामगार चौकापासून शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयापर्यंत मिरवणूक काढून अर्ज दाखल केला.

आघाडीचे तळ्यात-मळ्यात
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीचेही तळ्यात-मळ्यात सुरु आहे. आघाडी होणार की नाही हे जाहीर करण्याआधीच काँग्रेसने त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. औरंगाबाद पूर्व मधून विद्यमान आमदारा आणि राज्याचे शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, पश्चिममधून जितेंद्र देहाडे, फुलंब्रीमधून आमदार कल्याण काळे, सिल्लोड- अब्दुल सत्तार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ते उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.
शिवसेना- भाजप आणि मित्रपक्षांची महायुती तुटली तर ते स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची रणनीती आखत आहेत. काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचीही अशीच रणनीती आहे. 27 सप्टेंबर (शनिवार) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. शुक्रवारीच महत्त्वाच्या पक्षांचे उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करतील अशी शक्यता आहे.