आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाटील व दोन देशमुख यांच्यात तिरंगी लढत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगोला - सांगोला विधानसभा मतदारसंघात नऊ मतदारांनी माघार घेतली असून, १५ उमेदवार नशीब आजमावणार आहेत. सांगोल्यात राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार दिलेला नाही. शेकापचे आमदार गणपतराव देशमुख, भाजपचे श्रीकांत देशमुख, काँग्रेसचे जगदीश बाबर, शिवसेनेचे शहाजी पाटील यांच्यातच खरी लढत रंगणार आहे. गेल्या तीन विधानसभेत गणपतराव देशमुखांचे कपबशी चिन्ह अपक्ष उमेदवार लक्ष्मण हाके यांना मिळाले आहे. त्याचा फटका देशमुखांना बसण्याची शक्यता आहे.
गणपतराव देशमुख यांना प्रथमच अपक्ष उमेदवार संभाजी आलदर, लक्ष्मण हाके, नवनाथ मदने, नामदेव लवटे, मोहन राऊत, तुकाराम शेंडगे यांच्यामुळे मत विभागणीचा फटका बसण्याची शक्यता आहे. तर चार प्रमुख पक्षांना विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे.
तालुक्यात या वेळीही पाणी प्रश्नावर निवडणुका गाजणार आहेत. प्रमुख लढत गणपतराव देशमुख व श्रीकांत देशमुख यांच्यात होईल अशीच चर्चा आहे. गतवेळीपेक्षा या वेळी उमेदवारांची संख्या जास्त आहे. प्रचारात आमदार देशमुख, श्रीकांत देशमुख, जगदीश बाबर, अपक्ष लक्ष्मण हाके, मोहन राऊत यांनी आघाडी घेतली आहे. मच्छिंद्र पाटील, सचिन घाडगे हे मराठा समाजाचे असल्याने त्यांच्या मत विभागणीचा फटका श्रीकांत देशमुख, जगदीश बाबर, शहाजी पाटील यांना बसणार आहे. बसपचे मिलिंद बनसोडे व परमेश्वर गेजगे यांना मागासवर्गीयांचे मते मिळण्याचा फायदा होईल. त्यांचा फटका इतर प्रमुख उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे. बहुजन मुक्ती पार्टीचे कमरुद्दीन काझी यांना मुस्लिम मतदार किती प्रमाणावर आकर्षित करता येतात. त्यावर इतर प्रमुख पक्षाचे भवितव्य अवलंबून आहे. या वेळी वाढलेले उमेदवार मोदींचा व भाजपचा करिष्मा यामुळे निवडणुकीमध्ये चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. जातीपातीच्या राजकारणाला मतदार थारा देत नाहीत, हे लोकसभेतील मतदानावरून स्पष्ट झाले आहे.

रिपाइंचे सूरज बनसोडे यांना भाजपच्या स्थानिक नेत्यांनी अर्ज काढण्याची विनंती केली होती. शंकर सरगर काँग्रेसकडून इच्छुक होते. त्यांची मनधरणी करण्यात शेकापच्या मंडळींना यश आले.

यांनी घेतली माघार
रेखा पाटील यांनी पूरक अपक्ष अर्ज भरला होता. तो त्यांनी काढून घेतला. भाजपचे भारत गडहिरे यांनी पदाधिकाऱ्यांनी सांिगतल्यावर माघार घेतली. अपक्ष उमेश मंडले, दीपक आयवळे, सूरज बनसोडे, संजय हाके, बळीराम मोरे, मारुती जाधव, शंकर सरगर यांनी
माघार घेतली.

हे आहेत रिंगणात
गणपतराव देशमुख (शेकाप, चिन्ह-खटारा), श्रीकांत देशमुख (भाजप, कमळ), जगदीश बाबर (काँग्रेस, हात), शहाजी पाटील (शिवसेना, धनुष्यबाण), मिलिंद बनसोडे (बसप, हत्ती), कमरुद्दीन काझी (बहुजन मुक्ती पार्टी, खाट), तुकाराम शेंडगे (हिंदुस्तान प्रजापक्ष, ब्रीफकेस), मच्छिंद्र पाटील (अपक्ष, नारळ), नवनाथ मदने (अपक्ष, बॅट) नामदेव लवटे (अपक्ष, टेबल), परमेश्वर गेजगे (अपक्ष, लिफापा), सचिन घाडगे (अपक्ष, गॅस सिलिंडर), संभाजी आलदर (अपक्ष, ऑटोरिक्षा), लक्ष्मण हाके (अपक्ष, कपबशी), मोहन राऊत (अपक्ष, शिट्टी).

यांना चिन्हांचा फायदा होणार ?
अपक्ष उमेदवार लक्ष्मण हाके यांनी कपबशी चिन्हाचा चांगला फायदा होणार आहे. गेल्या तीन विधानसभा निवडणुकीत गणपतराव देशमुख यांचे कपबशी चिन्ह होते. त्याचप्रमाणे शिट्टी हे चिन्ह गेल्या लोकसभेला स्वाभिमानीचे सदाभाऊ खोत यांचे होते. त्यांना तालुक्यात चांगले मताधिक्य मिळाले होते. त्याचा फायदा या दोघांना होण्याची शक्यता आहे.