आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Stone Throwing On Praniti Shinde's Rally News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रणिती शिंदे यांच्या रॅलीवर दगडफेक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर शहर मध्य मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती सुशीलकुमार शिंदे यांच्या रॅलीवर शनिवारी अज्ञात लोकांकडून दगडफेक झाली. यात शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा ज्योती वाघमारे, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती गोवर्धन कमटम यांच्यासह सहा जण जखमी झाले आहेत.
याप्रकरणी आसमा मुजावर व एका तरुणीवर सदर बझार पोलिसांत प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. कमटम, वाघमारे, सागर आनंदकर, शुभांगी लिंगराज, भारती एक्कलदेवी, लक्ष्मी आसादे (रा. सोलापूर) अशी जखमींची नावे आहेत. शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमाराला आमदार प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रॅली जात होती.
रंगभवनहून सात रस्ताकडे जाताना गरुड बंगल्याजवळ आल्यानंतर सुधीर अपार्टमेंटच्या टेरेसवरून आसमा मुजावर व एका तरुणीने मिरवणुकीवर विटा व दगड फेकले. कमटम व सागर यांच्या डोक्यात वीट पडल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. वाघमारे, लिंगराज, एक्कलदेवी, आसादे यांच्या पाठीस, पायास, हाताला दुखापत झाली आहे.

आमदार शिंदेंच्या रॅलीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. अचानक दगडफेक झाल्यामुळे पळापळ झाली. काय झाले ते कळायच्या आत पोलिसांनी घटनेवर नियंत्रण मिळवले. मात्र, नागरिकांचा प्रचंड गोंधळ व घोषणाबाजी सुरू झाली. संशयितांची अधिक चौकशी केली जात असल्याचे पोलिसांनी 'सांगितले.
आधी पडली फुले, नंतर दगड
फेरीत आम्ही निघालो होतो. प्रचंड गर्दी होती. घोषणा सुरू होत्या. सुशीलकुमार शिंदे यांच्यावर फुलांचा वर्षाव झाला. गरुड बंगल्यापासून दहा फूट पुढे गेले असतील, तोच दगडांचा वर्षाव सुरू झाला. गर्दीमुळे क्षणभर समजले नाही. तोच माझ्या डोक्यात सिमेंटचा वीट जोराने आदळली. क्षणार्धात रक्तस्राव सुरू झाला. मला भोवळ आली. कोणी भिरकावली, काही पाहिले नाही. मला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी बारा टाके घातले.
गोवर्धन कमटम, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती
शक्तिप्रदर्शनाने अर्ज दाखल
सोलापूर - ढोल-ताशांचा गजर, फुलांची उधळण करत मोठ्या शक्तिप्रदर्शनाद्वारे काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली. काँग्रेस भवन येथून रॅलीस सुरुवात झाली. त्यापूर्वी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सर्वांना मार्गदर्शन केले.
काँग्रेस भवन येथून निघालेली पदयात्रा रंगभवन, सात रस्ता, लष्कर, जगदंबा चौक, मुर्गी नाला, पत्रकारनगरमार्गे उत्तर सोलापूर तहसील कार्यालयाजवळ आली. आमदार प्रणिती शिंदे, शहराध्यक्ष प्रकाश यलगुलवार, उज्ज्वला शिंदे, यू. एन. बेरिया, सत्यनारायण बोल्ली यांनी निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या दालनात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला.