आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरपूर मतदारसंघात साखर सम्राटांची रंगणार बहुरंगी लढत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून १८ जणांनी आपली उमेदवारी मागे घेतली. मतदारसंघात आता २० उमेदवार एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकून उभे आहेत. त्यामुळे ही निवडणूक बहुरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसपक्षातर्फे विद्यमान आमदार भारत भालके, भाजप मित्र पक्ष आघाडीच्या वतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रशांत परिचारक, शिवसेनेचे समाधान आवताडे, राष्ट्रवादीचे चंद्रकात बागल, बहुजन समाज पक्षातर्फे दत्तात्रय खडतरे आणि मनसेचे जयवंत माने (रेल्वे इंजिन) यांच्यामध्ये प्रमुख लढत होणार आहे.
या प्रमुख उमेदवारांमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी तुटल्यामुळे भालके आणि बागल तर भाजप मित्रपक्षांची महायुती आणि शिवेसना हे एकमेकांविरुद्ध लढणार आहेत. त्यामुळे परिचारक व आवताडे यांच्यामध्ये मतांचे कसे विभाजन होईल हे महत्त्वाचे राहणार आहे. त्याचबरोबर जातीय गणितांची बेरीज करताना मंगळवेढा शहर व तालुक्यातून समाधान आवताडे व अपक्ष उमेदवार अॅड.नंदकुमार पवार हे किती मते स्वत:कडे खेचतात तसेच पंढरपूर शहर व मतदारसंघातील २२ गावांमधून भालके आणि परिचारक यांच्यापैकी कोण लिड घेणार यावर दोघांचेही भवितव्य अवलंबून राहणार आहे.

हे आहेत रिंगणात
भारत भालके (काँग्रेस, हात), शैलेंद्र उर्फ प्रशांत परिचारक (स्वाभिमानी शेतकरी संघटना, कपबशी), समाधान आवताडे (शिवसेना, धनुष्य बाण), चंद्रकात बागल (राष्ट्रवादी काँग्रेस, घड्याळ), दत्तात्रय खडतरे (बहुजन समाज पक्ष, हत्ती), जयवंत माने (मनसे, रेल्वे इंजिन) तसेच १४ अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. त्यांची नावे व चिन्हे अशी - अॅड. नंदकुमार पवार (पाटी), अॅड. एस. एम. सोनवले (अपक्ष, खाट), अनिल पाटील (टीव्ही संच), जयवंत बगाडे (बॅट), किशोर जाधव (अाॅटोरिक्षा), डॉ. सिकंदर नदाफ (किटली), भजनदास पवार (अंगठी), रत्नप्रभा पाटील (शिट्टी), शांतिनाथ बागल (कपाट), रविप्रकाश साबळे (नारळ), अॅड. शिवलाल लोकरे (सििलंडर), परमेश्वर वाघमोडे (काठी), विलास सरवळे (बॅटरी) आणि
श्रीकांत डांगे (गाजर).
यांनी घेतली माघार
सर्जेराव गाडे, विष्णू बागल, सुभाष कदम या तीन अपक्षांनी तर सोमनाथ ढोणे (हिंदुस्थान प्रजापक्ष), यांच्यासह वसंत हाके, पांडू जावळे, जितेंद्र बनसोडे, कीर्तिपाल सर्वगोड, अॅड. रमेश जोशी, अब्दुल रऊफ उर्फ रज्जाक मुलाणी, अमरजित पाटील, अजित यादव, शरद कोळी, सिद्राम हेंबाडे, अल्लामीन जमादार, संतोष रूपनर, संजय घोडके, अर्जुन मागाडे यांच्यासह १८ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले.
स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष जयवंत बगाडे यांच्या बंडखोरीचा फटका बसणार ?
स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष जयवंत बगाडे हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. याबद्दल त्यांच्या संपर्क साधला असता ते म्हणाले, संघटनेकडून या मतदारसंघात प्रशांत परिचारक यांना उमेदवारी दिली असली तरी संघटनेचा स्वाभिमान म्हणून आपण आपली उमेदवारी मागे घेतलेली नाही. राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांना आपला विरोध नाही. मात्र ऊस आंदोलन काळात कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करणाऱ्या परिचारक व करमाळ्यातून संजय शिंदे यांना संघटनेने उमेदवारी देऊ केली आहे. त्याला आपला विरोध आहे. जिल्हाध्यक्ष पदावरून काढून टाकले तरी ही निवडणूक लढवणारच आहे, असेही त्यांनी सांगितले.