आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उदयनराजेंचा ‘भूकंप’ तूर्त टळला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा - छत्रपती शिवाजीराजांचे वंशज राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर ‘राजकीय भूकंप’ घडवून आणण्याचे संकेत दिले होते. मात्र, रविवारी सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आपल्या समर्थकाला उपाध्यक्षपद मिळताच राजेंनी ‘भूकंपा’चा बेत स्थगित केला. त्यामुळे वेळोवेळी पक्ष नेतृत्वाविरोधात वक्तव्य करणारे उदयनराजे खरेच बंडाच्या पावित्र्यात होते की उपाध्यक्षपद मिळवून त्यांचा हेतू सफल झाला. याविषयी सातारा जिल्ह्यात चर्चांना ऊत आला होता. आता ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषदेच्या विषय सभापतींची निवड होणार आहे. त्या वेळी पुन्हा त्यांचे बंड उफाळून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लाेकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे जे चार खासदार निवडून आले त्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा मान भोसलेंना मिळाला आहे. पक्षापेक्षा स्वत:च्या प्रभावावरच ते नेहमी निवडून येत असतात. लोकसभा निवडणुकीत पक्षाचे झालेले पानिपत राज्यातही सत्ताबदलाचे वारे वाहत असल्याने उदयनराजे भाजपत जाणार असल्याची चर्चा होती. दोन दिव सांपूर्वी त्यांनी जिल्ह्यातील आमदारांना सावधानतेचा इशारा देत राजकीय भूकंप घडवण्याचे स्वत:च संकेतही दिले होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर राजेंचे बंड पक्षाला परवडणारे नव्हते. त्यामुळे अध्यक्षपदी राखीव असल्याने उपाध्यक्षपद भोसले यांचे समर्थक रवी साळुंखे यांना देण्यास राष्ट्रवादी काँग्रेसने मान्यता द्यावी लागली.
राष्ट्रवादी सदस्याचा राजीनामा
साताराजिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे माणिकराव सोनवलकर, तर उपाध्यक्षपदी सातारा विकास आघाडीचे रवी साळुंखे यांची बनिविरोध निवड झाली. सोनवलकर हे रामराजे निंबाळकर गटाचे मानले जातात. दरम्यान, उपाध्यक्षपदाचा शब्द देऊनही ऐनवेळी डावलण्यात आल्याबद्दल राष्ट्रवादीचे अमित कदम यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा जिल्हाध्यक्षांकडे दिला आहे. ‘दबावाच्या राजकारणामुळे लोकशाही संपत आहे. शब्द देऊन पाळला जात नाही. काम करून त्याची दखल घेतली जात नाही, त्यामुळे वेगळा विचार करणार आहे.’ असे कदम यांनी सांगितले.
जिल्ह्यावर वर्चस्वाचे प्रयत्न
साताराजिल्हा हा मुख्यमंत्र्यांचा असला तरी येथील स्थानिक स्वराज्य संस्थांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. लोकसभेत राष्ट्रवादीचे पानिपत हाेत असतानाही उदयनराजे मात्र साडेतीन लाखांहून अधिक मतांनी विजयी झाले होते. हा विजय पक्षाचा नव्हे, तर त्यांच्या स्वत:च्या प्रभावाचा हाेता. त्याचा फायदा घेत आता जिल्ह्याच्या राजकारणावर आपली पकड मजबूत करण्याचा राजेंचा प्रयत्न आहे. त्यामुळे ते भविष्यात पक्षांतर करणार नसले तरी पक्षनेतृत्वाला मात्र आपले म्हणणे एेकण्यास भाग पाडतील, एवढे मात्र खरे.
बंड नव्हे, दबावाचे राजकारण
खासदारभोसलेंनी पक्षांतर करण्याचा विचार तूर्त बाजूला ठेवल्याचे सूत्रांनी सांगितले. ते एकटेच भाजपत गेले तर पक्षांतरबंदी कायद्यानुसार त्यांची खासदारकी संकटात येऊ शकते. उदयनराजे भोसले सध्या जिल्ह्यातील राजकारणावर लक्ष ठेवून आहेत. जिल्हा बँक, रयत शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळावर आपल्या माणसांची वर्णी लावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. राजेंनी विधानसभेच्या माध्यमातून राज्याच्या राजकारणातच सक्रिय व्हावे, असा त्यांच्या काही निकटवर्तीयांचा आग्रह आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता पालकमंत्री शशिकांत शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समर्थकांवर दबावासाठी ही खेळी खेळली जात असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.