नवी दिल्ली - केंद्रातील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडणे, केंद्रीय मंत्री अनंत गिते यांचा राजीनामा या मुद्द्यांवर भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी सल्ला दिल्यानतंर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी "आस्ते कदम' पवित्रा घेतल्याचे दिसते. निवडणुकीनंतर दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात. त्यामुळे आताच असा काही निर्णय घेऊ नका, असा सल्ला देतानाच मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेकडेही दुर्लक्ष करा, असे अडवाणी यांनी सांगितल्याचे समजते. दरम्यान, उद्धव येत्या दोन दिवसांत पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
भाजपकडून अपमान झाला तरी शिवसेनेला केंद्र आणि मुंबईतील सत्तेचा मोह सोडवत नसल्याची टीका राज ठाकरे यांनी रविवारी मुंबईतील सभेत केली होती. ही टीका झोंबल्याने उद्धव यांनी दुस-याच दिवशी गिते राजीनामा देतील अशी घोषणा करून टाकली. परंतु राज यांची टीका एवढी मनावर का घ्यायची, यावर शिवसेनेतील नेत्यांतच प्रतिक्रिया उमटली. उद्धव यांनाही
आपण घाईघाईत असा निर्णय घ्यायला नको होता असे वाटायला लागले. युती तुटली असली तरी समविचारी भाजप-शिवसेना निवडणुकीनंतर एकत्र येऊ शकतात, असे संकेत त्यांना मिळाले. सरकारमधून बाहेर पडू नका, मनपांतील युती तोडू नका, असे अडवाणी यांनी सांगितले. त्यामुळे उद्धव यांनी भूमिका सौम्य केल्याचे दिसते.
पुढच्या तडजोडींचे आतापासूनच जुगाड
* अडवाणींच्या सल्ल्यानंतर उद्धव यांनी एनडीएतून बाहेर पडण्याविषयी भूमिका सौम्य केली आहे.
* निवडणुकीनंतर आम्ही शिवसेनेच्या सोबतीने सत्ता स्थापन करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
* समविचारी पक्ष असल्याने निवडणुकीनंतर गरज भासल्यास आम्ही काँग्रेससोबत जाऊ.
शिवसेनेचा युक्तिवाद
लोकसभा निवडणूक रालोआने लढवली होती. शिवसेना त्याचा घटक पक्ष आहे. राज्यात आता युती नाही, पण त्यामुळे केंद्रातून बाहेर पडण्याचा हा विषय ठरत नाही.
मोदींची धास्तीदेखील
* दोन दिवसांत आक्रमक झाले असले तरी सरकार स्थापन करण्यासाठी भाजपशिवाय पर्याय नसल्याची जाणीव उद्धव यांना झाली आहे.
* अमेरिकेत मोदींनी सभा जिंकल्यावर महाराष्ट्रातही त्याचा ज्वर निर्माण झाला. शिवाय ४ ऑक्टोबरपासून राज्यात त्यांचा झंझावात सुरू होत आहे.
कशाची सफाई ?: केंद्रीय मंत्री गिते यांनी बुधवारी दिल्लीत हातात झाडू घेऊन स्वच्छता मोहिमेत भाग घेतला.
अनंत गिते खुश; म्हणाले, राजीनाम्याचा प्रश्नच नाही
युती तुटल्यावर गिते अस्वस्थ होते. पण अडवाणी यांनी उद्धव यांचे मन वळवल्याने तूर्त तरी राजीनामा टळल्याची माहिती सूत्रांनी गितेंना दिली. त्यापाठोपाठ तातडीने त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
पाडापाडी करत नाही; मी जिंकणारच : उद्धव
मुंबई | मी पाडापाडीचे राजकारण करत नाही. कोणाचे उमेदवार पाडण्यासाठी नव्हे, जिंकण्यासाठी मैदानात उतरलो आहोत आणि जिंकणारच, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी बुधवारी व्यक्त केला. मोदी लाट आहे, तर मग राज्यात एवढ्या सभा कशासाठी, असा सवाल त्यांनी केला. काही भाजप नेत्यांना पाडण्याबाबतच्या चर्चेवर उद्धव यांची ही प्रतिक्रिया होती.
गितेंच्या राजीनाम्यावर
गितेंच्या राजीनाम्यावरील माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात येतो आणि मी घूमजाव केले असे बोलले जाते. मोदी परतल्यावर त्यांना भेटून गिते राजीनामा देतील असे मी म्हटले होते.
एनडीएतून बाहेर पडण्यावर
राजू शेट्टी, जानकर यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेऊ. लोकसभेच्या ४२ जागा या एनडीएच्या आहेत. युती क्षणात तुटेल पण सर्वांनी आणलेले हे सरकार आहे हा विचार करावा लागेल, असे उद्धव म्हणाले.