अहमदनगर - 'चलो चले मोदी के साथ' या जाहीरातीवरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपवर हल्ला बोल केला आहे. शिवछत्रपतींचा आशीर्वाद महाराष्ट्रातील जनतेसोबत आहे, आणि राहील, असा दावा त्यांनी केला. 'चला उठा महाराष्ट्र घडवूया', हा संदेश घेऊन ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रात सभा घेत आहेत. त्यांच्या सभेला मोठी गर्दी होत आहे. आदित्य ठाकरे यांच्या सभेला नगरमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आज (मंगळवार) येथील गांधी मैदानावरील उध्दव ठाकरे यांच्या सभेलाही मोठी गर्दी झाली होती.
उद्धव ठाकरे यांनी अफझल खानाचे संकट आले आहे, असे वक्तव्य उस्मानाबाद येथील सभेत सोमवारी केले होते. त्यावरुन भाजपने त्यांच्यावर टीका केल्यानंतर नगरमध्ये त्यांनी पुन्हा एकदा अफझल खानाचा उल्लेख केला आणि त्याचे स्पष्टीकरणही दिले. ते म्हणाले, ' अफझलखानाचे संकट जेव्हा आले तेव्हा मुठभर मावळ्यांनी ते परतवून लावले. मराठ्यांची जिद्द आणि शौर्याच्या बळावर अफझल खानाचा पराभव केला. आताही आम्हाला त्याच जिद्दीने लढावे लागणार आहे.'
भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे मुख्यमंत्रीपदासाठी उमेदवार नाही. या पक्षांना राज्यात पुढे करता येईल असा नेता नाही. ते तुम्हाला काय न्याय देतील, असा सवाल त्यांनी केला.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, नगरच्या गांधी मैदानावरील उद्धव ठाकरेंची सभा छायाचित्रातून