आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आम्हाला दिल्लीची मिजास दाखवू नका - उद्धव ठाकरे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गेली २५ वर्षे राज्याच्या राजकारणात नैसर्गिक मित्रपक्ष असलेल्या व आता विधानसभेच्या तोंडावर वेगळा घरोबा करणाऱ्या भारतीय जनता पक्षावर शिवसेनेच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांनीही शनिवारी चौफेर टीकेची झोड उठवली. ‘महाराष्ट्र कधीच दिल्लीसमोर झुकला नाही, त्यामुळे भाजपने आम्हाला दिल्लीची मिजास दाखवू नये,’ असा खणखणीत इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला.
युतीतून स्वतंत्र झाल्यानंतर शिवसेनेची पहिली प्रचारसभा शनिवारी मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स मैदानावर झाली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. मात्र तत्पूर्वी शिवसेनेच्या इतर नेत्यांनी आपल्या भाषणात भाजपची ‘कमळाबाई’ अशी निर्भर्त्सना करत त्यांच्या फुटीच्या भूमिकेवर कठोर टीका केली.
‘आमचे आजपर्यंत मिशन १५० होते, आता २५० असेल. जिथे भगवा आहे तेथे छत्रपती आहेत. महाराजांचा महाराष्ट्र इकडे तिकडे जाणार नाही. आम्हाला दिल्लीची मिजास दाखवू नका, महाराष्ट्राने औरंगजेबासारख्या दिल्लीश्वराला पाणी पाजले आहे,’ असे खासदार संजय राऊत यांनी भाजपला ठणकावून सांगितले. ‘आजपर्यंत आम्ही हमाली केली, यापुढे महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण टाकरणार नाही,’ असा इशाराही राऊत यांनी दिला.
२५ वर्षांचा संसार नव्हे लफडं : राऊत
२५ वर्षांच्या संसारातून आता कमळाबाई निघून गेली आहे. पण सौभाग्य आमच्याकडे आहे. त्यामुळे १५ ऑक्टोबरच्या लढाईत विजय शिवसेनेचाच होईल, असे म्हणत राऊत यांनी कमळाबाईबरोबर शिवसेनेची अडीच दशकांची युती नव्हती, ते लफडं होतं, या शब्दात भाजपवर हल्ला चढवला. कर्माने मरणाऱ्यांना धर्माने मारण्याची गरज नाही. यापुढे महाराष्ट्राचे राज्य मातोश्रीवरून चालेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोथळा बाहेर काढू : अमोल कोल्हे
दिल्लीश्वरास मुजरा करणाऱ्यांतला महाराष्ट्र नाही. दिल्लीने अनेकदा महाराष्ट्र वार केले. या वेळी आमच्याकडे बाळासाहेबांच्या पुण्याईचे बख्तर आहे. आगामी निवडणुकीत शिवसैनिक विरोधकांचा मतरुपी वाघनखाने कोथळा बाहेर काढतील, असा आशावाद शिवसेनेचे उपनेते व अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला. बृहन्मुंबई महापालिकेच्या महापौर स्नेहल आंबेकर यांचेही या वेळी भाषण झाले.
क्षणचित्रे
१. मुस्लिम महिलांकडे हात करत
‘शिवसेना तुमच्या पाठीशी असेपर्यंत तुम्हाला हात लावायची कोणाचीही हिंमत नाही,’ अशी भाजपला अप्रत्यक्ष ललकारी सूत्रसंचालक आदेश बांदेकर यांनी दिली.
२. सभेच्या सुरुवातीस शिवसेनेच्या व्हिजन डॉक्युमेंटची चित्रफीत सादर करण्यात आली.
३. "हे अंबिके...रणचंडिके...जगदंबिके दे शारदे....वरदान दे! उन्मत्त जाहली सिंहासने, चरफाळण्या सामर्थ्य दे ! 'अशी डिजिटल अक्षरे व्यासपीठावरील बोर्डवर होती.
४. उद्धव ठाकरे यांच्या उजव्या हाताला आदित्य, सुभाष देसाई, सुधीर जोशी बसले होते. डाव्या हाताला मनोहर जोशी, लीलाधर डाके, रामदास कदम होते.
५. शिवसेनेचे मुंबईतील उमेदवार व्यासपीठावरील दुसऱ्या, तिसऱ्या रांगेत बसले होते.
६. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातील संदेश असलेली पत्रिका उद्धव यांनी प्रकाशित केली. "लोकसभेला विजय मिळवून दिला. त्यापेक्षा विधानसभेचा विजय महत्वाचा आहे. त्याच्या तयारीसाठी आजपासून कामाला लागा. लक्षात ठेवा कोणत्याही परिस्थितीत विधान भवनावर भगवा फडकलाच पाहिजे,' असा तो ध्वनिसंदेश आहे.
७. महालक्ष्मी येथील रेसकोर्स मैदानावर झालेल्या या सभेस २० हजार शिवसैनिक होते. शिवसैनिकांत विशेष उत्साह नव्हता, पण भाजपप्रति राग मात्र दिसत होता.