सटाणा - काँग्रेस हा मोठा व्हायरस असून तो जोपर्यंत जात नाही तोपर्यंत राज्याचा विकास होणार नाही. हा व्हायरस समूळ नष्ट करण्याची वेळ आता आली आहे. राज्यात परिवर्तन घडवून शिवशाही आणण्यासाठी भाजपच्याच पाठीमागे उभे राहा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी केले.
सटाणा येथील पाठक मैदानावर झालेल्या सभेत ते बोलत होते. गडकरी म्हणाले की, शरद पवार केंद्रीय कृषिमंत्री असतानाच्या काळात राज्यात दहा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. आघाडी सरकारने राज्यावर तीन लाख कोटींचे कर्ज करून ठेवले आहे. बाबा, आबा, दादा यांनी खोट्या आश्वासनांशिवाय काहीच दिले नाही. राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था सध्या बिकट आहे. आमचे त्यांची अडचण होऊ देणार नाही,’ अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
‘राज्य विकासाच्या शिखरावर पोहोचविण्याचे स्वप्न दाखविणाऱ्या जाणत्या राजांनी महाराष्ट्रावर ३ लाख कोटींच्या कर्जाचा डोंगर उभा केला आहे, त्यामुळे त्यांचे सरकार आता भंगारात काढा’, असे आवाहनही गडकरींनी केले.