जळगाव- राज्यातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, तरुणांसमोरील बेरोजगारीचा प्रश्न आणि महिला मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न, अशा भावनिक मुद्यांना प्रसिद्ध अभिनेत्री तथा केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी हात घातला. देशाच्या इतिहासात पंतप्रधान हातात झाडू घेऊन स्वच्छता अभियानाची सुरुवात करतात, ही घटना बदलाचे प्रतीक आहे. भाग्य उजळण्यासाठी पूर्वी इतरांना महाराष्ट्रात यावे लागत होते, आता याच महाराष्ट्राच्या भूमीत स्वप्ने भंग पावत असल्याची व्यथा मांडून त्यांनी कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कारभारावर टीका केली.
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार सुरेश भोळे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी रविवारी जळगावात आल्या होत्या. जळगावशी १२ वर्षांपासून नाते असल्याचे सांगून
आपण तिसर्यांदा जळगावात येत असल्याचा उल्लेख इराणी यांनी केला. प्रथम युवा मोर्चाची कार्यकर्ती, नंतर महाराष्ट्राची मंत्री आता केंद्रीय मंत्री म्हणून आपण जळगावात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. धर्माचा विजय आणि अधर्माचा नाश करण्याचे पर्व सध्या साजरे केले जात आहे, पण खरे विजय पर्व हे १५ ऑक्टोबर रोजीच साजरे केले जाणार आहे, असेही त्या म्हणाल्या. माझ्या जीवनातील बदल तुम्ही पाहतायेत पण तुमच्या जीवनातील पिडा कोणी पाहायला तयार नसल्याचे सांगत राज्यातील आघाडी सरकारवर त्यांनी टीका केली. राष्ट्रीय मुद्दे मांडताना इराणी यांना स्थानिक प्रश्नांचा मात्र विसर पडला.
भाजपचे ज्येष्ठ नेते गजानन जोशी, आमदार डॉ. गुरुमुख जगवानी, जिल्हाध्यक्ष उदय वाघ, प्रभारी जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी, वासंती चौधरी, उज्ज्वला बेंडाळे, वामनराव खडके, डॉ.अश्विन सोनवणे, सुभाष शौचे, पांडुरंग काळे, प्रभाकर पवार आदी या वेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन अॅड.सत्यजित पाटील यांनी केले.
व्यासपीठवर स्मृती इराणी येताच उपस्थित महिलांनी नारी शक्तीची वज्रमूठ आवळून घोषणा दिल्या.
यांची होती उपस्थिती
स्मृती इराणींनी घातला भावनिक मुद्यांना हात
मोदींच्या कार्याचा गौरव
जनधन योजनेत एका महिन्यात पाच कोटी खाती उघडली गेली, यात तीन हजार कोटी रुपये जमा झाले. मोठ्या प्रमाणात पैसा उभा राहिला. विकासाची दिशा देणारे नेतृत्व देशाला मिळाले आहे. श्रीरामाचा वनवास १४ वर्षांचा होता तर महाराष्ट्राचा १५ वर्षांचा आहे. १५ ऑक्टोबरला हा वनवास संपेल, असे भाकीतही इराणी यांनी या वेळी केले.
मुंडे माझ्या वडिलांसारखे
गोपीनाथमुंडेंचे स्मरण करत इराणी यांनी त्यांच्यात वडील अन् मुलीचे नाते असल्याचे सांगितले. महाराष्ट्रातून राजकीय प्रवास सुरू करताना मुंडेंचा आशीर्वाद आपल्या पाठीशी होता, असे सांगून त्यांनी मुंडेंना खरी श्रद्धांजली द्यायची असेल तर भाजपला एकहाती सत्ता द्या. प्रत्येक हाताला काम महिलांना संरक्षण देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
महिलांची लक्षणीय उपस्थिती
"क्योंकी सांस भी कभी बहु थी' या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या स्मृती इराणी यांची लोकप्रियता केंद्रीय मंत्री झाल्यानंतरही कायम आहे. त्याचा प्रत्यय रविवारच्या सभेत आला. नवीपेठ भागात झालेल्या सभेत "तुलसी' हिला पाहण्यासाठी महिलांनी प्रचंड गर्दी केली होती. तब्बल तासभर उशिरा येऊनही महिलांमध्ये तिला बघण्याची उत्सुकता होती. स्मृती इराणी व्यासपीठावर आल्यानंतर महिलांनी वज्रमूठ आवळून जोरदार घोषणाबाजी करत नारीशक्तीचे प्रदर्शन केले.
आघाडी सरकार अहंकारी
केंद्रात बहुमताने भाजप सरकार आले परंतु त्याला अहंकार नाही. कारण मोदींनी संसदेच्या पायरीला प्रणाम करून स्वत:ला सेवक म्हणून प्रस्तुत केले आहे. दुसरीकडे कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये अहंकार दिसून येतो. अजित पवारांकडे पाणी मागितले तर काय उत्तर मिळते? ही लाज वाटणारी गोष्ट आहे. शेतकऱ्यांना पाणी नव्हे तर गोळी घातली जाते. ही निवडणूक कोण्या एका उमेदवाराची अथवा पक्षाची नाही तर प्रत्येक नागरिकाची आहे. यवतमाळमध्ये विधवा महिलेला पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी दिलेला धनादेश वटलाच नाही, तसेच नोकरी नाही म्हणून मुंबईत एका बेरोजगाराने आत्महत्या केली. हे मुद्देही त्यांनी मांडले.