आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Western Maharashtra Election News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी-भाजपमध्ये रस्सीखेच; शिवसेनेचा संघर्ष अस्तित्वासाठी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाबरोबरची मैत्री कायम राखण्यात यशस्वी झालेल्या भाजपपुढे पश्चिम महाराष्ट्रात अधिक जागा जिंकण्याची संधी निर्माण झाली आहे. ‘राष्ट्रवादी’पुढे बालेकिल्ल्यातील वर्चस्व टिकवण्याचे आव्हान असेल. काँग्रेस आणि शिवसेनेला असलेल्या जागा टिकवण्यासाठी झगडावे लागेल, अशी स्थिती आहे.
लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस एकही जागा जिंकू शकली नाही. याउलट राष्ट्रवादी काँग्रेसचे चारही खासदार पश्चिम महाराष्ट्रातूनच निवडून आले होते. भाजपनेही या भागात अभूतपूर्व यश मिळवत तीन जागा जिंकल्या. या पार्श्वभूमीवर विधानसभेच्या निवडणुकीत वर्चस्व राखण्यासाठीची मुख्य चुरस ‘राष्ट्रवादी’ आणि भाजप यांच्यातच रंगणार आहे.
पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर आणि सांगली या पाच जिल्ह्यात विधानसभेच्या ५६ जागा आहेत. यातल्या २५ जागांवर सध्या ‘राष्ट्रवादी’चे आमदार आहेत. काँग्रेसकडे ११ तर भाजपच्या ताब्यात १० जागा आहेत. मावळत्या विधानसभेत शिवसेनेच्या सहा जागा आहेत. अजित पवारांचे समर्थक असलेल्या लक्ष्मण जगताप आणि विलास लांडे यांनी अपक्ष निवडणूक लढवत अनुक्रमे चिंचवड भोसरीतून विजय मिळवला होता. मात्र लोकसभेनंतर बदललेल्या समीकरणानंतर या दोघांनीही ‘राष्ट्रवादी’पासून अंतर ठेवले होते.
सर्वाधिक २१ आमदार असलेल्या पुण्यातले ११ मतदारसंघ शहरी उर्वरित दहा ग्रामीण आहेत. पुरंदरची जागा शिवसेना स्वतंत्र लढूनही राखू शकेल. मात्र कोथरुड आणि हडपसर या दोन जागा राखण्यासाठी शिवसेनेला झगडावे लागेल. कसबा, मावळ, पर्वती या तीन जागा भाजप पुन्हा जिंकून दौंड, शिरुर, वडगाव शेरी या जागा नव्याने खेचून आणण्याची संधी भाजपला आहे.
सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या एकहाती वर्चस्वाला धक्का लागण्याची चिन्हे नाहीत. सातारा, सांगली आणि सोलापुरातील सहा जागा सांभाळण्याची कसरत काँग्रेसला करावी लागेल. दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांची साथ सुटल्याने कोल्हापुरातील तीन जागा राखण्याचे आव्हान शिवसेनेपुढे असेल तर ‘राष्ट्रवादी’ बाजूला गेल्याने दोन जागा राखण्याचे आव्हान काँग्रेसपुढे असेल. एकूणच काँग्रेस राष्ट्रवादीच्या या बालेकिल्यातील चित्र यंदा काहीसे बदलूही शकते.
‘दादा’ सुखात; ‘बाबा’ धोक्यात
अजितपवार (बारामती), दिलीप वळसे (आंबेगाव), जयंत पाटील (इस्लामपूर), सतेज पाटील (कोल्हापूर दक्षिण) या नेत्यांचे मतदारसंघ भक्कम आहेत. मात्र मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (कराड दक्षिण) यांच्यासह आर. आर. पाटील (तासगाव), हसन मुश्रीफ (कागल), पतंगराव कदम (पलूस), हर्षवर्धन पाटील (इंदापूर) या मंत्र्यांना विजयासाठी माेठा संघर्ष करावा लागू शकेल.