आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Woman In Maharashtra Assembly Election 2014, Divya Marathi

लेडीज ‘फर्स्ट’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिलांना सर्वच स्तरांवर ३३ टक्के आरक्षण देण्याच्या बाता प्रत्येकच पक्ष करीत असला तरी विधानसभेसाठी आरक्षण नसल्याने सगळ्यांनी मोजक्याच महिलांना उमेदवा-या दिल्या आहेत. त्यातही प्रथमच निवडणूक लढवत विजयाचा दावा करणा-या राज्यातील या काही महिला उमेदवारांचा लेखाजोखा लेडीज ‘फर्स्ट’च्या माध्यमातून मांडत आहोत.

मातब्बरांना तगडे आव्हान
सोलापूरच्या करमाळा मतदारसंघातून रश्मी बागल यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. माजी राज्यमंत्री दिगंबर बागल यांच्या निधनाप्रसंगी शिक्षण घेत असलेल्या कन्या रश्मी हिने कमी वयातच बागल गटाची धुरा हाती घेतली होती. आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीत रश्मी यांनी अकलूजच्या मोहिते गटावर विजय मिळवत आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवली होती. २००९ मध्ये रश्मीने आईला विजयी केले. त्यानंतर विवाह झाल्यानंतर काही काळ रश्मी सक्रिय राजकारणापासून दूर होत्या. मात्र, आता पुन्हा त्या रिंगणात असून करमाळ्यातील पारंपरिक प्रतिस्पर्धी जयवंतराव जगताप, संजय शिंदे, नारायण पाटील यांच्यासमोर रश्मी यांचे तगडे आव्हान आहे. शब्दांकन : दिग्विजय जिरगे
रश्मी बागल : सोलापूर जिल्ह्यातील करमाळा मतदारसंघातून राष्ट्रवादीची उमेदवारी.

पारंपरिक मतांवर मदार
प्रदीर्घ काळ शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्या, पदाधिकारी म्हणून काम पाहिल्यावर कला रविनंदन ओझा या विद्यानगर वॉर्डातून नगरसेविका झाल्या. खासदार चंद्रकांत खैरे यांच्या निकटवर्ती आणि विश्वासू असल्याचा फायदा होऊन महापौरपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे मनासारखी जुळावीत, यासाठी खैरेंनी ओझांना संधी देण्याचे प्रयत्न सुरू केले. ते युती तुटल्याने फारच झटपट प्रत्यक्षात आले. त्यांची लढत भाजपचे अतुल सावे, काँग्रेसचे राजेंद्र दर्डा, भाकपचे डॉ. भालचंद्र कांगो, मनसेचे सुम्मीत खांबेकर, अपक्ष उत्तमसिंह पवार यांच्याशी आहे. शिवसेनेच्या पारंपरिक मतांवरच त्यांची मदार आहे.शब्दांकन : श्रीकांत सराफ
कला ओझा : औरंगाबाद पूर्व मतदारसंघात शिवसेनेकडून उमेदवारी

स्पर्धकावरील नाराजीचा लाभ
मुंबई महानगराच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या तिकिटावर आजवर चार वेळा नगरसेवकपद शुभा राऊळ यांनी पटकावले आहे. घोसाळकर यांनी शिवसेनेच्याच नगरसेविकांशी असभ्य वर्तन केल्याच्या तक्रारीवर राऊळ यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे दाद मागितली. मात्र, त्यानंतरही घोसाळकरांना पाठीशी घातल्याचा आराेप करीत राऊळ या शिवसेनेतून बाहेर पडल्या. आमदार विनोद घोसाळकर यांच्याविरुद्ध दहिसर या विधानसभा मतदारसंघात त्या मनसेच्या तिकिटावर रिंगणात आहेत. घोसाळकरांविरुद्ध या महिलांमधील संताप आणि आमदार म्हणून त्यांच्यावर नाराजी असल्याने राऊळ या घोसाळकरांना धक्का देऊ शकतात.शब्दांकन : प्रमोद चुंचुवार
शुभा राऊळ : शिवसेनेच्या माजी महापौर, मात्र आता मनसेकडून दहिसरच्या उमेदवार.

सासर - माहेरचा वारसा
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांच्या स्नुषा व बिपिन कोल्हे यांच्या पत्नी आहेत. या वेळी त्या चक्क भाजपच्या उमेदवारीवर आमदार अशोक काळे यांचे पुत्र आशुतोष यांच्या विरोधात कोपरगाव मतदारसंघातून लढत आहेत. विधानसभेसाठी त्या प्रथमच उमेदवारी करत आहेत. तालुक्यात कोल्हे व काळे कुटुंबाचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. अर्थात तेदेखील सोयीसोयीने असते. स्नेहलता यांना त्यांच्या माहेराकडूनच राजकारणाचे बाळकडू मिळाले आहे. राहाता तालुक्यातील माहेरवाशीण म्हणून स्नेहलता यांना तेथून समर्थन मिळण्याची शक्यता आहे. महिला बचत गटांद्वारे संघटन केल्याने त्या प्रमुख दावेदार आहेत.
शब्दांकन : मिलिंद बेंडाळे
स्नेहलता कोल्हे : कोल्हे घराण्याच्या स्नुषेला कोपरगाव मतदारसंघातून मिळाली उमेदवारी.