आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajnath Singh News In Marathi, BJP, Mamta Banerjee, Trinmul Congress, Modi

मोदींच्या वक्तव्यामुळे नाराज ममतांचे मन वळवण्यासाठी राजनाथ यांचा पुढाकार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नरेंद्र मोदी यांच्या तिखट वक्तव्यामुळे नाराज झालेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे मन वळवण्यासाठी भाजपने प्रयत्न चालवले आहेत. भाजप अध्यक्ष राजनाथसिंह यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. केंद्रात भाजपचे सरकार आल्यास पश्चिम बंगालच्या विकासासाठी मोठे पॅकेज दिले जाईल, असे राजनाथ म्हणाले. 27 एप्रिल रोजी मोदी यांनी ममतांची पेंटिंग 1.80 कोटी रुपयांमध्ये विक्री झाल्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. वाक्युद्धामध्ये ममता यांनीही मोदी यांना गुजरातचे खाटीक संबोधले होते. आता राजनाथ यांनी तणाव निवळण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. राजनाथ म्हणाले, तृणमूलला काँग्रेससोबत लढायचे असेल तर त्यांनी लढावे, भाजपसोबत ते का लढत आहेत? दिल्लीत भाजपचे सरकार आल्यास पश्चिम बंगालच्या विकासासाठी मोठ्या पॅकेजची आवश्यकता भासल्यास आम्ही ते अवश्य देऊ.

सपा कार्यकर्त्यांचा केंद्रावर ताबा : अमित शहा
वाराणसी. नरेंद्र मोदी यांचे कट्टर समर्थक आणि भाजपचे सरचिटणीस अमित शहा यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अनेक मतदान केंद्रांवर ताबा मिळवला होता, असा आरोप त्यांनी केला. निवडणूक आयोगाने आगामी दोन टप्प्यातील मतदानासाठी सुरक्षा वाढवण्याची मागणी त्यांनी केली. सपाने आरोप फेटाळले असून भाजपची ही पराभूत मानसिकता असल्याचे म्हटले आहे. उत्तर प्रदेश भाजपचे प्रभारी अमित शहा यांनी 24 आणि 30 एप्रिल रोजी झालेल्या निवडणुकांदरम्यान अनेक ठिकाणी सपा कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रावर ताबा मिळवल्याचा आरोप केला. राज्यातील आगामी टप्प्यातील मतदान केंद्रावर सुरक्षा वाढवण्यात यावी. प्रत्येक केंद्रावर निमलष्करी दल तैनात करावे, संवेदनशील केंद्रांवर निवडणूक निरीक्षक नेमून व्हिडिओ रेकॉर्डिंग केली जावी.

राहुल यांच्यावर कारवाई करण्याची भाजपची मागणी
भाजपने राहुल गांधींविरुद्ध शनिवारी तक्रार दाखल केली. राहुल यांनी उत्तराखंडच्या सोलनमध्ये वादग्रस्त भाषण केल्याचा आरोप आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यास 22 हजार लोक मारले जातील, असे वक्तव्य राहुल यांनी केले होते. राहुल यांनी अत्यंत संतापजनक वक्तव्य केल्याचे भाजप नेते अनंत कुमार यांनी म्हटले आहे. संबंधित वक्तव्य अनावश्यक असून त्यामुळे आचारसंहितेचे उल्लंघन होत आहे.

पराभव दिसताच भाजपत घबराट : सपा
पहिल्या चार टप्प्यांतील निवडणुकीत भाजपने सपाटून मार खाल्ला आहे. पराभवाच्या मानसिकतेतूनच अमित शहा आरोप करत असल्याचे सप नेते रामगोपाल यादव यांनी सांगितले. भाजप आपल्या पराभवाचे खापर दुस-यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न करत आहे.