आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi News In Marathi, BJP, Kapil Sibbal, Lok Sabha Election, Divya Marathi

MODI म्हणजे मॉडेल ऑफ डिव्हायडिंग इंडिया, कपिल सिब्बल यांनी सांगितला ‘मोदी’चा अर्थ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - निवडणूक प्रचारानिमित्त परस्परांवर आरोपांच्या फैरी झडत असताना आता आसाममध्ये अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यावरूनही राजकारण तापले आहे. नॅशनल कॉन्फरन्सने भाजप व नरेंद्र मोदींमुळे देशात वातावरण बिघडत चालले असल्याचा आरोप केला तर काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी मोदींच्या नावातील अर्थच समजावून सांगितला. ते म्हणाले, ‘एमओडीआय... म्हणजे मॉडेल ऑफ डिव्हायडिंग इंडिया.’

भाजप कार्यकर्ते व नेते देशातील वातावरण बिघडवत असल्याचा आरोप सिब्बल यांनी केला. तीन दिवसांपूर्वी आसाममध्ये झालेल्या मोदींच्या सभेनंतरच हिंसाचार भडकल्याचे जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला म्हणाले. यावर भाजपनेही तत्काळ प्रतिक्रिया दिली. पक्षप्रवक्ते रविशंकर प्रसाद म्हणाले, पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग 24 वर्षांपासून आसाममधून राज्यसभेवर जातात. 10 वर्षांपासून पंतप्रधान आहेत. या काळात डॉ. सिंग यांनी वोटबँक सांभाळण्याशिवाय काय केले? केंद्राचा वरदहस्त असलेले मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी हिंसाचार थांबवण्याचा प्रयत्नच केला नाही.

मुलाखतीला कात्री, मोदींनी मौन सोडले!
दूरदर्शनवर प्रसारित झालेली नरेंद्र मोदींची मुलाखत कापल्याचा आरोप भाजपच्या गोटातून होत असताना इतके दिवस गप्प असलेल्या मोदींनी मौन सोडले. राष्टÑीय वाहिनी अजूनही स्वायत्ततेसाठी संघर्ष करत असल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. मुलाखतीत मोदींनी प्रियंका, अहमद पटेल व मुशर्रफ यांच्याबद्दल केलेले भाष्य कापल्याचा आरोप आहे.

आणीबाणीची आठवण
मोदींनी आपल्या मुलाखतीचा काही भाग वगळण्यात आल्याबद्दल ट्विट करताना आणीबाणीचा उल्लेख केला आहे. माध्यमांच्या स्वातंत्र्याला लगाम घालण्याचा प्रकार लोकशाहीला कलंक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

चौकशी करणार
मोदींची मुलाखत कापल्याप्रकरणी प्रसारभारती सोमवारी चौकशीचे आदेश देण्याची शक्यता आहे. नेमकी ही मुलाखत कुणी कापली, त्यांना कुणी सूचना केली होती का, याची सखोल चौकशी होऊ शकते.

तिस-या आघाडीला पाठिंबा नाही : राहुल
काँग्रेस बहुमताचा आकडा गाठेल

लोकसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेसाठी तिस-या आघाडीला पाठिंबा देण्याची शक्यता काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी फेटाळली. अमेठीमध्ये प्रचारदौ-यात ते पत्रकारांशी बोलत होते. केंद्रात कोणत्याही पक्षाला बहुमत मिळेल, अशी स्थिती नाही. याबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. काँग्रेस आघाडी बहुमताचा आकडा गाठेल, असा दावाही त्यांनी केला.
माकपचे प्रकाश कारत यांनी देशात 1996 सारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली होती. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तिस-या आघाडीला पाठिंबा देणे काँग्रेसला अपरिहार्य ठरेल, असे कारत यांनी म्हटले होते.