लखनऊ- समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव आणि बसप नेत्या मायावती यांच्यातील शाब्दीक युद्धात उत्तर प्रदेशच्या महिला कल्याण विभागाच्या अध्यक्षा लीलावती कुशवाह यांनीही उडी घेतली आहे. मायावती कुमारिका नाहीत तर श्रीमती आहेत. तसे नसल्यास हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी वैद्यकीय चाचणी करून घ्यावी, असे खुले आव्हान कुशवाह यांनी दिले आहे.
काही दिवसांपूर्वीच मुलायम सिंह यांनी मायावतींना श्रीमती म्हणावे की, कुमारी हा प्रश्न पडल्याची टीका केली होती. निवडणुकीच्या प्रचारात लीलावती यांनीही आपल्या प्रमुख नेत्याच्या वक्तव्याचे समर्थन करण्याची संधी दवडली नाही. मुलायमसिंह अगदी योग्य बोलले आहेत, असे त्या म्हणाल्या. एवढ्यावरच न थांबता मायावती या कुमारिका नसल्याचे अवघ्या जगाला माहिती असल्याचेही त्या म्हणाल्या.
मायावतींनी मुलायम सिंह यांना उत्तर देताना, त्यांना वेड्याच्या रुग्णालयात दाखल करण्याची गरज असल्याची टीका केली होती. या टीकेचाही लीलावती यांनी समाचार घेतला. २०१२ मध्ये झालेल्या पराभवानंतर मायावती यांचेच मानिसक संतुलन ढासळले आहे. त्यात २०१४ च्या निवडणुकांमध्ये तर त्यांचे अस्तित्वच जाणवत नाही. त्यामुळे त्यांना मुलायम सिंह यांच्या वक्तव्यामुळे वेदना झाल्या असतील, तर त्यांनी कौमार्य चाचणी करून जगाला सत्य काय ते दाखवून द्यावे, असे त्या म्हणाल्या.
शिवपाल सिंह यादव यांचा पलटवार
मुलायमसिंह यांचे भाऊ शिवपाल सिंह यांनीही मायावतींवर पलटवार केला. मायावती स्वतःच पागल झाल्या असून, त्यांना वेड्याच्या रुग्णालयात दाखल करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
बसपची कारवाईची मागणी
बसपचे राष्ट्रीय सरचिटणीस सतीशचंद्र मिश्रा यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून मुलायमसिंह यादव यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. निवडणूक आयोगाच्या दुर्लक्षामुळेच सपाचे नेते वारंवार आचारसंहितेचे उल्लंघन करत असल्याची तक्रार त्यांनी या पत्रात केली आहे. निवडणूक आयोगाने मुलायमसिंह यांना सभा घेण्यास बंदी करावी, तसेच त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणीही त्यांनी पत्रात केली आहे.