बारामती - गेली पाच वर्षे विरोधकांकडून भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे व्यथित झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी ‘
आपण एक रुपयाचाही भ्रष्टाचार करणार नाही कोणाला करू देणारही नाही,’ असा निर्धार व्यक्त केला. राज्याला आता डायनॅमिक नेतृत्वाची गरज असल्याचे सांगत त्यांनी भावी मुख्यमंत्री म्हणूनही स्वत:ला आपल्या मतदारसंघात प्रोजेक्ट केले.
अजित पवार यांनी आपल्या हजारो समर्थकांच्या साक्षीने शुक्रवारी बारामती मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. या वेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. आपल्यावरील आरोपांचे खंडन करताना अजित पवार म्हणाले की, भ्रष्टाचाराचे आरोप करून आमची बदनामी करण्याचा प्रयत्न झाला. श्वेतपत्रिका काढली, चौकशी समिती नेमली. परंतु त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. गेल्या दोन वर्षांपासून मुख्यमंत्री होण्याची अजित पवारांची सुप्त इच्छा अनेक वेळा समोर आली. मात्र आघाडी तुटल्यानंतर आता राज्यात पुढचे गतिमान सरकार आणण्यासाठी राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणावेत, असे आवाहन करत पवारांनी भविष्यात आपणच मुख्यमंत्री असू, असा अप्रत्यक्ष दावाच केला.
मुख्यमंत्र्यांवर टीका
राज्यपुढे नेताना गतिमान प्रशासन असावे लागते. मला गतिमान प्रशासन असावेसे वाटते. मात्र तसे झाल्यास काही जण अपघात होण्याची भीती व्यक्त करतात. मात्र ‘गाडी चालवणारा चालक जबरदस्त असला तर कोणीही आडवा आला तरी अपघात होत नाही,’ अशा शब्दांत अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना टोले लगावले.