चौंडी - आमदार पंकजा मुंडे यांच्या ‘पुन्हा’ संघर्ष यात्रेच्या समारोपातून राज्यात परिवर्तन यात्रेची सुरुवात होत असल्याची घोषणा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष
अमित शहा यांनी गुरुवारी चौंडी येथे केली. सत्तापरिवर्तन करणे, हाच या यात्रेचा उद्देश आहे. राज्याच्या नेत्या म्हणून पंकजा मुंडे प्रचारात भाग घेतील, असे स्पष्ट करताना शहा यांनी त्यांच्याकडे राज्याचे नेतृत्व देण्याचे संकेत दिले. या कार्यक्रमात पंकजा यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषणा करण्याची मागणी होत होती. तिला मात्र शहा यांनी प्रतिसाद दिला नाही.
नगर जिल्ह्यातील चौंडी येथे आयोजित संघर्ष यात्रेच्या समारोपात ते बोलत होते. सभेत ‘हमारी पीएम महाराष्ट्र की पीएम’ असे फलकही झळकावले जात होते. रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी पंकजाला मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित करा, यातून निवडणूक लढवल्यास बहुजन समाज त्यांच्या पाठीमागे येईल, असे सांगत शहा यांना विनंती केली. मात्र, शहा यांनी त्यावर काहीही बोलणे टाळले असले तरी पंकजांकडे राज्याचे नेतृत्व देण्याचे संकेत दिले.
लोकांसाठीच बाहेर पडले : पंकजा
मला उभे करणारे गरीब फाटके लोक आहेत. मोठी कोणतीही व्यक्ती त्यामागे नाही. पिता गेल्याचे दु:ख, वैयक्तिक जबाबदाऱ्या बाजूला ठेवून या लोकांसाठीच बाहेर पडले आहे. अफवा, वाईट गोष्टींना बळी पडता मुंडे साहेबांचे स्वप्न पूर्ण करा, असे आवाहन करताना त्यांनी राज्य सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले. त्या म्हणाल्या, या सरकारने ११६ घोटाळे केले. अशा घोटाळेबाजांना तुम्ही पुन्हा संधी देणार का, असा सवालही पंकजांनी केला.