आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेनेच्या बळावर डोळा, भाजपच्या मुंबईतील बैठकीसाठी प्रमुख पदाधिकारी रवाना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शिवसेनेसोबत युती तोडली तर कोणत्या मतदारसंघातून भाजपला विजय मिळू शकतो, याचे उत्तर मिळण्यासाठी भाजपच्या मराठवाड्यातील पदाधिका-यांना मंगळवारी (२३ सप्टेंबर) तातडीने मुंबईत दाखल होण्याचे फर्मान निघाले आहे. दादर येथील वसंत स्मृती भवनात दुपारी एकच्या सुमारास ही बैठक होणार आहे. त्यात शिवसेनेचे बळ नेमके कशात आहे, हेही या पदाधिका-यांना स्पष्ट करावे लागणार आहे.

गेल्या दोन आठवड्यांपासून युतीमधील जागा वाटपांचा वाद शिगेला पोहोचला आहे. केंद्र आणि राज्य पातळीवर प्रयत्न होऊनही तोडगा निघत नसल्याने दोन्ही पक्षांनी स्वतंत्र लढण्याची तयारी सुरू केल्याचे चित्र आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईत विभागनिहाय बैठकांचे सत्र उद्या होणार आहे. त्यासाठी मराठवाड्यातील पदाधिकारी, आमदारांना असाल तेथून मुंबईत दाखल व्हा. सोबत मतदारसंघाची आकडेवारी, सद्य:स्थिती, काँग्रेस-राष्ट्रवादीचे काय आणि स्वतंत्रपणे लढण्याचे ठरल्यास उमेदवार खरेच विजयी होऊ शकतो का, याचे टिपण आणण्यास सांगितले आहे.
शिवसेनेची ताकद सांगा : मतदारसंघात शिवसेनेची किती ताकद आहे, त्यांच्या उमेदवाराची प्रतिमा कशी आहे, तिला छेद देऊन भाजपचा उमेदवार विजयी होऊ शकतो का, त्याच्या पाठीशी नेमका कोणता समाज, गट उभा राहू शकतो, याचीही माहिती बैठकीत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे स्वत:ची ताकद, शिवसेना उमेदवाराचे मुद्दे, त्याला काटशह देण्यासाठीचे नियोजन आणि भाजपाचा संभाव्य उमेदवार यांचा तपशील गोळा करून हे पदाधिकारी मुंबईकडे रवाना झाले आहेत. मनातून मात्र, युती तुटू नये अशीच सर्वांची इच्छा असल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवते आहे. या बैठकीसाठी जिल्ह्यातून प्रदेश उपाध्यक्ष हरिभाऊ बागडे, जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, बापू घडामोडे, प्रदेश चिटणीस भागवत कराड,अतुल सावे,भाजप प्रवक्ते शिरीष बोराळकर हे नेते मुंबईकडे रवाना झाले आहेत. बागडे, बोराळकर मराठवाड्याची एकत्रित माहिती देणार आहेत.
आकडेवारी शिवसेनेच्या बाजूने
मात्र भाजप लढवत असलेल्या जिल्ह्यातल्या तीनही मतदारसंघात भाजपचा सातत्याने पराभव होत आहे. औरंगाबाद पूर्व आणि सिल्लोडमध्ये तो पंधरा हजारांपेक्षा अधिक मतांनी झाला आहे. त्यामुळे संख्याबळात शिवसेनेशिवाय विजय अवघडच जाणार आहे, असे आतापर्यंतचे गणित सांगते. शिवसेना
वैजापूर, कन्नड, पैठण, गंगापूर, औरंगाबाद पश्चिम आणि औरंगाबाद मध्य हे सहा मतदारसंघ शिवसेना लढवते. या सहापैकी चार मतदारसंघांत शिवसेनेचे आमदार आहेत. त्यामुळे शिवसेनेला केवळ तीन मतदारसंघांत उमेदवार शोधावे लागणार आहेत. सिल्लोड, पूर्वमध्ये शिवसेनेकडे तगडा उमेदवार नाही. फुलंब्रीमधून शिवसेनेचे राजेंद्र ठोंबरे बऱ्यापैकी आव्हान उभे करू शकतात, अशी स्थिती आहे.
शिवसेनेला तीन, तर भाजपला सहा उमेदवार शोधावे लागणार
युती तुटल्यास जिल्ह्यात शिवसेनेला तीन, तर भाजपला सहा मतदारसंघात उमेदवार शोधावे लागणार आहेत. भाजप औरंगाबाद पूर्व, फुलंब्री आणि सिल्लोड मतदारसंघ भाजपकडे आहेत. त्यामुळे त्यांना औरंगाबाद मध्य, पश्चिम तसेच कन्नड, वैजापूर, गंगापूर, पैठणमधून उमेदवार शोधावे लागतील. गंगापूरमधून किशोर धनायत, वैजापूरमधून तालुकाअध्यक्ष संभाजी कलापुरे, कन्नडमधून संजय खंबायते, तर पैठणमधून रेखाताई कुलकर्णी, गोपीनाथ वाघ इच्छुक आहेत. या सहाही मतदारसंघात कमी अधिक फरकाने नेहमीच शिवसेनेचा वरचष्मा राहिला आहे.

पर्याय तयार
आघाडीच्या विरोधात वातावरण असल्याने युती टिकावी, अशी आमची इच्छा आहे. मात्र, सन्मानजनक तोडगा नाही निघाला तर आमच्याकडे सर्वच मतदारसंघांसाठी मजबूत उमेदवार आहेत. काही अपक्ष, इतर पक्षांकडून भाजपमध्ये येणाऱ्यांच्या बळाने आमची ताकद वाढणार आहे. एकनाथ जाधव, जिल्हाध्यक्ष,
संघटनेच्या पातळीवर आम्ही स्वतंत्रपणे लढण्यास पूर्णपणे तयार आहोत. औरंगाबाद पूर्व आणि फुलंब्रीमधून शिवसेनेला विजय मीळू शकतो. बाहेरून उमेदवार आयात करण्याची किंवा अपक्षांची मदत घेण्याची आम्हाला गरज नाही. अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख, शिवसेना