निवडणुका जिंकून द्याव्यात तर यांनीच... असा उदोउदो भाजप-संघवाल्यांकडून कधीपासून होतोय. यांच्या हातात निवडणूक गेली म्हणजे विजय नक्की, अशी ‘कुजबुज’ पसरवण्यातही नेहमीप्रमाणे संघपरिवार मागे हटलेला नाही. उत्तर प्रदेशाच्या विजयाचा जादूगार (?) चमनभाई नुकतेच पुण्यात येऊन गेले. चमनभाईंबरोबरच्या फोटोत
आपली छबी यावी म्हणून हावरटपणा करणारे फुटकळ कार्यकर्ते वगळले तर पहिल्याच सभेत त्यांची जादू पुण्यात फारशी चालली नाही. ‘मायक्रोप्लॅनिंग’ करण्यात आणि स्थानिक स्थितीचा अचूक धांडोळा घेण्यात चमनभाईंचा हात कोणी धरू शकत नाही असा बोलबाला. कशावरून विचारले तर संघवाले लगेच कान हातात धरून उत्तर प्रदेशकडे बोट दाखवतात. पुण्याच्या पहिल्याच सभेत मात्र चमनभाईंचे हे गुण कुठे दिसले नाहीत. पुण्यात बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी त्यांना स्मरण झाले ते टिळक, सावरकर, वासुदेव बळवंत फडके यांचे. रामदासांचे नाव तोंडात पण महात्मा फुले तर त्यांना आठवलेच नाहीत. आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार म्हणा... पुण्याचे सांसद म्हणून चमनभाईंनी कसबेकरांचेच नाव घेतले. भांबुर्ड्याच्या पाटलांचे नाव कार्यक्रम संपेपर्यंत त्यांनी घेतले नाहीच. वा रे ‘मायक्रोप्लॅनिंग’. बाकी चमनभाईंची पोपटपंची मार्केट यार्डातल्या किंवा धान्य बाजारातल्या एखाद्या पेढीवरच्या कोणा ‘बेपारी’कडूनही ऐकायला मिळावी इतकी पोकळ. कमळाबाईच्या कपाळावर यापूर्वी अटलबिहारी, लालकृष्ण असे भारदस्त टिळे होते. त्यांची पल्लेदार भाषा, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिस्थितीवरचे भाष्य, नर्मविनोदी शैली याला एक दर्जा होता. विरोधी मताच्या माणसालासुद्धा त्यांच्या वक्तृत्वाची खुमारी ऐकण्यापुरती का होईना आवडायची. चमनभाई राष्ट्रीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, पण हिंदीत चार वाक्यं धड बोलू शकत नाहीत. विचार मांडणे, प्रभाव टाकणे पुढची गोष्ट. देशाचे पंतप्रधानपद भूषवणाऱ्या राजकीय पक्षाची सभा ‘वंदे मातरम्’ने संपते. ‘जन गण मन’ म्हणायची यांना का लाज वाटते कळत नाही. एकूणच काय, याच पद्धतीने चमनभाई लोकांसमोर येत राहिले तर गंगा खोऱ्यात चाललेली जादू ‘सह्याद्री’वर चालणे अवघड दिसते.
ताजाकलम : पालकसुद्धाकिती दूरदर्शी असू शकतात. पाळण्यातलं नावच त्यांनी ‘विनोद’ ठेवलं. या ‘विनोद’वाणीला निवडणूक संपेपर्यंत आराम दिला तर किमान चार-दोन जागा कमी होण्याचे संकट टळू शकते. तीच बाब नागपुरी ठसक्याची. या ठसक्यानं विरोधक कासावीस व्हायला हवेत. होतंय उलटं. नेमके मुद्दे प्रभावीपणे मांडण्याऐवजी माइकवरसुद्धा यांची इतकी आरडाओरड की यांचाच घसा जातो. ग्रामीण महाराष्ट्रात यश मिळवण्यासाठी कमळाबाईकडे एकमेव हुकमाचा एक्का आहे. काय योगायोग. कधीकाळी हे काम गोपीनाथराव एकहाती करत होते. गेल्यानंतरही त्यांचाच अंश कामाला येतोय. मुद्दा काय, भाजप आहे तिथेच आहे. लोकसभेतल्या यशात किती गुरफटून राहायचं, हे ज्याचं त्यांनी ठरवायचं.