आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Maharashtra Assembly Elections CM Prithviraj Chavan PC

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वैयक्तिक महत्त्वाकांक्षा मोठ्या, मुख्यमंत्र्यांचा अजित पवारांचे नाव न घेता आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षा महाराष्ट्राच्या हितापेक्षा मोठ्या असल्याचा आरोप महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अजित पवार यांचे नाव न घेता केला आहे. आघाडी कायम राहावी असे प्रयत्न काँग्रेसने कायम केले मात्र, गेल्या १५ वर्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने काल (बुधवार) प्रथमच अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव दिला आणि आघाडीला सुरुंग लावल्याचे मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसने काही वेळापूर्वी काँग्रेससोबतची आघाडी तुटली असल्याचे जाहीर करत, काँग्रेस चर्चेलाच तयार नसल्याचा आरोप केला होता. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या निवासस्थानी रात्री १० वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन केले. यात त्यांनी कोणाचेही नाव न घेता केंद्रातील सत्तेचा लाभ मिळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. त्यासोबतच त्यांनी भाजप- राष्ट्रवादीचे नाव न घेता, काही दिवसांत वेगळी आघाडी निर्माण होण्याचे संकेत दिले आहेत.
जागा वाटपाची चर्चा पूर्वअटींशिवाय होण्याची गरज होती, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने चर्चेआधीच अधिकच्या 30 जागांची मागणी मान्य होत असेल, तरच चर्चा होईल असे म्हटल्याचे, चव्हाणांनी सांगितले. गेल्या दोन महिन्यांपासून जागावाटपाची चर्चा सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसने कधीही मुख्यमंत्रीपदाचा मुद्दा उपस्थित केला नव्हता. काल (बुधवारी) अचानक त्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी अडीच - अडीच वर्षांचा प्रस्ताव दिला. राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्राच्या हितापेक्षा वैयक्तिक महत्त्वाकांक्षा अधिक असल्यामुळे त्यांनी आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, असे चव्हाणांनी सांगितले.
शिवसेना - भारतीय जनता पक्ष यांची युती संपुष्टात आल्यानंतर काही वेळातच राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी संपल्याचे जाहीर करणे हा विलक्षण योगायोग असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादीसोबतची आघाडी संपल्यामुळे राज्यातील आघाडी सरकारसंबंधी काय निर्णय घ्यायचा या बद्दल कायदेशीर सल्ला घेण्यात येईल आणि त्यानंतर निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले.