आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Maharashtra Polls, Udhav Thackeray News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आता कर्मदरिद्रीपणा करू नका, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा मित्रपक्षावरच घेतले तोंडसुख

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘काँग्रेस- राष्ट्रवादीला सत्तेवरून खेचण्याच्या उद्देशानेच युतीची स्थापना झाली असून, शिवसेनाप्रमुखांचे प्रत्येक स्वप्न साकार करण्यासाठी मला कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळवायची आहे. महाराष्ट्राने यंदा महायुतीसाठी सत्तेचं पान वाढून ठेवलंय. आता कर्मदरिद्रीपणा करू नका,’ अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी पक्षाच्या मेळाव्यात भाजपला सुनावले.

जागावाटपाच्या मुद्द्यावरून शिवसेना- भाजपमध्ये टोकाचा संघर्ष सुरू असतानाच आपली भूमिका जाहीर करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी रविवारी मुंबईतील रंगशारदामध्ये शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकार्‍यांचा मेळावा घेतला. या वेळी त्यांनी शिवसेनेच्या वतीने व्हिजन डॉक्युमेंटमध्ये तयार करण्यात आलेल्या ‘इंद्रधनुष्य’ या चित्रफितीचेही सादरीकरण केले. ‘मलाही युती हवी आहे,’ असे सुरुवातीलाच सांगून उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले, ‘शिवसेना- भाजपची युती खुर्चीसाठी झालेली नसून ती हिंदुत्वाच्या मुद्द्यावर झालेली आहे. त्यामुळे जागावाटपाच्या मुद्द्यावर तणातणी होणे अपेक्षित नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे, तरीही आमच्यात घासाघासी सुरू आहे, हे दुर्दैव म्हणावे लागेल. लोकसभेच्या वेळीही आम्ही काँग्रेसमुक्त देश करण्याचा निर्धार केला होता. त्यावेळी गोपीनाथजी मुंडे होते. आमच्या दोघांचेही ध्येय फक्त सत्ता आणण्याचे होते. त्यामुळे त्यावेळी असा वाद झाला नाही,’ असा टोलाही त्यांनी प्रदेश भाजपच्या नेत्यांना लगावला. ‘युती असेपर्यंत भाजपविषयी कोणीही अपशब्द काढायचे नाहीत,’ असे कार्यकर्त्यांना समजावतानाच ‘कोणत्याही परिस्थितीला तोड देण्यास सज्ज राहा,’असे फर्मानही उद्धव यांनी पदाधिकार्‍यांना सोडले.

देशात तुम्हीच राहा,राज्यात त्रास देऊ नका
‘लोकसभेत आम्ही प्रामाणिकपणे काम केले. आज देशात मोदींचे स्थिर सरकार आले आहे. त्यांना आता आम्हा मित्रपक्षांचीही गरज राहिलेली नाही. चांगले आहे. काँग्रेसला घालविण्याचा उद्देश सफल झाला. मात्र देशात तुम्ही सत्ता घ्या, पण राज्यात आम्हाला त्रास देऊ नका,’ असे सूचक आवाहन करत मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल, असे संकेत उद्धव ठाकरेंनी दले.

युती तुटली तर दु:खच
आघाडीच्या भ्रष्टाचाराला जनता कंटाळली आहे. त्यामुळे जनतेने महायुतीसाठी सत्तेचं पान वाढवून ठेवलं आहे. मला कोणत्याही परिस्थतीत सत्ता हवी आहे आणि युतीही हवी आहे. शिवसेनाप्रमुख, प्रमोद महाजन, अडवाणीजी, अटलजी यांच्या पुढाकारातून हिंदुत्वासाठी युती अस्तित्वात आली. याच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनाप्रमुखांना दहा वर्षे मतदान बंदी सहन करावी लागली. तरी पर्वा केली नाही. आता युती तुटली तर दु:ख होईल’, अशा भावना उद्धव यांनी व्यक्त केल्या.

महाराष्ट्राच्या सन्मानासाठी राष्ट्रपती निवडणुकीत प्रतिभाताईंना मतदान
राष्ट्रपतिपदासाठी काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान केल्याबद्दल भाजपने शिवसेनेवर टीका केली होती. त्याचा समाचार घेताना उद्धव म्हणाले, ‘देशाच्या सर्वोच्च पदावर महाराष्ट्राची महिला विराजमान होत असेल तर त्यांना आमचा पाठिंबा आहे,’असे त्या वेळी शिवसेनाप्रमुखांनी सांगितले होते. त्यामुळेच शिवसेनेच्या खासदारांनी त्या वेळी प्रतिभाताईंना मतदान केले होते. महाराष्ट्राच्या सन्मानासाठी त्या वेळी केलेल्या मतदानाचा आम्हाला आजही अभिमान आहे. याच पद्धतीने सर्वोच्च पदावर योग्य व्यक्ती असावा, याच भावनेने प्रणव मुखर्जींनाही पाठिंबा दिल्याचे उद्धव म्हणाले.

आप लेने वाले हो, देनेवाले नही..!
‘भाजपचे निरीक्षक ओम माथूर यांनी आम्हाला प्रस्ताव पाठवला. ‘तुम्ही १४० जागा घ्या, आम्हाला १३० द्या.’ मी म्हणातो ‘तूम लेने वाले हो, देनेवाले नही. जागा आम्ही देणार आहोतत. आम्ही १५५ पर्यंत खाली येऊ शकतो, त्यापेक्षा कमी नाही. कारण आता आमच्या उमेदवारांच्या जागा ठरल्या आहेत,’ असे उद्धव यांनी नमूद केले.

कस्पटासमान लेखाल तर शिवसैनिक वाघ आहेत
उद्धव ठाकरेंकडून मोदींवर टीका होत असल्याचा भाजपचा आरोप आहे. त्याचे खंडन करताना उद्धव म्हणाले, ‘मोदी आमचेही नेते आहेत. त्यांचा आम्हाला अभिमान आहे. काँग्रेसने ‘एक चहावाला’ अशी त्यांची संभावना केली होती. पण एक ‘चहावाला’ जर पंतप्रधान होऊ शकतो, आम्ही तर लढवैय्ये आहोत. आम्हाला यशापासून कोणी रोखू शकत नाही. आम्हाला कस्पटासमान लेखाल तर शिवसैनिक वाघ आहेत,’ असा खणखणीत इशाराही त्यांनी भाजपला दिला.