आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘राज’करिष्मा ओसरला;मनसेच्या पहिल्याच जाहीर सभेत विकासाच्या ब्ल्यू प्रिंन्टचे नव्याने वाचन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईत रविवारी झालेल्या जाहीर सभेने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रचाराचा नारळ फुटला खरा; पण मनसेप्रमुख राज ठाकरेंचा करिष्मा मात्र या सभेत कुठेही दिसून आला नाही. पंचरंगी लढतीमुळे मनसेचे महत्त्व वाढवणाऱ्या या निवडणुकीतील मनसेची ही पहिलीच सभा असूनही त्यात राजप्रेमींना जो‘धमाका’ अपेक्षित होता, तो ना गर्दीत ना कार्यकर्त्यांच्या उत्साहात...

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला खरा; पण पहिल्याच सभेतून राज्यातील जनतेपर्यंत मनसेचा आवाज घुमायला पाहिजे होता, तसे करण्यात राज यशस्वी झाल्याचे रविवारच्या सभेत तरी दिसले नाही. शिवाय बरीच वर्षे रेंगाळत पडलेल्या राज्याच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट त्यांनी काही दिवसांपूर्वी जनतेसमोर ठेवली असताना, पुन्हा तिचेच नव्याने जाहीर वाचन केल्याने उपस्थित प्रेक्षक कंटाळवाणे झाले. एकूणच करिष्मा संपत आल्याने सभेत उसने अवसान आणण्याचा राज ठाकरेंकडून प्रयत्न झाला, असेच म्हणावे लागेल.
लोकसभा निवडणुकीत आलेल्या मोठ्या अपयशामुळे मनसेचे नेते तसेच कार्यकर्त्यांमध्ये आधीच निराशेचे वातावरण होते. या वातावरणामधून त्यांना बाहेर काढण्यासाठी खरे तर राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्र ढवळून काढायला हवा होता. पण तसे झाले नाही.
शिवाय राज्याच्या विकासाची ब्ल्यू प्रिंटही प्रकाशित करण्यास मोठा उशीर झाला. त्यातच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पंधरा दिवस राज ठाकरे आजारी असल्याने मनसेतील वातावरण चिडीचूप झाल्यासारखे दिसले होते. आता नव्या दमाने राज हे प्रचारात उतरत असले तरी आता प्रचाराच्या अवघ्या काही दिवसांत ते संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढून मनसेमध्ये जिवंतपणा आणतील, असे वाटत नाही. तेच चित्र प्रचाराच्या पहिल्या सभेतून दिसून आले.

मनसेच्या मर्यादा उघड
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर राज्यात करिष्मा असलेले राज ठाकरे हे एकमेव नेते. बाळासाहेबांप्रमाणे थेट लोकांशी संवाद साधत सभा जिंकणारे वलयांकित नेते असलेल्या राज यांनी २००६ साली मनसेची स्थापना करून राज्याला शिवसेनेसमोर मोठे आव्हान उभे केले होते. पण आठ वर्षांनंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याने आता मनसेच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आणि त्याच विधानसभा निवडणुकीतील पहिल्याच प्रचारसभेत दिसून आल्या.

राज्यात प्रभाव पडणार का?
२००९साली मनसेचे १३ आमदार निवडून आले होते. पण आता तितकेही निवडून येतील की नाही, अशी शंका आहे. त्यामुळे आता प्रचारासाठी उरलेल्या पंधरा दिवसांत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करून पक्षाचे आहे तितकेच आमदार पुन्हा निवडून आणणे हेच राज ठाकरे यांच्यासमोरील मोठे आव्हान आहे. आता ते मुंबई सोडून राज्याच्या इतर भागात आपल्या भाषणाने किती प्रभाव पाडतात, यावरच मनसेचे भवितव्य अवलंबून असेल. एखाद्या पक्षाची धुरा फक्त एकाच नेत्याच्या हाती असली तर लोकशाहीत अशा पक्षाला किती कठीण प्रसंगातून जावे लागते, त्याचा प्रत्यय मनसेच्या सभेत आला.

गर्दी घटली : बाळा नांदगावकर यांच्याप्रमाणे मनसेचे सरचिटणीस आमदार प्रवीण दरेकर हे राज ठाकरेंचे विश्वासू सहकारी. त्यांचा मागाठाणे मतदारसंघ उत्तर मुंबईतील उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेतून राज ठाकरे महाराष्ट्रातील जनतेला मार्गदर्शन करणार होते. यामुळे मोठ्या संख्येने या सभेला कार्यकर्ते येतील, अशी अपेक्षा होती. पण गर्दीचा आकडा काही आठ हजारांच्या पुढे जाऊ शकला नाही.