आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ब्ल्यु प्रिंटला घटस्थापनेचा मुहूर्त, राज ठाकरे आज सादर करणार \'ड्रीम प्रोजेक्ट\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'हो,हे शक्य आहे' असे घोषवाक्य असलेली आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा ’ड्रीम प्रोजेक्ट’ असलेली महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट सादर करण्यास अखेर घटस्थापनेचा मुहूर्त सापडला आहे. महाराष्ट्राच्या पुढील सुमारे अर्धशतकाचा विचार करून तयार केलेल्या या विकास आराखड्यात प्रामुख्याने नियोजन आणि लोकसहभागावर भर देण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
गेले दोन आठवडे महायुती आणि आघाडीच्या जागावाटपाच्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात गुरुवारी सायंकाळी पाच वाजता मनसेच्या ब्ल्यू प्रिंटचे सादरीकरण होणार आहे. विशेष म्हणजे खुद्द राज ठाकरे हे सादरीकरण करणार आहेत.

सध्या सोशल मीडियावरून मनसेच्या वतीने या ब्ल्यू प्रिंटचा जोरदार प्रचार सुरू आहे. मुंबईतही अनेक ठिकाणी लावलेल्या होर्डिंग्जनी जनतेचे लक्ष वेधून घेतले आहे. मनसेचा झेंडा आणि राज ठाकरेंची ब्लॅक अँड व्हाइट प्रतिमा असलेल्या या होर्डिंग्जवर "जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवूया.. हो, हे शक्य आहे' असा मजकूर असून "महाराष्ट्राचा विकास आराखडा' असे नाव ब्ल्यू प्रिंटला देण्यात आले आहे. विशेष म्हणजे मराठीचा कट्टर पुरस्कार करणाऱ्या मनसेने इंग्रजीमध्येही ब्ल्यू प्रिंटची जाहिरात केली आहे.

आजारपणाचे सावट
आपला ड्रीम प्रोजेक्ट असलेली ब्ल्यू प्रिंट पक्षप्रमुख राज ठाकरे स्वत: सादर करणार आहेत. सध्या मलेरियाने आजारी असलेले आणि खोकल्याने त्रस्त असलेले राज ठाकरे उद्याचे सादरीकरण कसे करणार याची चिंता त्यांच्या निकटवर्तीयांना सतावते आहे.

> ब्ल्यू प्रिंट सादरीकरणाची वेळ एकूण अडीच तास
> पहिली पंधरा मिनिटे राज ठाकरे यांचे प्रास्ताविक.
> राज्याची खालावलेली स्थिती पाहता ब्ल्यू प्रिंटमध्ये पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्त्वावर भर
> नैसर्गिक स्त्रोतांद्वारे मिळणाऱ्या मोफत साधनसंपत्तीचा अपव्यय रोखण्यासाठी त्याच्या वापरावर माफक कर लावण्याची शिफारस

काय असेल विकास आराखडा?
मनसेच्याब्ल्यू प्रिंटमध्ये शिक्षण, आरोग्य, औद्यागिक विकास, पायाभूत सुविधा अशा एकूण अकरा प्रमुख मुद्द्यांवर भर देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या अकरा मुद्द्यांबाबतच्या समस्यांचा केवळ ऊहापोह करण्याऐवजी त्याच्या उपायांवर विस्तृत चर्चा करण्यात आली आहे. या समस्यांवर उपाय योजताना त्यात जास्तीत जास्त लोकसहभाग कसा राहील याबाबतही नियोजन करण्यात आले आहे. तसेच विकास आराखड्यातल्या योजना राबवताना आवश्यक असणारा निधी कसा उभारता येईल याची विस्तृत चर्चा करण्यात आली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पहिल्यांदा अमेरिकेची सत्ता संपादन करताना ‘येस वी कॅन' ही आपल्या प्रचाराची थीम ठेवली होती. राज ठाकरेंनीही त्याच धर्तीवर आपल्या ब्ल्यू प्रिंटचे "हो, हे शक्य आहे' असे घोषवाक्य ठेवले आहे. मनसेच्या प्रचाराची मुख्य थीमही हीच असेल, असे पक्षातील एका वरिष्ठ नेत्याने ‘दिव्य मराठी’ला सांगितले.