आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाट कशाला म्हणतात ते महाराष्ट्र आणि शिवसैनिक दाखवून देईल - उद्धव ठाकरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिवसेना - भारतीय जनता पक्ष युती तुटल्यानतंर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच प्रचारसभेत भाजपवर जोरदार हल्ला चढवला. युती तुटल्यानंतर महायुतीतील घटकपक्षही शिवसेनेला सोडून भाजपला जावून मिळाले आहेत. त्यावर उद्धव यांनी रामदास आठवले यांना परत येण्याचे आवाहन करत उपमुख्यमंत्री पदाची ऑफर दिली आहे.
मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथे आयोजित सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपने काही जागांसाठी, त्याही उपर्‍या उमेदवारांच्या जोरावर 25 वर्षांच्या मैत्रीला तोडल्याचा आरोप केला. मोदी लाट आता ओसरली असून लोकसभेनंतर नऊ राज्यात झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणूकीतून ते सिद्ध झाल्याचे सांगितले.
मोदी लाट ओसरली
भाजपला आव्हान देताना ते म्हणाले, 'लाट काय असते आणि महाराष्ट्र कशाला म्हणतात हे आता शिवसैनिक दाखवून देईल. भाजप जर म्हणत असेल उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदासाठी युती तोडली तर, होय आम्हाला मुख्यमंत्री पद हवे आहे. आम्ही दिल्ली आणि संपूर्ण देश तुम्हाला दिल्यानंतर महाराष्ट्र आम्हाला देण्याचा दिलदारपणा तुमच्यात नाही. आम्ही देशातील एकाही राज्यात जागा मागत नाही, मग आमच्या घरात तुम्ही आम्हालाच का नाकारता.' असा सवाल त्यांनी केला.
अमित शहांना अप्रत्यक्ष टोला
आदिलशाही - कुतुबशाहीचे पतन झाले आहे, असे सांगितले तेव्हा कार्यकर्त्यांमधून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधात घोषणा दिल्या गेल्या. त्यावेळी उद्धव यांनी कार्यकर्त्यांना मध्येच गडबड करु नका नाही तर, माझ्या तोंडून चुकून एखादे नाव निघून जाईल असे म्हणत शहांना अप्रत्यक्ष टोला हाणला.
'मांजराच्या गळ्यात घंटा'
भाजप नेत्यांनी युती तुटल्याची घोषणा केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी फोन करुन दुःख होत असल्याचे सांगितले. तेव्हा मी त्यांना जे बोललो नाही, ते आता बोलतो, असे सांगत उद्धव ठाकरे म्हणाले, 'भाजपनेत्यांना वाटत असेल की, मांजराच्या गळ्यात घंटा बांधली, पण त्यांचा हा गैरसमज आहे. हा वाघ आहे.' गळ्यात घंटा बांधण्याच्या आनंदात असणार्‍यांना विजयाच्या घंटानाद करुन दणाणून सोडू असेही ते म्हणाले.
आठवलेंना परत येण्याचा आवाहन
रिपब्लिकन नेते रामदास आठवले हे आज (शनिवार) शिवसेनेची साथ सोडून भाजपसोबत गेले आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्रीपद आणि विधानपरिषदेच्या दोन जागांची मागणी शिवसेनेला केली होती. भाजप सोबत जात असल्याचे सांगताना त्यांनी अमित शहा यांनी केंद्रात मंत्रिपद देण्याचे कबूल केल्याच्या सांगत भाजपसोबत युती केली आहे. त्यांना उद्धव ठाकरे यांनी परत येण्याचे जाहीर आवाहन केले. उद्धव म्हणाले, 'आठवले साहेब तुम्हाल उपमुख्यमंत्रीपद पाहिजे ना, ते देतो. परत या. बाळासाहेब आणि बाबासाहेबांच्या विचारांचा महाराष्ट्र घडवू या.'

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे वाचा, पुढील स्लाइडमध्ये