आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • ShivSenaa Making Campaion ON BalaSaheb Thackeray Name Marathi News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवसेनेला आधार बाळासाहेबांच्या नावाचाच;भगवा फडकावण्याचे स्वप्न व्हिजन डॉक्युमेंटवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - इच्छा नसूनही स्वबळावर लढण्याचे शिवधनुष्य उचलावे लागलेल्या शिवसेनेला राज्यात सत्तेचा सोपान गाठण्यासाठी केवळ एकाच नावाचा उपयोग होणार आहे आणि तो म्हणजे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न साकार करण्याची साद घालतानाच शिवसेना आपल्या व्हिजन डॉक्युमेंटच्या आधारे प्रगतिशील महाराष्ट्राचे स्वप्न जनतेला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे.
भाजपबरोबर युती कायम राहीलच, या अपेक्षेवर राहून शिवसेनेने प्रचाराची रणनीती आखली होती. त्यासाठी एक चित्रफीतही तयार करण्यात आली होती. परंतु आता युती तुटल्याने शिवसेनेने नव्याने रणनीती तयार केली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे, संजय राऊत, अनिल देसाई, सुभाष देसाई यांनी तयार केलेल्या या रणनीतीत मतदारांना भावनिक आवाहन करण्यावर सर्वाधिक भर दिला जाणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदी बसवून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करण्याचे आवाहन मतदारांना केले जाणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणारा शिवसैनिक मराठी मतदार अजूनही मोठ्या संख्येने आहे. शिवसेना सोडून गेलेले छगन भुजबळ, नारायण राणे अजूनही बाळासाहेबांचे नाव आदरानेच घेतात. प्रचारात हाच मुद्दा उपस्थित करून कट्टर शिवसैनिकांना विधानसभेवर भगवा फडकवण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याचे आवाहन केले जाणार आहे.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यास व्हिजन डॉक्युमेंटमधील योजना चांगल्या पद्धतीने राबवून जनतेला सुखाचे दिवस येतील, असा आशावादही निर्माण केला जात आहे. व्हिजन डॉक्युमेंटमधील काही योजनांच्या चित्रफिती तयार करण्यात आल्या असून त्याचाही प्रचारात वापर केला जात आहे. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचारावर आसूड ओढण्यात येणार असून भाजपविरोधातही प्रचार केला जाणार आहे. हिंदुत्वाचा मुद्दा बाजूला ठेवून राज्याचा विकास आणि मराठी माणसाला मानाचे स्थान यावर प्रचारात भर दिला जाणार आहे.

संपूर्ण राज्यात उद्धव ठाकरे फिरणार असून काही सभा आदित्य ठाकरेही संबोधित करणार आहेत. ११ ते १३ ऑक्टोबरदरम्यान वांद्रे येथील ‘एमएमआरडीए’चे मैदानही शिवसेनेने अगोदरच बुक करून ठेवले आहे. समारोपाची सभा याच मैदानात घेतली जाईल तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवसेनेचे बदललेले रूप दाखवण्यात येणार असल्याचेही समजते.

भाजपवर फोडले युती तोडल्याचे खापर
युती तोडण्याचे पातक भाजपच्या डोक्यावर फोडण्याचा शिवसेनेचा प्रयत्न राहील. त्यामुळे युतीचा पारंपरिक मतदार शिवसेनेकडे वळेल, अशी आशा शिवसेनेच्या नेत्यांना वाटते. भाजपने ऐनवेळी कसा दगा दिला पुन्हा काँग्रेस- राष्ट्रवादीला पोषक वातावरण राज्यात निर्माण केले, हे मतदारांच्या मनावर बिंबवण्याचाही शिवसेनेकडून प्रयत्न होईल. शनिवारी पहिल्याच सभेत दोन्ही कॉँग्रेसपेक्षा भाजपवर टीका करून उद्धव ठाकरेंनी ते दाखवूनही दिले आहे. यातून आघाडी सरकारवर रोष असलेला मतदार फक्त शिवसेनेकडेच कसा वळेल, असा त्यांचा प्रयत्न आहे.