आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uddhav Thackeray News In Marathi, Shiv Sena, Divya Marathi

शिवसेनेने धनुष्य ताणले : भाजपला १३५ जागा देणार नाही : उद्धव ठाकरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विधानसभेच्या १३५ जागा मागणा-या भाजपला एकही जागा वाढवून देणार नाही. सध्या वातावरण चांगले आहे. भाजपने ते बिघडवण्याचा प्रयत्न करू नये. आनंदाने सत्ता आणू, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी सुनावले. प्रत्येकाकडेच पर्याय असतो, असे म्हणत स्वबळावर लढण्याचे संकेतही त्यांनी दिले. तथापि, जागावाटपाची चर्चा सुरू असून, दोन-तीन दिवसांत त्यावर तोडगा निघेल, असेही ते म्हणाले.

भाजपचे प्रभारी राजीवप्रताप रुडी यांनी रविवारीच १३५ पेक्षा कमी जागा घेणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यापाठोपाठ उद्धव यांनी दिलेला इशारा महत्त्वाचा मानला जात आहे. गोरेगावात शिवसेनेतर्फे अपारंपरिक ऊर्जा साधनांच्या सादरीकरण कार्यक्रमात उद्धव बोलत होते. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ही युती केली होती, असे ते म्हणाले. २५ वर्षांपासूनची युती अभेद्य असून पुढेही राहावी. त्यामुळे मी नकारात्मक बोलणार नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

माधव भंडारी वंदनीय : भाजपकडून ओमप्रकाश माथूर यांच्याकडे राज्याची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांच्याशीच मी चर्चा करत आहे. वंदनीय, पूजनीय माधव भंडारी यांच्या वक्तव्यांबाबत मला काही बोलायचे नाही.

ताकद वाढवण्यासाठी भाजपचे डावपेच : गेल्या २००९च्या निवडणुकीत शिवसेनेने १६९, तर भाजपने ११९ जागा लढवल्या. शिवसेनेने ४४, तर भाजपने ४६ जागा जिंकल्या. आता दोन्ही पक्षांनी १३५-१३५ जागा लढवाव्यात आणि उरलेल्या १८ जागा रिपाइं, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रासप आदी मित्रपक्षांना द्याव्यात असा भाजपचा प्रस्ताव आहे.

उद्धव ठाकरे यांचे युक्तिवाद असे
एक फॉर्म्युला चालतो, दुसरा का नाही ?
जागावाटपात शिवसेना १७१ व भाजप ११७ चे सूत्र ठरले आिण ज्याचे आमदार जास्त त्याच्याकडे मुख्यमंत्रिपद असा फॉर्म्युला ठरला होता. भाजपला मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला चालतो, मग जागांबाबतचा का चालत नाही?

आम्ही मदत केली, आता त्यांनी करावी
अनेक पक्ष सोबत असताना भाजपने लोकसभेसाठी मिशन २८२ राबवले. आम्ही विरोध केला नव्हता. आता युवा सेनेने १५० जागांचे मिशन सुरू केले आहे. त्यात चूक काय? लोकसभेला आम्ही मदत केली. आता भाजपने करावी.

भाजपच्या जागी चाचपणी नाही
मी रोज शेकडो कार्यकर्त्यांना भेटतो. त्याचा अर्थ असा नाही की मी भाजपच्या जागांवर उमेदवार शोधत आहे. यात कही काळेबेरे नाही. जागावाटपाची चर्चा सुरू आहे. प्रस्ताव दिलेले आहेत. एक-दोन दिवसांत निर्णय होईलच.

आणि घूमजावही मोदी लाटेची खिल्ली नाहीच
लोकसभेच्या वेळी मोदी लाट नसल्याचे वक्तव्य मी केलेच नव्हते. एकूणच देशातील लोकांच्या भावनेबद्दल बोललो होतो. मुंबईत राहत असल्याने लाटा पाहिल्या आहेत. तेच सांगण्याचा माझा उद्देश होता.

शिवसेना नमते घेण्याची शक्यता
कोल्हापूर | मोदींमुळेच शिवसेनेच्या अनेक जागा आल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपचा आकडा शिवसेना मान्य करील असे वाटते, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी आपले मत व्यक्त केले.

शिवसेनाप्रमुखांचा शब्द होता
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी माझे जिव्हाळ्याचे संबंध होते. मी किंवा माझ्या घरातील कोणी थेट पदावर बसणार नाही, असे बाळासाहेब माझ्याजवळ म्हणाले होते. नव्या नेतृत्वाने बदल करायचे ठरवले तर काय करणार? पण तशी वेळ येणार नाही, असे पवार म्हणाले.

आत्याबाईंना मिशा असत्या तर...
उद्धव यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या भूमिकेवर पवारांनी "आत्याबाईंना मिशा असत्या तर...' अशी मिश्कील प्रतिक्रिया दिली. भुवया ताणून त्यांनी साभिनय हा शब्द उच्चारल्याने पत्रपरिषदेत एकच हशा पिकला.