आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मातीच्या श्री मूर्तीचीच प्रतिष्ठापना आणि घरातच विसर्जन करा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणेशोत्सव तोंडावर आहे. श्रींच्या स्वागताची तयारीही सुरू झाली असेल. दैनिक भास्कर समूहानेही तयारी केली आहे. एक विनम्र प्रयत्न आणि आवाहन.

पहिला प्रयत्न आणि आवाहन असे की, तुम्ही मातीच्या श्री मूर्तीचीच प्रतिष्ठापना करा. लहान असेल तर सोन्याहून पिवळे. कारण मातीच्या मूर्तीच सर्वांत शुभ आणि फलदायी असतात. मूर्ती पृथ्वीतत्त्व म्हणजे मातीच्याच असाव्यात. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) नकोत, असे शास्त्र आणि तत्त्वचिंतकही सांगतात.

दुसरे आवाहन असे की, तुम्ही मातीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करा आणि विसर्जनाची वेळ येईल तेव्हा ती तलाव, विहिरीत विसर्जित करण्याऐवजी घरातच एखादे स्वच्छ भांडे घ्या, शुद्ध पाण्याने ते भरा आणि मूर्तीचे विसर्जन करा. विरघळलेली माती आपल्या घरातील तुळस किंवा कोणत्याही रोपट्याच्या आळय़ात टाका. रोपट्याच्या रूपांत श्रींचे तुमच्या घरात नेहमीच वास्तव्य राहील. ते अतिशय शुभ ठरेल. मूर्ती लहान असल्यास सहजपणे विरघळेल. विसर्जनाच्या वेळी आपले पूर्ण कुटुंब सोबत असेल आणि असे करून तुम्ही मोठी सामाजिक बांधिलकी जपत असाल.

सध्या होते असे की, पीओपीच्या मोठमोठय़ा मूर्ती तलाव, विहिरींत विसर्जित केल्या जातात. महिनोन् महिने त्या पाण्यात तशाच राहतात. विरघळत नाहीत. पाणी आटून जाते आणि आमचे आराध्य दैवत गणरायाची मूर्ती तेथेच असते. यातून श्रींचा अवमान होतो. आमची गणरायावर नितांत र्शद्धा आहे. कोणत्याही स्वरूपात मूर्तीची विटंबना आम्हाला सहन होईल काय? तेच गणराय, तोच ईश्वर आम्हाला मुबलक पाणी देतो, पण तेच पाणी आम्हाला सहजासहजी मिळत नाही. कारण तलाव, जलाशयांची साठवणक्षमता दिवसेंदिवस कमी होत आहे. आम्ही स्वत: आमचे पर्यावरणही शुद्ध ठेवू शकत नाही आणि नाइलाजाने पाणीटंचाईलाही तोंड द्यावे लागते.

दैनिक भास्कर समूहाने यासंदर्भात वेगवेगळय़ा क्षेत्रांतील धर्मगुरू, संत, विद्वानांचा सल्ला घेतला तेव्हा सर्वांनीच मातीची लहान गणेशमूर्तीच सर्वोत्तम असते, असे सांगितले. घरातच विसर्जित केल्यास अतिउत्तम. हे संत आहेत. चैतन्य महाराज देगलूरकर, सतपाल महाराज, अनिरुद्ध बापू, दिंडोरीच्या स्वामी सर्मथ मठाचे अण्णासाहेब मोरे, स्वामी शारदानंद सरस्वती, बालयोगी संत बालकदासजी, स्वामी रमेशभाई ओझा, सद्गुरू श्री. भागवत प्रियादासजी आणि स्वामी अवधेशानंदजी महाराज.

बस. तुम्हालाच दोनच गोष्टी करायच्या आहेत. मातीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करा आणि तलावाऐवजी घरातच विसर्जन करा. एक स्वच्छ भांडे घ्या, शुद्ध पाण्याने ते भरा व विसर्जन करा. विरघळलेली माती, तुळस किंवा इतर कोणत्याही रोपट्याच्या आळय़ात टाका. रोपट्याच्या रूपात श्रींचा घरात कायम वास राहील.

तुम्ही जर तुमच्या गल्लीत, वसाहतीत दहा घरांत मिळून एखाद्या चौकातही पीओपीऐवजी मातीच्या श्री मूर्तीची प्रतिष्ठापना करू शकलात, तर आणि तलाव किंवा विहिरींऐवजी एखाद्या मोठय़ा भांड्यात विसर्जित कराल. गल्ली, शहर, राज्य, देश, तेथील पर्यावरण आणि भविष्याप्रती तुमचे मोठे योगदान राहील.

धन्यवाद
भास्कर परिवार