आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशमूर्ती स्थापना, पूजा शास्त्रानुसारच व्हावी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रासह देशभरात आज गणेशोत्सवाचे जे स्वरूप पाहावयास मिळत आहे, ती लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी समाजाला दिलेली शिकवण आहे. टिळकांनी गणेशोत्सव आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती हे दोन उत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरे करण्याची परंपरा सुरू केली. त्यामागे त्यांचा उद्देश देशहितासाठी समाजप्रबोधन हा होता. गेल्या काही काळापासून या उत्सवांची फक्त लोकप्रियताच वाढली नाही, तर त्याचे स्वरूपदेखील फार बदलले आहे. आधुनिक तंत्रज्ञान, वेगवेगळ्या धातूंचा, रसायनांचा शोध यामुळे शाडूच्या मातीच्या गणपतीमूर्तींची जागा प्लास्टर ऑफ पॅरिस, घातक रसायन रंगांनी तयार होणार्‍या महाकाय मूर्तींनी घेतली. त्यामुळे पर्यावरणास मोठा धोका निर्माण झाला आहे. प्लास्टिक, रासायनिक पदार्थ यांच्या वापरामुळे पर्यावरणच नाही, तर मानसिक आरोग्यदेखील दूषित होते. वेदशास्त्रांमध्ये सणवार, व्रतवैकल्य याबाबत सांगितलेले नियम-विधी यांचा उद्देश फक्त श्रद्धा, मनोरंजन यापुरता र्मयादित नाही. त्यामागे मानवाचे कल्याण, मानसिक, शारीरिक आरोग्याचा विचार होता. मानव निसर्गाशी निगडित राहावा, प्रत्येक ऋतूनुसार त्याचा आहार, विहार असावा, यासाठी सण-उत्सवांचे नियम सांगितले गेले आहेत.

गणेशोत्सवात श्रींची शाडू मातीची मूर्ती आणून, विधिपूर्वक प्राणप्रतिष्ठा करून, पूजा-अर्चा करून ती विसर्जित करावी. शाडू मातीची मूर्ती पाण्यात विसर्जित केल्याने पर्यावरणाची हानी होत नाही; परंतु प्लास्टर ऑफ पॅरिस, रासायनिक रंग वापरून तयार केलेल्या मोठय़ा आकाराच्या मूर्तींमुळे निसर्गास धोका निर्माण होत आहे. या उत्सवात होणार्‍या ध्वनी, जल, वायू प्रदूषणामुळे होणारे पर्यावरणाचे असंतुलन या मुद्दय़ांकडे समाजजीवनात प्रबोधनात्मकदृष्ट्या पाहण्याची व पुन्हा एकदा या उत्सवांचा मूळ उद्देश समजावून घेण्याची वेळ आता आली आहे.

प्राचीन काळी ऋषी-मुनींनी उत्सवाचे विधी सांगताना मानव आणि निसर्ग यांची योग्य सांगड घातली. उदा. गणपती मूर्तीवर अर्पण करण्यात येणारी 21 पत्री. त्यात ज्या वनस्पतींना मानवी जीवनात मोठे महत्त्व आहे. देवतांची आराधना, उपासना ही केवळ निसर्गतत्त्वांनुसार करावी, असे नव्हे, तर ती निसर्ग रक्षणासाठीही करण्यात यावी, यासाठी जागृतीही केली जाणे आवश्यक आहे. दुर्गा सप्तशतीतील एका श्लोकामध्येही असाच संदेश देण्यात आलेला आहे, की जर मानवाने निसर्ग असंतुलित करण्याचा प्रयत्न केला. तर तो अप्रत्यक्षपणे भगवतीचे रूप विद्रूप करणारा आहे. अशा स्थितीत सर्व भाविकांना सांगावेसे वाटते की, या गणेशोत्सवात आपण निसर्ग रक्षणाचा संकल्प करू या! याचा साधा-सरळ मार्ग आहे, की गणेशमूर्ती आकाराने लहान आणि शाडूच्या मातीची असावी, त्याचे विसर्जन घरातच करण्यात यावे. विसर्जन करण्यात आलेले ते शाडूमाती मिश्रित पाणी वृक्ष आणि परिसरातील झाडांना देण्यात यावे. गणेशोत्सवाचे स्वरूप निसर्गपूरक करण्यासाठी ते निश्चितच सहायक ठरेल.
प.पू. अण्णासाहेब मोरे, प्रमुख, अखिल भारतीय श्री स्वामी सर्मथ सेवा मार्ग. दिंडोरी (नाशिक), महाराष्ट्र.