आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुख, समृद्धीच्या पावलांनी चालत आली महालक्ष्मी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुख-समृद्धीच्या पावलांनी बुधवारी (11 सप्टेंबर) घरोघरी गौरी आवाहन करण्यात आले. देखण्या मखरांमध्ये महालक्ष्मी सोनपावलांनी आल्या असून त्यांच्या येण्याने प्रत्येक कुटुंबात आज आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

सकाळपासूनच स्थापनेसाठी महिलांची लगबग सुरू होती. सकाळचा आणि दुपारचा असे दोन मुहूर्त असल्याने महिलांनी गौरी आवाहन त्या वेळांमध्ये केले. पारंपरिक जरीकाठाच्या आणि मांगल्याचे प्रतीक मानल्या जाणार्‍या लाल, पिवळ्या, हिरव्या सिल्कच्या साड्या, डोक्यात माळलेला गजरा आणि सौभाग्याची सर्व आभूषणे घालून महिलांनी मखर सजवले. विधिवत पूजा करून ‘महालक्ष्मी कोण्या पाऊली आली, महालक्ष्मी सोन पावली आली’ असे म्हणत महालक्ष्मीचे स्वागत केले.

शहरातील घराघरांतून विराजमान झालेल्या महालक्ष्मींमुळे सर्वत्र चैतन्य पसरले होते. धुपाचा सुगंध सर्वत्र दरवळत होता. आप्तेष्ट अनेक दिवसांनंतर एका ठिकाणी जमले असल्याने सर्वांमध्ये उत्साह संचारला होता. नववधूंना आपल्याकडील महालक्ष्मी कशी आहे, त्यांची पूजा-आराधना कशी करायची हेदेखील अनेक घरांतून दाखवण्यात आले.

तीन दिवसांच्या वास्तव्यासाठी येणार्‍या महालक्ष्मी घरात चिरंतन टिकणारी सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येतात. त्यांच्या स्वागतासाठी मखर घराघरांतून लावले होते. मखरामध्ये अनेकविध वस्तूंचा वापर करत सजावट करण्यात आलेली होती. संपूर्ण साच्यांना तयार करून ठेवल्यानंतर मुखवट्यांचे पूजन करून लक्ष्मीपावलांची रांगोळी काढत गृहलक्ष्मी महालक्ष्मींना घेऊन आल्या. गुरुजींनी विधिवत पूजा करून त्यांची स्थापना केली.

लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नव्हे !
श्री म्हणजे लक्ष्मी आणि लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नाही. आजच्या युगात अनेक जण लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा एवढाच अर्थ घेतात. सूक्तात 15 पाठ आहेत आणि 16 वी रुचा आहे. त्यामध्ये असे म्हटले आहे की, आरोग्य, आयुष्य, सत्ता, वर्चस्व, पशू, पक्षी, धन, धान्य आणि बहुपुत्र हे शोभायमानतेने माझ्याकडे येवोत. म्हणजे हे सर्व नैतिक आणि अभिमानास्पद मार्गाने माझ्याकडे यावेत, अशी गौरीकडे आराधना केली जात असल्याची माहिती महिला पुरोहित सुजाता भावठाणकर यांनी दिली.