आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाडू मूर्तींमध्ये नाशिकचा गजर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - लालबागचा राजा, दगडूशेठ गणपती, सिद्धिविनायक या मूर्तींपाठोपाठ यंदा नाशिकचा ढोल्या गणपती, नवशा गणपती, महंत गणेश या स्थानिक मूर्तींच्या विलोभनीय रूपांचीही मोहिनी भक्तांवर पडत आहे. म्हणूनच बाजारात उपलब्ध स्थानिक गणेशांच्या रूपांना यंदा चांगली मागणी आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या मूर्ती पर्यावरण पूरक शाडू मातीत उपलब्ध आहेत.

गणेशोत्सवास अवघे दोन दिवस राहिले असून, मूर्तीची नोंदणी सुरू झाली आहे. नेहमीप्रमाणे यंदाही दुकानांमध्ये लालबागच्याच राजाचा बोलबाला आहे. विशेष म्हणजे या गर्दीत नाशिकच्या बाप्पांनीही आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. त्यात आनंदवली येथील नवशा गणपती, रविवार कारंजा येथील चांदीचा गणपती, जुन्या नाशकातील महंत गणेश आदींचा समावेश आहे. सिडको परिसरातील गणेश चौक येथील शांताराम मोरे यांनी विशेषत: नाशिकच्या गणेश मूर्तींची विलोभनीय रुपे साकार केली आहेत.

शाडू मूर्ती घडविणारी चौथी पिढी
गणेश मूर्ती बनवणारी आमची ही चौथी पिढी आहे. शाडू मातीचे अष्टविनायक आणि नाशिकच्या गणपतींची रूपे हे आमचे वैशिष्ट्य आहे. नाशिककरांकडूनही या मूर्तींना चांगला प्रतिसाद मिळत आहे. - शांताराम मोरे, मूर्तिकार

सिद्धटेकऐवजी नाशिकचा गणेश
मोरगावचा मोरेश्वर, सिद्धटेकचा सिद्धिविनायक, पालीचा बल्लाळेश्वर, महडचा वरदविनायक, थेऊरचा चिंतामणी, लेण्याद्रीचा गिरिजात्मज, ओझरचा विघ्नेश्वर आणि रांजणगावचा महागणपती यांचा समावेश अष्टविनायकांत होतो. काही गणेशभक्त गणेशोत्सवात आपल्या घरी यापैकी एका मूतीर्ची प्रतिष्ठापना करतात. त्यामुळे मूर्ती घेताना व शाडू मातीच्या मूर्ती जेथे उपलब्ध आहेत, तेथे अष्टविनायक मूर्ती बघावयास मिळते. सिद्धटेकचा सिद्धिविनायक उजव्या सोंडेचा आहे. घरात सहसा उजव्या सोंडेच्या गणपतीची प्रतिष्ठापना करीत नाहीत, असा समज असल्यामुळे पर्याय म्हणून मूर्तिकारांनी नाशिकच्या गणपतींच्या प्रतिकृती तयार केल्या आहेत.