नैराश्याच्या उपचारासाठी नवे / नैराश्याच्या उपचारासाठी नवे संशोधन, बाजार ताब्यात घेण्यासाठी कंपन्यांमध्ये चुरस

इयान हॅनली दहावी इयत्तेत होता तेव्हा त्याला पहिल्यांदा नैराश्यविकाराने ग्रासले. त्यानंतर सतत त्याला मानसोपचार तज्ज्ञांच्

मँडी आेकलँडर

Jul 30,2017 03:11:00 AM IST
इयान हॅनली दहावी इयत्तेत होता तेव्हा त्याला पहिल्यांदा नैराश्यविकाराने ग्रासले. त्यानंतर सतत त्याला मानसोपचार तज्ज्ञांच्या उपचाराची गरज भासू लागली. गेल्या ६ वर्षांत तो दीर्घकाळ प्रभावी असणाऱ्या आैषधांच्या शोधात आहे. किमान आठवडाभर तरी आैषधाचा प्रभाव टिकावा अशी अपेक्षा असते. तो म्हणतो नैराश्याचा शब्दश: अर्थ उदास वाटणे असा होतो. तुम्ही जिवंत नाही, मात्र जगण्यासाठीची सर्व कर्तव्ये पार पाडणे बंधनकारक असते, अशीच ही मनोवस्था आहे. नैराश्यरोधक आैषधांचा प्रभाव अल्पकाळ टिकतो. त्याला पटकथाकार होण्याची इच्छा होती.

मात्र, सध्या त्याचा बहुतांश वेळ नव्या उपचारांच्या शोधार्थ जातो. अन्न आणि आैषधी प्रशासनाने याच्या इलाजासाठी २० पेक्षा अधिक आैषधांना मंजुरी दिली आहे. मात्र, नैराश्यासाठी अधिक आैषधांना मंजुरी दिल्यास त्याचा चांगला प्रभाव पडत नाही. ६० वर्षांपूर्वी प्रथम नैराश्याच्या उपचारार्थ आैषधे उपलब्ध झाली होती. आैषधाचा काहीच प्रभाव पडला नसल्याची अनेक उदाहरणे आहेत. जीवन सुसह्य करण्यासाठी निर्माण केलेल्या या आैषधांचा प्रभावच निराशाजनक आहे.
यामुळे याच्या विक्रीत खंड पडला नाही. १२ % अमेरिकी नागरिकांनी याचे सेवन केले आहे. याच्या विक्रीतून मिळणारा महसूल २०१४ मध्ये १४.५ अब्ज डॉलर्स होता, तर २०१७ मध्ये १७ अब्ज डॉलर्स होण्याची शक्यता आहे. ६.७ % प्रौढ व्यक्ती म्हणजे १ कोटी ६० लाख अमेरिकी नागरिक नैदानिक नैराश्याचे रुग्ण आहेत. लहान मुले आणि तरुणांचाही यात समावेश आहे. जगातील शारीरिक दुर्बल लोकांमध्ये नैराश्य हे प्रमुख कारण दिसून आले आहे. अमेरिकी अर्थव्यवस्थेला यामुळे दरवर्षी २१० अब्ज डॉलर्सचे नुकसान होत आहे.
गेल्या ३० वर्षांमध्ये नैराश्याच्या आैषधांविषयी व्यापक संशोधन झाल्याचे दिसून आले नाही. आता यात बदल होऊ शकतो. नैराश्य हा एकच विकार नसल्याचे वैज्ञानिकांच्या निदर्शनास आले आहे. याचे अनेक कारक घटक असून तो एकत्रित परिणाम आहे. या प्रत्येक समस्येवर विविध उपचार देण्याच्या निष्कर्षाप्रत संशोधक आले आहेत. गेल्या ३० वर्षांत अमेरिकेत आत्महत्येचा दर सर्वाधिक आहे. विशेषज्ञांचे म्हणणे आहे की, लवकर परिणाम साधणाऱ्या आैषधांची गरज आहे. सध्या उपलब्ध आैषधांचा परिणाम सुरू होण्यास ३-४ आठवड्यांचा अवधी लागतो. आैषध उत्पादकांनादेखील जुन्या आैषधांपासून फारसे उत्पन्न मिळत नाही. ते उत्पन्नाची इतर साधने शोधत आहेत.
यासाठी केटामाइन आैषधावर नव्याने संशोधनाची गरज आहे. हे संयुक्त आैषधाप्रमाणे आहे. रुग्णांना हे काल्पनिकतेकडे खेचते. मात्र, नैराश्यावर यामुळे लवकर नियंत्रण मिळवता येते. नव्या आैषधनिर्मितीसाठी जॉन्सन अॅड जाॅन्सन व एलर्गनसारख्या कंपन्या केटामाइनवर प्रामुख्याने संशोधन करत आहेत. संशोधकदेखील अधिक माहिती आणि जनुकीय चाचण्यांच्या मदतीने निष्प्रभ आैषधांमुळे ग्रस्त रुग्णांना फायदा होऊ शकेल या दिशेने प्रयत्न करत आहेत. मनोविकारतज्ज्ञांना नव्या आैषधांमुळे चांगले बदल घडतील अशी आशा आहे. नैराश्याच्या इलाजामध्ये होणाऱ्या संशोधनांना घवघवीत यश मिळेल, असा विश्वास अनेकांना आहे. बहुतांश लोकांना सुरक्षित ठरेल अशा उपचारावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

नैराश्यग्रस्तता हे दैनंदिन उदास वाटण्यापेक्षा निराळे आहे. याची कारणे व उपचाराच्या पद्धतीत सतत बदल होतात. नैराश्याचा संबंध मेंदूशी आहे. १७ व्या शतकानंतर हा विचार स्थापित झाला. थॉमस विलिस नामक मेंदूविकार तज्ज्ञाने दावा केला की खिन्नतेची कारणे मेंदू आणि हृदयात दडली आहेत. त्यासाठी आयुर्वेदिक आैषधी, नशा आणणारे अफूसारखे पदार्थ यांचाही उपचार केला गेला. संगीत उपचारही करण्यात आले. १९३८ पर्यंत इलेक्ट्रोकनव्हल्सिव्ह थेरपी हा एकमेव उपचार मानला गेला. ५० च्या दशकाच्या सुरुवातीला डॉक्टरांना प्रथमच वाटले की उपचारासाठी रसायनांचा वापर होऊ शकतो. याचे पहिले आैषध आयप्रोनियाजिड होते. १९५७ मध्ये नैराश्यग्रस्त रुग्णांसाठी याचा वापर करण्याचे निश्चित झाले. ७०% रुग्णांना याचा फायदा झाला. दशकाच्या अखेरपर्यंत ४ लाख रुग्ण याचे सेवन करत होते. यकृताला हे आैषध घातक असल्याचे नंतर लक्षात आले. १९६१ मध्ये यावर बंदी आली.
यानंतर एमिप्रामाइनचा वापर सुरू झाला. हे फार यशस्वी झाले नाही. नैराश्याचे मुख्य कारण मेंदूच्या न्यूरोट्रान्समिटर्समधील बिघाड असल्याचे मात्र आता स्पष्ट झाले होते. नैराश्याच्या आधुनिक आैषधांचा वापर नंतर सुरू झाला. आजही तो होतो. १९८७ मध्ये पहिले आैषध प्रोझाक उपलब्ध झाले. तीन वर्षांतच २० लाख लोक याचे सेवन करू लागले. आजही याची लोकप्रियता कायम आहे. यात त्रुटीही आहेतच. ३५% रुग्णांना याचा पूर्ण लाभ झाला आहे. डॉक्टरांनादेखील माहीत नाही की, मोजक्याच रुग्णांवर याचा प्रभाव का दिसतो. स्टार डी ट्रायल हे नैराश्यावरील सर्वात व्यापक संशोधन आहे. ३०% रुग्णांवर आैषधी निष्प्रभ ठरते. केटामाइन हायड्रोक्लोराइड याला पर्याय ठरू शकेल असे विशेषज्ञांना वाटते.
अमेरिकेमध्ये वैध स्वरूपात उपलब्ध हे या प्रकारचे एकमेव आैषध आहे. शस्त्रक्रियेपूर्वी याचे अधिक प्रमाण भूल देण्यास उपयुक्त ठरते. क्लबमध्ये ‘स्पेशल’ नावाने याचा वापर नशा करण्यासाठी केला जातो. अाशियाई देशांत नशेसाठीच याचा वापर होतो. केटामाइनमध्ये नैराश्यरोधक गुण असल्याचा शोध ९० च्या दशकाच्या अखेरीस लागला. एलर्जेन आणि जॉन्सन अँड जाॅन्सन कंपन्या केटामाइनशी संबंधित आैषधांवर संशोधन करत आहेत. सध्या त्याचे परीक्षण सुरू आहे. प्राथमिक निरीक्षणे आशादायी आहेत. पूर्वीच्या आैषधांना प्रतिसाद न देणाऱ्या ६० ते ७०% रुग्णांवर याचा प्रभाव दिसून आला. आत्महत्येच्या विचारांपासून हे परावृत्त करते.
अमेरिकेत ५० लाखांपेक्षा अधिक नैराश्यग्रस्तांना आैषधांचा लाभ होत नाही. हा बाजार मोठा आहे. याचा लाभ घेण्यासाठी देशभरात केटामाइन क्लिनिक सुरू झाले आहेत. आतापर्यंत यासाठी निश्चत कायदेदेखील अस्तित्वात नाहीत. रुग्णांना याचा डोस किती प्रमाणात द्यावा याविषयी स्पष्टता नाही. अमेरिकन मनोविकार तज्ज्ञ संघटनेने या वर्षी आपल्या अहवालात म्हटले आहे की, नैराश्याच्या उपचारासाठी केटामाइनचा वापर सध्या योग्य नाही. केटामाइनवर अवलंबून राहणे योग्य नसल्याचेही अनेकांना वाटते. रुग्णांना याची सवय लावणे योग्य नसल्याचे काहींना वाटते. आैषधी कंपन्या याच्या विविध स्वरूपावर काम करत आहेत. केटामाइनच्या विपरीत परिणामांच्या चाचण्याही केल्या जात आहेत. सुरुवातीला यश मिळाले असून येत्या दोन वर्षांत ही आैषधे बाजारात उपलब्ध होतील.
प्रभावाविषयी स्पष्टता नाही
विशेषज्ञांनादेखील केटामाइनच्या प्रभावाविषयी ठामपणे सांगता येत नाही. याची कार्यप्रणाली नैराश्यविकारावर उपलब्ध आैषधांपेक्षा वेगळी आहे. हे मेंदूतील चेतातंतूंना जागृत करते व त्यात बदल घडून येतात. नैराश्यविकारावरील इतर आैषधांची क्रियाही अशीच आहे. मात्र, केटामाइनची प्रक्रिया वेगवान व शक्तिशाली आहे.

१५ हजार डॉलर्स खर्च
रुग्णांना दर आठवड्याला याच्या डोसची गरज असते. हे महाग आहेत. प्रत्येक डोससाठी ४०० ते ८०० डॉलर्स खर्च होतो. आठवड्यात दोन डोस असतील तर याचा वार्षिक खर्च १५ हजार डॉलर्सपर्यंत जातो.
X
COMMENT