Home | Health And Lifestyle | Yoga Day | shweta raina writes about first day in college

महाविद्यालयाच्या पहिल्या दिवसाची तयारी

श्वेता रैना | Update - Jul 24, 2017, 03:00 AM IST

शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी महाविद्यालयात जाण्याची तयारी करतात. वेळापत्रकापासून अन्य तपशील व प्राध्यापकांबा

 • shweta raina writes about first day in college
  शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी महाविद्यालयात जाण्याची तयारी करतात. वेळापत्रकापासून अन्य तपशील व प्राध्यापकांबाबत प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती ठेवावी लागते. महाविद्यालयीन शिक्षण म्हणजे आयुष्यातील जबाबदाऱ्यांप्रति टाकलेले पहिले पाऊल. यात वैयक्तिक स्वातंत्र्यही भरपूर मिळते.

  कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या एका सर्वेक्षणानुसार, नेमके काय करावे याच प्रश्नाने अनेक विद्यार्थी प्रवेशाच्या पहिल्या दिवशी हैराण असतात. या प्रकारचा छोटासा संभ्रमही विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास डळमळीत करतो. महाविद्यालयात पहिल्यांदा जाणे हे अनेक पैलूंनी महत्त्वाचे असते. त्यामुळे यासाठी येणाऱ्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी स्वत:ला कसे तयार करावे, याविषयी जाणून घेऊया...
  महाविद्यालयाची माहिती घ्या
  महाविद्यालयाच्या संकेतस्थळास भेट द्या. त्यावर विभाग, प्राध्यापक, विद्यार्थी संघटना, प्रमुख व्यक्ती, सुविधा इत्यादी माहिती उपलब्ध असेल. कोणत्या समूहात राहायचे हे आवडीनुसार निश्चित करून घ्या. यासाठी जुन्या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन घेणे हा उत्तम पर्याय ठरू शकतो. ते अनेक माहिती आपल्याला सहज आणि योग्य प्रकारे समजावून सांगू शकतात.
  शहरानुरूप समायोजन करणे
  महाविद्यालयाच्या पहिल्या दिवसापेक्षा नव्या शहरानुरूप समायोजन करणे जास्त कठीण असते. नव्या शहरात जाणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांना ही अडचण येते. शहरानुरूप समायोजन केल्यास अनेक अडचणी सुटू शकतात. आपल्याला ज्या मार्गाने महाविद्यालयात जाणे-येणे करायचे आहे, ज्या ठिकाणी राहायचे आहे किंवा कोणकोणत्या मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत, याची चौकशी महाविद्यालयात प्रवेश घेण्याच्या आठवडाभर आधी जाऊन करून घ्यावी. संबंधित शहरात कुणी मित्र किंवा नातेवाईक असल्यास त्या शहराबद्दल त्यांच्याकडून आवश्यक माहिती मिळवून घ्यावी.
  आवश्यक वस्तू सोबत ठेवा
  ओळखपत्र, शुल्काची पावती, वह्या-पेन इत्यादी वस्तू महाविद्यालयात जाताना आठवणीने सोबत ठेवा. शिवाय आणखी कोणकोणत्या वस्तू लागू शकतात याची माहिती महाविद्यालयात गेल्यानंतर विचारून घ्या आणि त्यानुसार आवश्यक ती तयारी करा.
  मित्रमैत्रिणी बनवा
  ऊर्जा आणि आत्मविश्वासाने महाविद्यालयात घालवलेला दिवस अविस्मरणीय ठरू शकतो. त्यामुळे पहिल्याच दिवशीपासून अन्य विद्यार्थ्यांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न करा. एकलकोंड्यासारखे राहू नका. आपल्या विचारांशी सुसंगत आणि आवडते विद्यार्थी शोधून त्यांच्याशी मैत्री करा. चांगला संवादच आपल्याला चांगले मित्र-मैत्रिणी मिळवून देऊ शकतो. हीच बाब प्राध्यापकांबाबतही लागू होते. आपण महाविद्यालयाच्या पहिल्या दिवसासाठी सुसज्ज असाल तर कदाचित तो आपल्या महाविद्यालयीन आयुष्यात अत्यंत महत्त्वाचा व लाभदायी ठरू शकतो. महाविद्यालयीन आयुष्यात अनेक नवनवीन अनुभव येतात तसेच नव्या लोकांना भेटण्याची संधी मिळते. यासाठी स्वत:ला तयार ठेवल्यास ही बाब आयुष्यभरासाठी कामाची ठरू शकते.
  श्वेता रैना,
  हार्वर्ड बिझनेस स्कूल ग्रॅज्युएट,
  talerang.com च्या सीईओ

Trending