Home | Health And Lifestyle | Yoga Day | Some Special Recipes For Diwali Faral By Madhurima

फराळ दिवाळीचा : पारंपरिक रेसिपींना द्या नवा टच, दिवाळीसाठी काही खास पाककृती

दिव्य मराठी वेब टीम | Update - Oct 18, 2017, 10:41 AM IST

दिवाळी सुरु झाली आहे आणि सगळीकडे उत्साहाच वातावरण आहे. घराघरात फराळाचा खमंग सुगंध येतोय.

 • Some Special Recipes For Diwali Faral By Madhurima
  दिवाळी सुरु झाली आहे आणि सगळीकडे उत्साहाच वातावरण आहे. घराघरात फराळाचा खमंग सुगंध येतोय. आज आम्ही तुम्हाला फराळाच्या इतर काही पदार्थांविषयी सांगणार आहोत. फराळाच्या नेहमीच्या पदार्थांना दिलेला एक ट्विस्ट. करायला सोपे अन तरीही चविष्ट.
  आपणा सर्वांची दिवाळी रुचकर व्हावी म्हणून मधुरिमाचा हा पाककृतींनी सजलेला खमंग विशेषांक.
  नितीशा स्मार्त-औरंगाबाद, ज्योती मोघे-भोपाळ, डॉ. अंजली राजवाडे-अकोला, वैशाली देशमुख-अमरावती, मीनाक्षी वाणी-जळगाव यांनी पाठवलेल्या काही खास रेसिपींमधून यंदाचा तुमचा दिवाळीचा फराळ आणखी खास बनवणार आहोत.

  बेसन मावा बर्फी
  साहित्य :
  दीड वाटी बेसन, अर्धी वाटी साजूक तूप, शंभर ग्रॅम खवा किंवा मावा, एक वाटी पिठीसाखर, वेलची पूड, कलिंगडाच्या बिया २ चमचे, बदाम, काजू आणि पिस्त्याचे बारीक तुकडे.
  कृती :कढईत कलिंगडाच्या बिया थोड्या भाजून बाजूला काढून ठेवाव्यात. मग कढईत तूप घालावे. तूप गरम झाले की, त्यात बेसन घालून छान खरपूस भाजावे. दुसऱ्या कढईत खवा चांगला परतून बाजूला काढून ठेवावा. बेसन दुसऱ्या भांड्यात काढून थंड करावे. त्याच कढईत थंड केले तर जळायची शक्यता जास्त. थोडे थंड झाल्यावर त्यात खवा घालून तो चांगला मळून घ्यावा. नंतर वेलची पूड, एक वाटी साखर, कलिंगडाच्या बिया आणि सुक्या मेव्याचे तुकडे घालून चांगले हलवून घट्ट गोळा तयार करावा. एका ताटलीला तूप लावून त्यात हा गोळा ओतावा. चांगला थापून घ्यावा. थोड्या वेळाने त्याच्या हव्या त्या आकाराच्या वड्या पाडाव्यात. बेसन मावा बर्फी तयार.

  पुढील स्लाइड्सवर पाहू, अशाच काही एकापेक्षा एक सरस अशा रेसिपीज...
  (Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 • Some Special Recipes For Diwali Faral By Madhurima
  इटालियन शंकरपाळे
  साहित्य:
  दोन वाटी मैदा, अर्धी वाटी चीझ, एक छोटा चमचा चिलीफ्लेक्स, अर्धा चमचा हर्ब्स (ओरेगानो, बेसिल), मीठ, तळण्यासाठी तेल.
  कृती :     मैदा आणि किसलेले चीझ एकत्र करावे. त्यात तेलाचे मोहन घालून सगळे हर्ब्स, चिलीफ्लेक्स, मीठ घालून घट्ट गोळा मळून घ्यावा. अर्धा तास बाजूला ठेवून द्यावे. मिश्रणाची पोळी लाटून त्याचे शंकरपाळीसारखे काप करून तेलात खरपूस तळून घ्यावे. हर्ब्स घालायचे नसतील तर फक्त चिलीफ्लेक्स घालून केले तरी छान लागतात. हे शंकरपाळे चीझ बिस्किटांसारखे कुरकुरीत लागतात. ज्यांना गोड कमी खायचेय, त्यांना हा चांगला पर्याय आहे.
 • Some Special Recipes For Diwali Faral By Madhurima
  कोथिंबीर शेव
  साहित्य:
  २ वाट्या बेसन, चार चमचे तांदळाची पिठी, कोथिंबिरीची लहान जुडी, ३ ते ४ लसूण पाकळ्या, ४ हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरे पावडर, चिमूटभर खायचा सोडा, मीठ, तळण्यासाठी तेल. 
  कृती :     मिक्सरमध्ये कोथिंबीर, लसूण आणि मिरची वाटून घ्यावे. त्यात एक वाटी पाणी घालून ते पाणी गळून घ्यावे. त्यात जिरेपूड घालावी. आता या पाण्यात बेसन आणि तांदळाची पिठी एकत्र करून पीठ भिजवावे. खूप सैल भिजवू नये. त्यात खायचा सोडा, मीठ घालावे. सोऱ्याला शेवेची चकती लावून गरम तेलात कढईत शेव खरपूस तळून घ्यावी. आगळ्यावेगळ्या चवीची कोथिंबीर शेव तयार.
 • Some Special Recipes For Diwali Faral By Madhurima
  मुरुकू
  साहित्य:    एक वाटी तांदळाचे पीठ, ३ ते ४ चमचे डाळव्याचे पीठ, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा तीळ, एक चमचा तिखट, २ चमचे तेल किंवा बटर, चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तेल. 
  कृती :    तांदळाचे आणि डाळव्याचे पीठ एकत्र करावे. त्यात बटर घालावे. सगळ्या पिठाला बटर किंवा तेल चांगले चोळून घ्यावे. मग त्यात ओवा, तीळ, तिखट आणि मीठ घालावे. पाणी घालून कणकेसारखा घट्ट गोळा मळावा. सोऱ्यामध्ये चकलीची चकती घालून गरम तेलात छान खरपूस गुलाबी रंगावर तळून घ्यावी.
 • Some Special Recipes For Diwali Faral By Madhurima
  काजू चिक्की
  साहित्य :   
   काजू पाव किलो, साखर २००  ग्रॅम, तूप २ छोटे चमचे.
  कृती :     कढईमध्ये साखरेचा पाक करावा. काजू बारीक वाटून घ्यावे व पाकात घालावे. हे मिश्रण ताटात वा ट्रेमध्ये पसरवावे व पातळ लाटावे. मनासारख्या वड्या कापाव्या.
 • Some Special Recipes For Diwali Faral By Madhurima
  कॅरेमलाइज्ड स्वीट मखाणे 
  साहित्य:
  फुललेले मखाणे पाव किलो, साखर १ कप, तूप तळण्यासाठी, वेलदोड्याची पूड १ चमचा
  कृती :   कढईत तूप घालून मखाणे कुरकरीत तळावे. साखरेत पाणी घालून पाक करावा व त्यात वेलदोड्याची पूड घालावी. तळलेले मखाणे घालून पाकात भिजवत ठेवावे. ते पाकात नीट भिजले की बाहेर काढावे. कुरकुरीत कॅरेमलाइज्ड मखाणे सर्व्ह करावे.
 • Some Special Recipes For Diwali Faral By Madhurima
  साहित्य:    बेसन २०० ग्रॅम, पाचसहा मध्यम आकाराचे उकडून सालं काढून कुस्करलेले बटाटे, पाव चमचा ओवा, मिरपूड पाव चमचा, मीठ चवीप्रमाणे, एक चिमूट हिंग, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद, तेल तळणीसाठी.
  कृती :     बेसन चाळून त्यात मीठ, ओवा, गरम मसाला, हिंग, हळद, मिरपूड व थोडं तेल घालावं. कुस्करलेले बटाटे व बेसन एकत्र मळावं. दहा मिनिटं झाकून ठेवावं. शेवेच्या सोऱ्यात घालून गरम तेलात शेव पाडावी. मुलांना आलू भुजिया फार आवडते.
 • Some Special Recipes For Diwali Faral By Madhurima
  स्टफ मावा बर्फी
  साहित्य :    चण्याची डाळ पाव किलो, तूप १५० ग्रॅम, साखर पाव किलो, परतलेला मावा १०० ग्रॅम, बेदाणे २५ ग्रॅम, काजू २५ ग्रॅम, वेलदोड्याची पूड अर्धा चमचा, आवडत असल्यास सुका मेवा.
  कृती :     चण्याची डाळ चार-पाच तास भिजत घालावी. नंतर उपसून वाटावी. जाड बुडाच्या पातेल्यात तूप घालून तुपावर डाळ मंदाग्नीवर परतावी, म्हणजे चांगली भाजली जाते. बदामी रंगावर आली की, उतरवून बाजूला ठेवावी. साखरेत पाणी घालून पाक करावा, त्यात डाळ घालून ढवळावे व लगेचच उतरवावे. दुसऱ्या भांड्यात वेलदोड्याची पूड, बेदाणे, काजूचे काप, परतलेला मावा घालावे व मिश्रण एकत्र करावे. चण्याच्या डाळीचं मिश्रण ढवळून एकसारखं करावं. जरा निवल्यावर त्याचा गोळा हातावर घेऊन त्यात माव्याचं सारण भरून पुन्हा गोल आकार देऊन बाटीसारखं बंद करावं. आवडत असल्यास वरून सुक्या मेव्याचे काप लावावे.
   
  ड्राय फ्रूट पनीर दिवे 
  साहित्य :पनीर २०० ग्रॅम, पिठीसाखर १ चमचा, काजू व पिस्त्याचे काप प्रत्येकी दीड चमचा, बेदाणे दीड चमचा, मिल्क पावडर ३ चमचे, दुधात मिसळलेले केशर १ लहान चमचा.
  कृती :    पनीर, पिठीसाखर, मिल्क पावडर व केसर एकजीव करावे. या मिश्रणाचे गोळे करून दिव्यासारखा आकार द्यावा. प्रत्येक दिव्यामध्ये सुक्या मेव्याचे काप घालून वरून थोडी पिठीसाखर भुरभुरावी.
 • Some Special Recipes For Diwali Faral By Madhurima
  चटपटीत शेंगदाणे
  साहित्य :एक कप कच्चे शेंगदाणे, दोन-तीन चमचे बेसन, चवीपुरतं मीठ, पुदीना पूड अर्धा चमचा, आवडत असल्यास चाट मसाला व पांढरे तीळ, तळण्यासाठी तेल.
  कृती :   दाणे थोडे ओले करावे. मग त्यावर वर दिलेला मसाला लावावा. बेसन पाण्यात भिजवावं. त्यात तीळ घालावे. हे मिश्रण दाण्यांवर लावावं. तेल गरम करून मंद आचेवर दाणे खरपूस तळावे.
 • Some Special Recipes For Diwali Faral By Madhurima
  खजूर लाडू
  साहित्य : एक वाटी खजूर (बीविरहित), भाजलेले शेंगदाणे अर्धी वाटी, तीळ अर्धी वाटी, बदाम व काजू कूट अर्धी वाटी, वेलदोड्याची पूड अर्धा चमचा, भाजलेली खसखस एक चमचा, पिठीसाखर पाव वाटी, सुके खोबरे कीस दोन चमचे, भाजलेली कणीक अर्धी वाटी, आळीव दोन चमचे.
  कृती : खजूर, तीळ व शेंगदाणे मिक्सरमधून बारीक करावे. यामध्ये इतर सर्व पदार्थ मिसळावे. व्यवस्थित मळून लाडू बांधावे.
  वैशिष्ट्य :    प्रथिने व लोह मिळतात. त्यामुळे हिमोग्लोबीन वाढून अशक्तपणा व निस्तेजपणा दूर होऊन स्फूर्ती व सतेज कांती मिळेल. तूपविरहित असल्यामुळे हृदयास घातक नाही. मधुमेहींनी पिठीसाखरेऐवजी शुगरफ्री वापरावं.
 • Some Special Recipes For Diwali Faral By Madhurima
  ज्वारी व मटकी पिठाच्या चकल्या
  साहित्य:
      ज्वारी पीठ एक वाटी, मटकी पीठ एक मोठा चमचा, भाजलेले तीळ दोन चमचे, ओवा अर्धा चमचा, तिखट व मीठ चवीनुसार, लोणी दोन चमचे, तळण्यासाठी तेल.
  कृती :    सर्व साहित्य एकत्र करून नीट मिसळावे व कोमट पाण्याच्या साहाय्याने गोळा भिजवावा. चकली साच्याने लगेचच चकल्या बनवून मंद गॅसवर तळाव्या.
  वैशिष्ट्य:    ज्वारी ग्लूटेनमुक्त असल्यामुळे पचनास हलकी आहे. कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस व लोह असल्याने शरीरास उपयुक्त. मटकी डाळीच्या पिठामुळे चकलीला कुरकुरीतपणा येतो व भरपूर प्रथिने प्राप्त होतात.
   
   
  सातूच्या पिठाचा चिवडा 
  साहित्य : सातूपीठ एक वाटी, पातळ पोहे एक वाटी, मुरमुरे एक वाटी, तिखट, मीठ व हळद चवीप्रमाणे, पिठीसाखर दीड चमचा, तेल दीड मोठा चमचा.
  कृती :    कढईत तेल गरम करावे. त्यामध्ये पोहे, मुरमुरे, हळद घालून परतावे. सातूचे पीठ, तिखट व मीठ घालून व्यवस्थित मिसळावे. गॅस बंद करून तयार सातूच्या पिठाचा चिवडा थंड झाल्यानंतर त्यामध्ये पिठीसाखर मिसळावी. चिवडा सेवन करताना बारीक चिरलेला कांदा व कोथिंबीर पेरावी.
  वैशिष्ट्य :    भरपूर प्रथिने, मध्यम स्वरूपात कर्बोदके आणि लोह व जीवनसत्त्वे प्राप्त होतात.
 • Some Special Recipes For Diwali Faral By Madhurima
   चमचमीत शंकरपाळे
  साहित्य: 
     कणीक तीन वाट्या, साखर दोन चमचे, मीठ एक चमचा, जिरं व तीळ प्रत्येकी एक चमचा (हलकेसे भाजून जाडसर कुटलेले), हळद व तिखट प्रत्येकी अर्धा चमचा, भाजलेल्या सोयाबीनचे पीठ दोन चमचे, मेथीदाणा पूड अर्धा चमचा, तेल (तळण्यासाठी)
  कृती :     सर्व साहित्य एकत्र मिसळून पुरेसे पाणी घालून घट्ट पीठ भिजवावे. अर्ध्या तासानंतर गोळे करून पोळी लाटावी व कातणीने लहान शंकरपाळे कापावे. तेलात लाल रंगावर तळावे.
  वैशिष्ट्य:     प्रथिने भरपूर मिळतील. सोयाबीनपासून फायटोइस्ट्रोजेन मिळतात. लोह व कॅल्शियम प्राप्त होतील. मेथीदाणा हृदयसंरक्षक आहे. तळलेला पदार्थ बेताने खाल्लेला बरा.
 • Some Special Recipes For Diwali Faral By Madhurima
  जाड पोह्यांचा चिवडा 
  साहित्य:   
   १/२ किलो जाड पोहे, १ मोठी वाटी शेंगदाणे, तळणासाठी तेल, १ लहान वाटी अख्खा मसूर (भिजवून, हलकीशी वाळवलेली), चवीपुरते साधे मीठ व सैंधव मीठ, चवीनुसार पिठीसाखर, धने-जिरे पूड, आवश्यकतेनुसार कढीपत्ता.
  कृती :     सर्वप्रथम तेलात जाड पोहे चांगले तळून घ्यावेत. लगेच नंतर त्याच तेलात शेंगदाणे, मसूर तळून घ्यावे. कढीपत्ता कडक तळून घ्यावा. त्यानंतर फोडणीसाठी आवश्यकतेनुसार तेल घेऊन त्यामध्ये धने-जिरे पूड व मीठ घालून ती तळलेल्या पोह्यांवर सोडावी. त्यावर लगेच पिठीसाखर व सैंधव मीठ टाकून चांगले मिक्स करून घ्यावे. 
 • Some Special Recipes For Diwali Faral By Madhurima
  आंबट गोड शंकरपाळे
  साहित्य:
      २५० ग्रॅम मैदा, १०० ग्रॅम पिठीसाखर (गोड हवे असल्यास थोडी जास्त घेणे), २०० ग्रॅम चक्का, १ मध्यम चमचा मोहनासाठी तेल.
  कृती :     सर्वप्रथम पिठीसाखर व चक्का एकजीव करून घट्ट होण्यासाठी काही वेळ फ्रिजमध्ये ठेवावे. नंतर मैदा घेऊन त्यात एकजीव झालेले पिठीसाखर व मैद्याचे मिश्रण टाकावे. कढईत तेलाचे कडकडीत मोहन करून ते मैद्याच्या मिश्रणात टाकावे. त्याचा घट्टसर गोळा करावा. आवश्यक असल्यास भिजवण्यासाठी थोडे दूध किंवा पाणी घ्यावे. मैद्याचे छोटे छोटे गोळे करून त्याच्या पातळ पोळ्या कराव्या. एकावर एक अशा दोन ते तीन पातळ पोळ्या ठेवून त्याच्या कडा पाण्याने बदं करून घ्याव्यात. नंतर त्याचे हव्या त्या आकारात शंकरपाळे पाडून तेल गरम करून त्यात सोनेरे रंगावर तळून घ्यावेत. आवश्यक वाटल्यास त्यावर वरून थोडी पिठीसाखर ठेवावी. हेच शंकरपाळे खारे हवे असल्यास त्यात साखर न टाकता थोडे जिरे व ओवा टाकून भिजवावे.
 • Some Special Recipes For Diwali Faral By Madhurima
   बेसन पुरी लाडू
  साहित्य: 
    १/२ किलो  बेसन, २ वाट्या दूध, २ वाट्या पिठीसाखर, १/२ चहाचा चमचा वेलदोडा-जायफळची पूड, तळणासाठी तेल/तूप (आवडीप्रमाणे), १/२ मोठी वाटी काजू-बदाम-पिस्त्याचे काप, चांदीचा वर्ख.
  कृती :   पुरीसाठी बेसन दुधात भिजवून घ्यावे. त्याच्या कणकेच्या पुऱ्यांप्रमाणे पुऱ्या लाटून तळून घ्याव्यात. त्या थंड झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक करून घ्याव्यात. त्यामध्ये वेलदोडा-जायफळ पूड, काजू-बदाम-पिस्त्याचे काप व पिठीसाखर घालून हाताने एकजीव करावे. त्यानंतर त्याचे लाडू वळावेत. सारण घट्ट झाल्यास त्याला थोडा दुधाचा हात घ्यावा. लाडू वळून पूर्ण झाल्यावर त्याला चांदीचा वर्ख लावून सजवावे. बुंदीच्या लाडूला उत्तम पर्याय आहे.
 • Some Special Recipes For Diwali Faral By Madhurima
  म्हैसूर पाक
  साहित्य: 
    १ मध्यम वाटी बेसन, ३ मध्यम वाट्या साखर, ३ मध्यम वाट्या तूप, आवश्यक वाटल्यास काजू बदाम काप, १/२ चहाचा चमचा वेलदोडे व जायफळ पूड.
  कृती :     २ मोठे चमचे तूप बेसनाला चोळून घ्यावे. नंतर हे बेसन मंद गॅसवर थोडे भाजावे. तोपर्यंत साखरेचा पाक तयार करून घ्यावा. पाक तयार झाला की, भाजलेले बेसन त्यात टाकून चांगले एकजीव करावे. तोपर्यंत तूप गरम करून घ्यावे. ते गरमच असताना थोडे थोडे बेसनाच्या मिश्रणात ओतत राहावे. बेसनात तूप मावेनासे होऊन बाहेर पडेपर्यंत बेसनाचे मिश्रण ढवळत राहावे. ते खाली लागणार नाही याची काळजी घ्यावी. बेसनाला जाळी पडू लागली की आच बंद करावी. एका ट्रेला थोडा तुपाचा हात लावून त्यात हे मिश्रण पसरवावे. काही वेळानंतर त्याचे काप करावे. घट्ट जमल्यानंतर अलगद उचलून डब्यात भरावेत. तूप नसेल आवडत तर तेलाचा वापरही करू शकतो. परंतु त्याचा वास येण्याची शक्यता असते.
 • Some Special Recipes For Diwali Faral By Madhurima
  रतलामी शेव
  साहित्य:   
  दोन वाट्या बेसन पीठ(अगदी बारीक दळलेले), पाव चमचा लवंग पावडर, तिखट एक चमचा, मीठ चवीप्रमाणे, दोन चिमटी खाण्याचा सोडा, कडकडीत तेलाचे मोहन दोन मोठे चमचे, तळण्यासाठी तेल. पीठ भिजवण्यासाठी पाणी.
  कृती:    बेसन पिठात सर्व साहित्य टाकून, तेलाचे मोहन घालून सर्व नीट मिक्स करा. आवश्यकतेनुसार पाणी घालून घट्ट भिजवा. सोऱ्यात पीठ भरून तेलात शेव पाडून खुसखुशीत तळून घ्या.
 • Some Special Recipes For Diwali Faral By Madhurima
  चुरमा लाडू
  साहित्य :
  कणीक दोन वाट्या, बारीक रवा दोन वाट्या, तूप तीन चमचे मोहनासाठी, पिठीसाखर दोन वाट्या, दूध, तळण्यासाठी तूप, काजूचे छोटे तुकडे
  कृती : कणीक व रवा तूप घालून दुधात घट्ट भिजवावं. त्याची लहान लहान मुटकुळी करून तुपात गुलाबी रंगावर तळून घ्यावी. गार झाल्यावर मिक्सरमध्ये सरसरीत दळून घ्यावं. या मिश्रणात पिठीसाखर व लागेल तसं तूप घालून व काजूचे तुकडे घालून लाडू वळावे. गरज लागल्यास थोडा दुधाचा शिबका द्यावा. वेगळ्या चवीचे लाडू तयार.
 • Some Special Recipes For Diwali Faral By Madhurima
   कडबोळी 
  साहित्य:   
  तांदूळ पिठी दोन वाट्या, मैदा एक वाटी, जिरे पावडर पाव चमचा, हिंग दोन चिमूट, तिखट-मीठ चवीनुसार, हळद पाव चमचा, तूप दोन चमचे मोहनासाठी, तेल तळण्यासाठी, पाणी आवश्यकतेनुसार.
  कृती:    परातीत तांदळाची पिठी, मैदा, तिखट, मीठ, हिंग-जिरे पावडर, हळद सर्व नीट एकजीव करावे. तुपाचे मोहन सर्व पिठाला नीट चोळून घ्यावे. पाणी टाकून पीठ घट्ट भिजवून घ्यावे. पंधरा मिनिटं झाकून ठेवावे. नंतर पीठ मळून घेऊन पोळपाटावर लहान लहान कडबोळी तयार करून घ्यावी. फार जाडसर नसावीत. कढईत तेल गरम करून मध्यम आचेवर सोनेरी रंगात खरपूस तळून घ्यावी.
   
  मक्याचा चिवडा
  साहित्य:
  तीन मोठ्या वाट्या मक्याचे पोहे, अर्धी वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी डाळवं, जिरे दोन चमचे, बडीशेप एक लहान चमचा, धने एक चमचा, अर्धी वाटी कढीपत्ता, दोन लहान चमचे हळद, तिखट-मीठ चवीनुसार, किसमीस, काजू तुकडे पाववाटी, खोबरा काप पाववाटी, तळण्यासाठी तेल. 
  कृती :    कढईत तेल गरम करावे. मक्याचे पोहे तळून एका मोठ्या परातीत काढून घ्यावे. शेंगदाणे, डाळवं, खोबऱ्याचे काप तळून घ्यावे. त्यातच स्टीलची गाळणी ठेवून जीरे, धने, बडीशेप तळून घ्यावी. कढीपत्ता तळून घ्यावा. काजूचे काप आणि किसमिस तळून घ्यावे. कढीपत्ता वगळून इतर सर्व साहित्य पोह्यात मिक्स करावे. तिखट, मीठ आणि हळद घालून सर्व हळुवार एकत्र करावे. शेवटी काजू, कढीपत्ता, किसमिस घालून एकत्र करावे.
 • Some Special Recipes For Diwali Faral By Madhurima
  नटखट चंपाकळी
  साहित्य: 
    मैदा दोन वाट्या, कणीक अर्धी वाटी, मीठ एक चिमटी, तूप तळणासाठी व मोहनासाठी, पाकासाठी साखर दोन वाट्या, दीड वाटी पाणी, एक चिमूट केशर
  कृती :     मैदा व कणीक एका परातीत घेऊन त्यात दोन चमचे तूप व किंचित मीठ घालावे. पाणी घालून पीठ घट्ट मळावे. 
  १५ मिनिटे ते झाकून ठेवावे. नंतर चांगले मळून त्याचे लहान गोळे करावे. एकेका गोळ्याची पातळ पुरी लाटावी. एका मोठ्या वाटीने पुऱ्या एकसारख्या आकाराच्या कापाव्या. नंतर एकेका पुरीला पाव इंच जागा सोडून सुरीने चिरा द्याव्या. आता पुरीची दोन्ही टोकं पकडून तिला पीळ देऊन त्याची चंपाकळी तयार करावी. सगळ्या चंपाकळ्या गुलाबी रंगावर तळून घ्याव्या. नंतर साखरेचा दोनतारी पाक करावा. गॅस बंद करून त्यात केशर घालावे. त्यात एकेक चंपाकळी बुडवून अलगद बाहेर काढून घ्यावी.
 • Some Special Recipes For Diwali Faral By Madhurima

Trending