आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मन म्हणजे नेमक काय?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
योग हा शब्द कानावर पडताच क्लिष्ट योगासन, प्राणायाम, तप, संयम, नियम अशा कठीण संकल्पनांचा विचार डोक्यात येतो. अनेक लोक याचा धसका घेतात. सामान्य माणसाला वाटते की, हे सर्व प्रकार आपल्या आवाक्याबाहेरचे आहेत. वास्तवात हे योगविषयक गैरसमज आहेत. काळानुरूप योगसाधनेचे व्यापक रूप लोप पावले आहे. फक्त योगासनांपुरतेच आपण योग जाणतो.

पतंजली तर मनाच्या नियंत्रणाची संकल्पना मांडतात. योगसूत्रांच्या सुरुवातीलाच त्यांनी स्पष्ट केले आहे. मनातील तरंगांना विराम म्हणजे योग. मुद्देसूदरीत्या ही संकल्पना समजणे महत्त्वाचे.

मनातील तरंग कसे थांबतात? मात्र, त्यापूर्वीही ‘मन’ काय आहे, ते कुठे असते? याची सुंदर व्याख्या आहे : मेंदूतील एक महत्त्वाचा भाग म्हणजे मन, असे वाटत असते. मात्र, ते कोणतेही ठोस तत्त्व नाही. मन एक क्रिया आहे. चल क्रिया. जशी चालण्याची क्रिया आहे. चालणे काय आहे? तो ठोस घटक नाही. ती क्रियाच आहे. त्यामुळे बसल्यावर तुम्हाला कोणी म्हणत नाही की, तुम्ही चालत होतात, तुम्ही चालणे कुठे ठेवले? अगदी मनही अशीच क्रिया आहे. ते विचार करते व थांबते.

जेव्हा मन नसते तेव्हा तुम्ही योग स्थितीत असता. ते असताना योग नसतो. तुम्ही कितीही अवघड आसने करा. मनन व विचारचक्र सुरू असल्यास तुम्ही योग स्थितीत नाहीत. मन भूतकाळात जगते. स्मृती संग्रह आहे, धूळ आहे. प्रत्येकाला ती जमा करावी लागते.
तुम्ही प्रवास करता म्हणजे धूळ तर जमणारच. मात्र, त्यासोबत सामंजस्य करण्याची गरज नाही. त्यासोबत एकरूप होण्याची गरज नाही. कारण तसे झाले तर समस्या वाढतात. कारण तुम्ही धूळ नसून चेतना आहात.

पतंजली म्हणतात, ‘मनाला पाहा. मन जे करते ते करू द्या. तुम्ही फक्त पाहत राहा. हस्तक्षेप करू नका. प्रेक्षकाच्या भूमिकेत जा. जसे काही ते तुमचे मनच नाही. तटस्थतेने हे पाहणे म्हणजेच योग होय.’ मनाचे तरंग स्थिरावणे व मन निश्चल स्थितीत जाणे हे योग साधनेचे टप्पे आहेत. योग च्या अंतिम स्थितीत मनातील तरंगांना विराम मिळतो. मन स्थिर अवयव नसून क्रीया आहे, हे समजून घेतल्यास योग सार्थक होतो.
(आेशो ध्यानधारणा केंद्र, पुणे)
बातम्या आणखी आहेत...