आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Tuberculosis Control By Dr. Nargis Mistry

क्षयरोग नियंत्रण: जगातील १/४ पेक्षा जास्त क्षयरोगाचे रुग्ण भारतात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोग्य ही संपत्ती आहे, हे घासून गुळगुळीत झालेले विधान आहे. पण आपल्या देशात आरोग्य ही खरोखरच संपत्ती मानली जाते का, हा कळीचा प्रश्न आहे. आपला देश कर्करोग, हृदयविकार आणि क्षयरोगासारख्या संसर्गजन्य रोगांचा जणू जागतिक नेता आहे. आपल्या सरकारी धोरणांमध्ये (राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या केवळ दोन टक्के रक्कम आरोग्य सेवांसाठी निर्धारित. आरोग्यविषयक प्रश्नाला प्राधान्यच दिले जात नाही आणि त्याकडे पुरेशा गांभीर्याने पाहिलेही
जात नाही.

या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा अंदाज घेता हे स्पष्ट होते की, जगातील एक चतुर्थांशपेक्षा जास्त क्षयरोगाचे रुग्ण भारतात आहेत. गंभीर बाब म्हणजे, औषधांना प्रतिसाद न देणाऱ्या क्षयरोगी रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे; तरीही जगातली सर्वात मोठी क्षयरोग नियंत्रण मोहीम आखल्याचे, राबवल्याचे श्रेय भारताला दिले गेले, ही आश्चर्यकारक विसंगती आहे. खरं तर औषधांना प्रतिसाद न देणाऱ्या रुग्णांची संख्या वाढणे, हे आपल्या अकार्यक्षमतेचे, कल्पनादारिद्र्याचे, अक्षम्य दुर्लक्षाचे निदर्शक आहे. सध्या उपलब्ध असलेल्या क्षयरोग प्रतिबंधक औषधांच्या संदर्भातील नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात पंतप्रधानांनी क्षयरोग ही राष्ट्रीय आपत्ती असल्याचे म्हटले आहे. ते खरेही आहे. ही खरोखरच आणीबाणीसदृश स्थिती आहे. या परिस्थितीशी सामना कसा करायचा?

वायुप्रदुषण व कुपोषण हे रोग पसरण्याचे मुख्य कारण, क्षयरुग्णांना पौष्टिक आहार पुरवणे हे अग्रक्रमाने हवे : क्षयरुग्णांना किमान निदान आणि उपचार सुविधा सरकारी वा खाजगी स्तरावर उपलब्ध करून देणे, हे प्रत्येक राज्य सरकारचे आद्य कर्तव्य आहे. या पातळीवर आपण नेहमीच अपयशी ठरलो आहोत. निदान पद्धती अद्ययावत करण्यात आपण नेहमीच गरजेच्या मानाने कितीतरी कमी पडतो. भारताने निदान तंत्रामध्ये जास्त गुंतवणूक करण्याची गरज आहे, पण सरकार त्याबाबत उदासीन आहे. क्षयरोगाचे निदान करण्यासाठी एखाद्या रुग्णाने पैसे का मोजावे? आणि ते इतके खर्चिक का असावे? प्राथमिक आणि अद्ययावत क्षयरोग निवारण औषधांचा तुटवडा नेहमीच जाणवतो, पण त्याचे समर्पक स्पष्टीकरण मात्र मिळत नाही. २०१३मध्ये मोठ्या प्रमाणावर क्षयरोग प्रतिबंधक औषधांचा तुटवडा जाणवला. भारतभर त्याचा बोलबाला झाला; पण उपाययोजना मात्र संथ! याची जास्त झळ क्षयरुग्ण बालकांना अधिक लागली. बालकांसाठी आवश्यक क्षयरोग प्रतिबंधक औषधांचा आवश्यक पुरवठा करण्यात यंत्रणा अपयशी ठरली.

क्षयरोग हा संसर्गजन्य रोगजंतूंपासून होणारा आजार आहे. अमर्याद लोकसंख्या, अस्वच्छ परिसर, अयोग्य कचरा व्यवस्थापन, मोठ्या प्रमाणावरील वायू प्रदूषण आणि कुपोषण ही अशा प्रकारचे आजार पसरण्यामागची मुख्य कारणे आहेत. दुर्दैवाने क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाचा आवाका औषधे आणि तंत्रज्ञान एवढाच मर्यादित असून, या मुख्य कारणांकडे क्वचितच लक्ष पुरवले जाते. क्षयरुग्णांना पौष्टिक आहार पुरवणे हे अग्रक्रमाने केले पाहिजे.

पोलियो मोहीम जितक्या यशस्वीपणे राबवली गेली, तशी क्षयरोग नियंत्रण मोहीम वेग घेताना दिसत नाही. क्षयरोग निदानासाठी व सध्याची औषधे लागू न पडणाऱ्या क्षयरोगकारक रोगजंतूंची तपासणी करण्यासाठी चांगल्या दर्जाच्या अद्ययावत प्रयोगशाळा व यंत्रणा भारतात पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. क्षयरोगाने मरण पावणाऱ्या रुग्णांची नेमकी संख्याही सरकारकडे उपलब्ध नाही.कारण क्षयरोगाचे दोन तृतीयांश रुग्ण खाजगी दवाखान्यांमध्ये उपचार घेत असल्याने भारतातील क्षयरुग्णांची सरकार दरबारी नोंद सापडत नाही.
jahagirdar.pv@gmail.com