आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा - भविष्याच्या दृष्टीनेच असावी आयुष्याची रूपरेषा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डमी पिक)
पहिली कथा : नवाज शेख हा सोलापूर जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम भागातील मुलगा. त्याचे वडील रोजंदारीवर काम करतात, तरीही शिक्षण सोडले नाही. तो मन लावून अभ्यास करायला लागला. मेडिकल मायक्रोबायोलॉजीमध्ये त्याने पदव्युत्तर पदवी मिळवली. याचदरम्यान त्याची लोगो डिझायनिंगमध्ये आवड निर्माण झाली. देशामध्ये होणाऱ्या लोगो स्पर्धांमध्ये नवाज हमखास भाग घेत असतो. मात्र, त्याच्या लोगोकडे निवडकर्त्यांचे कधीच लक्ष गेले नाही. दरम्यान, गेल्या आठवड्यातच नवाजने केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणासाठी घेण्यात आलेली राष्ट्रीय लोगो स्पर्धा जिंकली. त्याला या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा ब्रँड अॅम्बेसेडरही करण्यात आले. सध्या तो पुण्यातील राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेत तांत्रिक अधिकारी म्हणून काम करत आहे.
दुसरी कथा : ही कथा अमेरिकेतील आहे. जेनेविव्ह जॉन्सन ९४ वर्षांच्या आहेत. १९३४ मध्ये त्या बोस्टन येथील वेस्टफोर्ड अकॅडमीत होत्या. त्या आपले शालेय शिक्षण पूर्ण करू शकल्या नाही. कारण त्यांना कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मिलमध्ये काम करावे लागले. मात्र, तरीही त्यांची शिकण्याची इच्छा होती. या इच्छेमुळेच त्यांनी ७८ व्या वर्षी शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या वर्गातील मुले म्हणतात, ‘जेनेविव्ह यांनी अमेरिकेन इतिहास आकार घेताना पाहिला आहे. त्यांनी वर्गामध्ये मनोरंजक कथा सांगितल्या. यामुळे इतिहास विषय समजून घेण्यास मदत झाली.’
तिसरी कथा : ही कथा राजस्थानातील गंगापूर सिटीमध्ये भीक मागणाऱ्या एका भिकाऱ्याची आहे. ती दैनिक भास्करने नुकतीच प्रकाशितही केली आहे. ज्या हातांमध्ये तीन वाजेपर्यंत वाडगे असते, त्याच हातांमध्ये त्यानंतर पुस्तके असतात आणि पावले महाविद्यालयाकडे वळतात. ४८ वर्षीय शिव सिंह या वयात शासकीय विधी महाविद्यालयातून कायद्याचे शिक्षण घेत आहेत. त्यांनी वृत्तपत्रामध्ये जाहिरात पाहिली होती. त्यानंतर पुस्तके खरेदी केली. भीक मागत अभ्यास केला आणि प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण होत महाविद्यालयात प्रवेश मिळवला. एकेदिवशी अवश्य नोकरी मिळेल, या आशेने त्यांनी मन लावून अभ्यास केला. त्यांनी एकही लेक्चर सोडला नाही. लेक्चर नसल्यावर ते महाविद्यालयाच्या ग्रंथालयात बसून अभ्यास करतात.
चौथी कथा : मूळ भारतीय असलेला शुभम बॅनर्जी कॅलिफोर्निया येथील सँटा क्लारा शाळेत आठवीमध्ये शिकत आहे. काही दिवसांपूर्वी सर्वात स्वस्त पोर्टेबल ब्रेल प्रिंटर विकसित केल्यामुळे तो प्रकाशझोतात आला होता. आता अनेक मोठ्या कंपन्यांची नजर त्याच्यावर आहे. बाजारामध्ये ब्रेल प्रिंटर नव्हते, असेही नाही. मात्र, त्यांची किंमत २००० डॉलरपर्यंत आहे, तर शुभमने बनवलेल्या प्रिंटरची किंमत फक्त ३५० डॉलर आहे. जगभरातील लाखो दृष्टिहीनांसाठी हे प्रिंटर सहायक ठरेल. यापैकी ९० टक्के अंध लोक विकसनशील देशांमध्ये राहतात. त्यातही एकतृतीयांश अंध भारतामध्ये आहेत. शुभमचे म्हणणे आहे की, ‘मी बनवलेल्या उपकरणाचा फायदा माझ्याच देशातील लोकांना सर्वाधिक होणार आहे.’ सध्या तो जगातील वेगवेगळ्या कारणांनी अशक्त असणाऱ्या लोकांना फायदेशीर ठरणाऱ्या अनेक प्रोजेक्टवर काम करत आहे. शुभम म्हणतो, ‘जगभरातील गरीब लोकांना कामी येईल, असे काहीतरी बनवा.’
फंडा हा आहे की...
तुम्ही आपल्या आयुष्याची रूपरेषा सुरुवातीपासूनच तयार करायला हवी. ही एखादी आऊटलाइन, स्केच किंवा सामान्य चरित्राच्या रूपातही असू शकते. मात्र, ती आपल्याला पुढे जाण्यासाठी आणि काहीतरी मिळवण्यासाठी प्रेरित करणारी असावी.