आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा - नशीब नव्याने लिहिण्याची संधी प्रत्येकाला मिळते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेबी हालदारचे नाव तुम्ही ऐकले असेल. तिचा जन्म जम्मू-काश्मीरमध्ये झाला. दोन वर्षांनंतर तिचे कुटुंब कोलकाताजवळील दुर्गपूर येथे स्थायिक झाले. लहानपण गरिबीमध्ये गेले. तिचे वडील ट्रकचालक होते आणि खूप दारू प्यायचे. दारू पिऊन तिला आणि आई गंगा राणीला विनाकारण मारझोड करायचे. बेबी सुरुवातीपासूनच हे सर्व पाहत आली आहे. अखेर छळाला कंटाळून तिच्या आईने घर सोडले. १२ वर्षांची असताना बेबीच्या वडिलांनी तिचे लग्न तिच्यापेक्षा दुप्पट वय असलेल्या मुलासोबत लावून दिले.
बेबी एवढी निरागस आणि गरिबी एवढी निर्दयी होती की, दोन वेळ भरपेट जेवण मिळेल, या उद्देशाने ती लग्नामुळे खुश झाली. इतर गोष्टींपासून अनभिज्ञ असलेल्या बेबीने वर्षभरानंतर सुबोधला जन्म दिला. सात वर्षांनंतर तपोष आणि दोन वर्षांनंतर मुलगी टियाचा जन्म झाला. आयुष्य सुरुवातीपासूनच निर्दयी होते. आधी आईला गमावले, नंतर बहिणीला आणि आता पतीने तिचे डोके फोडले. कारण ती एका अनोळखी व्यक्तीसोबत बोलली होती. बेबीचे वैवाहिक जीवनही तिच्या आई-वडिलांप्रमाणेच झाले होते. लग्नाच्या १२ वर्षांनंतर बेबीनेदेखील दारुड्या पतीपासून सुटका करून घेण्यासाठी तेच केले जे आईने केले होते. तिनेदेखील घर सोडले. मात्र, आईविना मुलांचे किती हाल होतात, हे तिला चांगले माहीत होते. त्यामुळे ती मुलांनाही सोबत घेऊन गेली.

२४ वर्षांची असताना तिन्ही मुलांना घेऊन १९९९ मध्ये नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी दिल्लीला आली. दोन वर्षांपर्यंत घरोघरी जाऊन धुणी-भांडी केली. अखेर अँथ्रोपोलॉजीचे निवृत्त प्राध्यापक प्रबोध कुमार यांच्या घरी काम मिळाले. ते मुंशी प्रेमचंद यांचे चिरंजीव आहेत. येथूनच बेबीच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू झाला. एकेदिवशी प्रबोध यांनी तिला पुस्तकांच्या अलमारीजवळ पाहिले. ती वाचण्याचा प्रयत्न करत होती. मालकाची नजर पडताच ती घाबरली आणि माफी मागितली. घाबरू नकोस, तुला जेव्हा वाटले तेव्हा तू वाचू शकते, असे प्रबोध यांनी तिला समजावून सांगितले. तिला वही-पेनही दिला आणि म्हणाले की, तुझ्या मनामध्ये ज्या गोष्टी येतात त्या लिहित जा. आयुष्याची २४ वर्षे सरल्यानंतर वही-पेन हातात घेताच तिच्या डोळ्यांतून अश्रू आले. ती १४ वर्षांपर्यंत लिखाण करत राहिली.

सकाळी ते ११ वाजेपर्यंत काम केल्यानंतर ती लिखाण करायची. प्रबोध यांनी काही पाने वाचल्यावर खूप खुश झाले. त्या पानांमध्ये दु:ख आणि लाचारीशिवाय काहीच नव्हते. मात्र, प्रत्येक गोष्ट आदरपूर्वक कथन करण्यात आली होती. बेबी बंगाली भाषेत लिखाण करत होती. प्रबोध यांनी त्याचा हिंदी अनुवाद केला. २००२ मध्ये ‘आलो आंधारी’ (प्रकाशमान अंधार) या नावाने पुस्तक काढण्यात आले. मूळ बंगालीतील या पुस्तकाची भरपूर विक्री झाली. दोन वर्षांनंतर ‘अ लाइफ लेस ऑर्डिनरी’ नावाने इंग्रजीतील अनुवादित पुस्तकही प्रकाशित झाले. याच्या १० लाखांपेक्षा जास्त प्रतींची विक्री झाली. त्यानंतर याचा २४ भाषांमध्ये अनुवाद झाला. बेबी हलदारचे आता साहित्य विश्वात आदराने नाव घेतले जाते.

‘एशस्त रूपांतर’ नावाचे दुसरे पुस्तकही काढले. गेल्या वर्षी तिसरे ‘घरे फेरार पथ’ हे बंगाली भाषेतील पुस्तक छापण्यात आले. न्यूयॉर्क टाइम्सने तर याची तुलना पुलित्झर पुरस्कार विजेत्या फ्रँक मॅक्कोर्ट अँजेला यांच्या ‘अॅशेज’सोबत केली. ही अत्यंत साधारण पद्धतीने सांगितलेली कथा असून यासाठी साहित्यिक असण्याची गरज नाही.’ बेबी हलदारला रॉयल्टी मिळत आहे. पुस्तक प्रदर्शनांमध्ये ती विदेशातही जाते. मात्र, अजूनही ती प्रबोध यांच्याकडेच काम करते. कारण गरीब लोकांचे आयुष्य मोलकरीण म्हणून काम करतच अनुभवले जाऊ शकते, असे तिला वाटते.
फंडा हा आहे की...

ईश्वर प्रत्येकाला आपले नशीब नव्याने लिहिण्याची एक संधी अवश्य देतो. जे लोक या संधीचा फायदा घेतात ते पुढे जातात, जे घेत नाहीत ते नशिबाला दोष देत बसतात.