पहिली कथा : गेल्या आठवड्यात शुक्रवारी पहाटे तीन वाजताची घटना आहे. पुण्यापासून जवळच असलेल्या न-हे गावाजवळ पिताराम हाइट्स नावाच्या सहा मजली इमारतीमधील २० कुटुंबातील लोक गाढ झोपेत होते. तितक्यात २९ वर्षांच्या संदीप मोहितेने जणूकाही धोक्याची घंटाच वाजवली. त्याने इमारतीमध्ये कंपन होत असल्याचे पाहिले.
एकही क्षण न थांबता संदीपने सर्वांना बाहेर निघण्यास सांगितले. याचदरम्यान काही घरांचे मुख्य दरवाजे जाम असल्याचे दिसून आले. संदीपने ते दरवाजे तोडले आणि लोकांना सुरक्षित बाहेर येण्यास मदत केली. त्या क्षणाला त्याची धमक आणि शौर्य लोकांच्या मनात खोलपर्यंत उतरलेले होते. मात्र,
आपल्या नव्या कारलाही वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे संदीपने ठरवले. ही कार त्याच्या वडिलांनी नुकतीच भेट म्हणून दिली होती. तो बेसमेंटच्या दिशेने धावला. हाच तो दुर्दैवी क्षण होता, जेव्हा संपूर्ण इमारत त्याच्या अंगावर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. डिझास्टर मॅनेजमेंट रिस्पॉन्स फोर्स आणि पुण्याच्या अग्निशमन दलातर्फे १२ तासांपर्यंत चाललेल्या मोहिमेचा कोणताच फायदा झाला नाही. त्यांनी दोन श्वान पथकांसह १०५ सदस्यांची टीम कामाला लावली.
संदीप इमारतीच्या ढिगाऱ्यामध्ये सुमारे १३ तास दबलेला होता. त्याला बाहेर काढण्यात आले तेव्हा त्याला श्वास घेतानाही खूप त्रास होत होता. त्याला तत्काळ स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले. तेथेच त्याने शेवटचा श्वास घेतला. ज्यांचा नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत्यू झाला आहे, अशा लोकांच्या कुटुंबीयांनाच मोबदला देण्याची तरतूद आहे. मात्र, या घटनेत संदीप मोहितेचा मृत्यू नैसर्गिक आपत्तीमुळे झाला नसल्याचे सांगण्यात आले. शासनाच्या अनेक विभागांच्या अधिकाऱ्यांनी संदीपच्या कुटुंबीयांना मोबदला मिळवून देण्यासाठी भरपूर प्रयत्न केले, परंतु नियमाच्या पुस्तकामध्ये मोबदला देण्याची अशी कोणतीच तरतूद त्यांना सापडली नाही. अशा वेळी मुख्यमंत्री निधीतून काही रक्कम त्याला मिळवून देणे एवढाच पर्याय त्यांच्याकडे होता. त्यांनीदेखील हेच केले.
दुसरी कथा : नवी दिल्लीतील त्रिलोकपुरी येथे १९८४ मध्ये जेव्हा दंगल उसळली होती तेव्हा हरबंस सिंह सुमारे ३० वर्षांचे होते. ज्याला दंगलखोर शोधत होते, दुर्दैवाने ते त्याच समुदायातील होते. जर त्यांच्या मुस्लिम शेजाऱ्यांनी त्यांना बुरख्यामध्ये लपवले नसते आणि आपल्या घरात आश्रय दिला नसता तर त्या काळात ते दंगलखोरांकडून मारले गेले असते. गेल्या पंधरवड्यात त्रिलोकपुरीच्या त्याच भागात पुन्हा जातीय तणाव निर्माण झाला. या वेळी हरबंस नव्या भूमिकेसह सर्वांच्या समोर आले. ज्यांनी त्या काळात आपला जीव वाचवला होता, ते मुस्लिम शेजारी या वेळी संकटात सापडले होते. त्यांच्यासाठी हरबंस यांनी आपल्या घरामध्ये आश्रय देऊन जुने उपकार फेडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या अगदी घरासमोरच राहणाऱ्या मोहंमद कुर्बान यांना स्वत:च्या घराला कुलूप लावून आपल्या मुलांना दूर पाठवावे लागले. ते स्वत: सिंह यांच्या घरी थांबले. तेव्हा सर्वत्र तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. मात्र, अशा परिस्थितीही हरबंस सिंह यांनी संयम दाखवत कुर्बान सारख्या लोकांना आपल्या घरात आश्रय दिला. यामुळे अल्पसंख्यकांना खूप मोठा आधार मिळाला.
फंडा हा आहे की...
आपला जीव तेव्हाच धोक्यात घालावा जेव्हा आपल्यामुळे अनेक लोकांचा जीव वाचू शकतो. संपत्तीसाठी जिवाची बाजी लावू नये.