आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा - पीडित आणि वाचलेले लोक एकाच नाण्याच्या दोन बाजू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रूपाचा जन्म झाल्याच्या दोन वर्षांनंतर तिच्या आईचे निधन झाले. ही घटना दुसऱ्या मुलाच्या जन्मादरम्यान घडली. उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरतील ही घटना आहे. न्हावी काम करणारे वडील दोन मुलांची व्यवस्थितपणे काळजी घेऊ शकत नव्हते. त्यामुळे त्यांनी दुसरे लग्न केले, जेणेकरून मुलांना आईचे प्रेम मिळेल. सुरुवातीला सावत्र आई खूप साधी आणि प्रेमळ वागत होती. जेव्हा ती स्वत: दोन मुलांची आई झाली, तेव्हा सावत्र मुलांना उपाशी ठेवून त्यांना त्रास द्यायला लागली.
रूपाची सावत्र आई खूप निर्दयीपणे वागत होती. तिने त्यांच्या वडिलांना सांगितले की, या मुलांना नवी दिल्ली येथे त्यांच्या काकांकडे पाठवून द्या. मात्र, रूपा १५ वर्षांची झाल्यावर तिच्या वडिलांनी तिला पुन्हा आपल्या घरी आणले. कारण तिचे लग्न करायचे होते. तथापि, हे बेकायदेशीर होते. तिची सावत्र आई तिच्याकडून पहाटे पाच ते रात्री ११ वाजेपर्यंत काम करून घेत होती. तिला झोपेपर्यंत उपाशी ठेवत होती. तिच्या साखरपुड्याच्या एक दिवस आधी ऑगस्ट २००८ रोजी रूपाचे वडील शहरात गेले. तिच्यासाठी नवीन कपडे आणि कुटुंबासाठी गोड पदार्थ घेऊन आले. मात्र, तिची सावत्र आई यामुळे नाराज होती.

त्या रात्री रूपा घराबाहेरील ओसरीत झोपली. याचदरम्यान तिच्या सावत्र आईने तिच्यावर हल्ला केला. पहाटे तीन वाजेदरम्यान तिच्या चेहऱ्यावर खूप वेदना जाणवत होत्या. जणू तिच्या चेहऱ्यावर कुणीतरी उकळते पाणी टाकले आहे. आपला चेहरा जळाल्यासारखे तिला वाटत होते. भयावह वेदना सहन करत ती दिसेल त्या दिशेने पळायला लागली. खूप अंधार असल्याने ती अनेकदा खालीदेखील पडली. मदतीसाठी टाहो फोडला, पण तिच्या सावत्र आईने तिच्याकडे पाहिलेसुद्धा नाही. जवळच राहणारे तिचे आजोबा तिला तातडीने रुग्णालयात घेऊन गेले. डॉक्टरांनी सांगितले की, तिचा चेहरा ८० टक्के जळाला आहे. ती उजव्या डोळ्याने अंध झाली आहे. रूपाच्या सावत्र आईला खटला सुरू होण्यापूर्वी १८ महिन्यांपर्यंत कारागृहाची हवा खावी लागली. मात्र, पुराव्यांअभावी २०१० मध्ये तिची सुटका झाली. त्यामुळे रूपा आणखीनच दु:खी झाली. आपण पीडित नसून दुर्घटनेतून बचावलो आहोत, हे समजण्यासाठी तिला सहा वर्षे लागली. दरम्यान, २०१४ मध्ये नवी दिल्ली येथील एका स्टुडिओमध्ये पाच मैत्रिणी ग्रुप फोटो काढण्यासाठी तयारी करत होत्या. अत्यंत उत्साहामध्ये २२ वर्षाची रूपा ड्रेसिंग टेबलासमोर बसली आणि तिने काळे आयलायनर लावले. ती समोर वाकली, स्वत:ला आरशात पाहिले आणि हसली.
आपला पांढरा स्लिव्हलेस ड्रेस व्यवस्थित असल्याची खात्री करून घेतली. ती खूप सुंदर दिसत होती. इतर चौघीही तिच्यासारख्याच तेजाब हल्ल्याच्या पीडित होत्या. आपला चेहरा लोकांना दाखवण्याची त्यांनी हिंमत दाखवली नव्हती. मात्र, आमची स्वप्ने पूर्ण करण्याची ताकद बाळगून असल्याचे त्यांनी जगाला दाखवून दिले.

फॅशन फोटोग्राफर राहुल शरणने लाइट्स आणि इतर उपकरणे तपासली. त्याने या मुलींचे फोटो काढण्याचा निर्णय घेतला होता. नवी दिल्ली येथील सेवाभावी संस्था स्टॉप अॅसिड अटॅक्सच्या मदतीने या पाच मुली राहुलला पोज देण्यास सज्ज झाल्या होत्या. रूपाने फॅशन डिझायनिंगचा कोर्सही केला होता. त्यामुळे तिच्याकडे तिने स्वत: तयार केलेले भारतीय ड्रेसदेखील होते. आज रूपा डिझायनर आहे. रूपा क्रिएशन्स या बॅनरखाली तिने तयार केलेले कपडे अमेरिकन पर्यटक घेऊन गेली.
फंडा हा आहे की...
जर तुम्ही स्वत:कडे पीडित म्हणून पाहत असाल तर वाईट वाटेल. तसेच आपण घटनेतून बचावलो, असा विचार करत असाल तर तुम्ही तुमच्यातील ताकद ओळखली, असे समजावे.