आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा - नियमांचा फायदा होत नसेल तर तो निरर्थक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या जमिनीसाठीकुणी स्वत:ची किडनी विकल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? अशीच एक हृदय हेलावून टाकणारी कथा.

कधीकाळी टिपू सुलतानची राजधानी असलेल्या श्रीरंगपट्टणम येथे चिक्कनामाडे गौडा यांची १८ एकर जमीन होती. गौडा कुटुंबीयांनी जीवनात अनेक हालअपेष्टा सहन केल्या. गरिबीत जीवन काढले. अर्धपोटी झोपले. मात्र, जमीन विकली नाही. ती गहाणही ठेवली नाही. त्यांचे वय वाढत होते. त्यांनी जमीन पत्नी किंवा मुलांच्या नावावरही केली नव्हती.

चिक्कनमाडे यांचे तीन वर्षांपूर्वी आकस्मिक निधन झाले. त्यांची ५५ वर्षीय मुलगी चिक्कतयम्मा यांनी जमीन त्यांच्या आईच्या नावे करण्यासाठी ग्रामपंचायतीपासून ते राजधानी बंगळुरूमधील मंत्रालयापर्यंत उंबरठे झिजवले. तरीही उपयोग झाला नाही. मात्र, अचानक एके दिवशी त्यांच्या १८ एकर जमिनीपैकी तीन एकर जमीन एकाच्या नावावर हस्तांतरित केली असल्याचे कळले. तो तीन वर्षांपासून जमिनीची देखरेख करण्यासाठी ये-जा करत होता. जमिनीच्या सर्व कागदपत्रांमध्ये गुंतागुंत असल्याचे कळल्यावर त्यांना धक्काच बसला.

जमीन नावावर करण्यासाठी त्या ज्यांना-ज्यांना भेटल्या, त्यांनी त्यांच्याकडे मोठ्या रकमेची मागणी केली. महसूल अधिकाऱ्यांनीसुद्धा कागदपत्रांमध्ये सुधारणा करण्यासाठी त्यांच्याकडे एकरी आठ हजार रुपयांची मागणी केली होती. अखेर २०१३ मध्ये त्या मोलकरीण म्हणून काम करत असताना कुणीतरी त्यांना ८० हजार रुपयांत किडनी विकण्याचा सल्ला दिला. या पैशातून जमीन खरेदी करता येईल आणि न्यायालयाचा खर्चही निघेल, असे त्यांना सांगण्यात आले. मात्र, पूर्ण पैसे खर्च करूनही जमीन त्यांच्या नावावर झाली नाही. त्यानंतर त्यांनी विरोध केला असता तुमच्याकडून कोणी-कोणी लाच घेतली त्यांची नावे सांगा, असे तपास अधिकाऱ्यांनी त्यांना विचारले. तसेच जिथे किडनी काढण्यात आली त्या रुग्णालयाचे नावही विचारले. मात्र, अशिक्षित असल्याने चिक्कतयम्मा काहीच सांगू शकल्या नाहीत. त्यामुळे कोणतीच कारवाई झाली नाही.

चिक्कतयम्मा यांनी जमीनही गमावली आणि स्वत:ची किडनीही. याशिवाय औषधोपचारातही पूर्ण पैसा खर्च झाला. एके दिवशी कर्नाटकच्या लोकायुक्तांनी राज्यातील महसूल अधिकाऱ्यांच्या घरी धाडी मारल्या. त्यातील काही अधिकाऱ्यांची छायाचित्रे टीव्हीवर झळकली. तिने यातील एका अधिकाऱ्यास ओळखले. हाच अधिकारी त्यांच्या जमीन प्रकरणातील मुख्य सूत्रधार होता. प्रसारमाध्यमात हे प्रकरण झळकल्यामुळे मोठ्या अधिकाऱ्यांनी त्यांना मदत केली. जमीन प्रकरणाचा पुन्हा तपास सुरू झाला. या प्रकरणी लवकरच दोषींना कठोर शिक्षा होईल.

दुसरे प्रकरण मुंबई येथील वर्सोव्याचे आहे. ज्येष्ठ नागरिक जयश्री घोलकर यांची येथे ३० कोटी रुपयांची मालमत्ता होती. याच परिसरात बॉलीवूड अभिनेते आणि टीव्ही इंडस्ट्रीतील कलाकार राहतात. सीनियर सिटीझन सिक्युरिटी सेल ही संस्था सक्रिय असूनही त्यांचा मृत्यू भिकाऱ्यासारखा झाला. त्या रस्त्यावर गंभीर जखमी अवस्थेत पडलेल्या होत्या. त्यांना ओळखताही येत नव्हते. झगमगाटाच्या या शहरातील माणुसकी संपलेली असतानाच त्यांना जेजे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले. त्यानुसार पोलिसांनी त्यांना जानेवारी रोजी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. जानेवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.
फंडा हा आहे की...
जर नियम-कायद्यांमुळे रांगेत उभ्या असलेल्या शेवटच्या व्यक्तीला फायदा पोहोचत नसेल, तर असे नियम बनवण्यात आपला वेळ वाया घालवू नका. हे व्यर्थ आहे.