आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा - एखाद्याची नकारात्मक कथा तुम्हाला सकारात्मक दिशा देऊ शकते...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विश्वंभर जगताप स्मार्ट शेतकरी आहेत. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांपेक्षाही चतुर. अनेक शेतकऱ्यांनी दुष्काळामुळे आत्महत्या केली. तथापि हा ‘बडा’ शेतकरी आपली शेतजमीन हिरवीगार आणि सुपीक ठेवण्यात यशस्वी ठरला. खूप मोठ्या जमिनीचे मालक असल्याने प्रभाव आणि पैशांच्या ताकदीमुळे ते वाट्टेल त्या जागेवर बोअरवेल खोदत होते. २००५ पासून पाऊस होत नसल्याने सर्वत्र दुष्काळ पडला होता. जगताप यांनी खोदलेल्या बोअरवेल्सची खोली मुंबईतील गगनचुंबी इमारतींएवढी आहे. त्यांच्या बोअरवेल्स कमीत कमी १००० फूट खोल आहेत. ही खोली मुंबईतील ६० मजली इमारतीएवढी आहे.
दुष्काळग्रस्त बीड जिल्ह्यात डाळिंबाची बाग असलेले जगताप सेलिब्रिटी आहेत. त्यांच्या बागेत ४८ बोअरवेल आहेत. १० वर्षांपेक्षा जास्त काळापासून या दुष्काळी आणि सिंचनाच्या सुविधा नसलेल्या भागात आपली बाग हिरवीगार ठेवण्यासाठी ते सातत्याने बोअरवेल खोदत आले आहेत. तथापि, सर्व बोअरवेल जमिनीखालील पाण्याच्या एकाच स्रोतापासून पाणी घेतात. त्यामुळे काही महिने साथ दिल्यानंतर ते आटतात. आजघडीला ४८ पैकी फक्त १५ बोअरवेलच पाणी देत आहेत.
दरवर्षी त्यांच्यासमोर संकट येते तेव्हा ते बोअरवेल खोदण्यावर एक लाख रुपये खर्च करतात आणि काही महिन्यानंतर बोअरवेल निकामी होते. खरे म्हणजे जादूटोणा आणि लिंबू-मिरची इत्यादींद्वारे जमिनीखाली पाणी असल्याचा दावा करणाऱ्या लोकांची या भागात कमतरता नाही. अशास्त्रीय पद्धतीने अशा ठिकाणी बोअरवेल खोदण्यासाठी शेतकऱ्याला भरपूर रक्कम खर्च करावी लागते. परिणामी तो कर्जबाजारी होतो. पाणी मिळाले तरी तीन महिन्यात आटते. लाचार होऊन त्यांना ३००० रुपये टँकरप्रमाणे पाणी विकत घ्यावे लागते. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने २०११ मध्ये सादर केलेल्या आपल्या अहवालात महाराष्ट्र सरकारला सांगितले होते की, राज्यात सिंचनाच्या दोन लाखांपेक्षा जास्त आणि घरगुती १.६९ लाख बोअरवेल आहेत. विशेष म्हणजे त्या एकाच स्रोतापासून पाणी घेत आहेत.
एकूणच या जलसंकटाने ग्रामीण भागातील हजारो लोकांना भू-जलच्या अवैध बोअरवेल उद्योगाकडे वळवले आहे. यामुळे जमिनीखालील पाण्याची पातळी खालावत असून पर्यावरणालाही धोका निर्माण होत आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये मराठवाड्यातील ७६ पैकी ६१ तालुक्यांमधील जमिनीखालील पाणीपातळी खालावली आहे. सर्वेक्षण करण्यात आलेल्या कमीत कमी २५ तालुक्यांमध्ये पाणीपातळी एक ते दोन मीटरने खालावली आहे.
तुम्ही याला अवैध बोअरवेलची लॉबी म्हणा किंवा सिंचन घोटाळ्यांचा बोअरवेल मेनिया, परंतु शेती व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी पर्यायी पद्धतींचा शोध घेतला जात नाही, हे सत्य नाकारता येणार नाही. विविध कारणांनी सर्वाधिक पाणी लागणाऱ्या उसाच्या शेतीऐवजी कमी पाणी लागणारे पर्यायी पीक घेण्यासही शेतकरी तयार नाहीत. कोणत्याही जलतज्ज्ञाला विचारा. तो हेच सांगेल की, कठीण खडक असलेल्या कोणत्याही क्षेत्रात २०० फुटांच्या पुढे पाणी मिळणे कठीण असते आणि जास्त खोल खोदल्यासही काहीच हाती लागत नाही. मात्र, अशा शास्त्रीय माहितीच्या अभावामुळे बिचारे शेतकरी अशास्त्रीय पद्धतीने पाणी सांगणाऱ्यांच्या नादी लागतात आणि कर्जबाजारी होतात. शेतकऱ्यांच्या आयुष्यात हरित क्रांती आणण्यासाठी राज्य सरकार पाण्याच्या साठवणुकीचे विकेंद्रीकरण आणि सूक्ष्म सिंचनासारखे इतर पर्यायही देत आहे.
फंडा हा आहे की...
तुम्हाला तुमचा व्यवसाय टिकवून ठेवायचा असेल तर विनाशाच्या कथांमधून तुम्ही सकारात्मक मार्ग काढू शकता. तो तुम्हाला अल्पावधीच्या उपायांपासून रोखतो.