आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा - पुढे जाण्यासाठी समाजाचे विचार बदला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मी सहसा फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत नाही. मात्र, एके दिवशी मी बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील एका लहान गावातील १७ वर्षांच्या मुलीला रिक्वेस्ट पाठवली. येथे मैथिली भाषा बोलली जाते. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ ३५०१ चौरस किलोमीटर असून लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार ४४ लाख आहे.

फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्याची काही कारणे होती. निवडणुकीचे वार्तांकन करण्यासाठी मधुबनी जिल्ह्यातील चंपा, भुताही आणि फुलकाही येथे गेलो होतो. येथील शाळा-महाविद्यालयांमध्ये जाणाऱ्या मुलांनी एक विनंती केली. त्यांनी माझ्या लॅपटॉपवर चि़त्रपट दाखवण्यास सांगितले. माझ्या लॅपटॉपमध्ये कोणताही चित्रपट नसल्याचे मी त्यांना सांगितले. त्यावर माझा लॅपटॉप नकली असल्याचे ते म्हणाले. त्यांच्या अशा वागण्याने मी नाराज झालो. मात्र, त्यांनी मला विचार करायला भाग पाडले. त्यांच्यासाठी लॅपटॉप म्हणजे टीव्ही किंवा चित्रपट दाखवणाऱ्या उपकरणाचे एक्स्टेन्शन आहे, याची मला जाणीव झाली. लॅपटॉप काय आहे, इंटरनेट काय आहे, हे त्यांना माहीत नव्हते. मात्र, या गावातील काही लोकांचे फेसबुकवर अकाउंट आहेत आणि त्यांची फ्रेंडलिस्टही आहे, हे समजल्यावर मला आश्चर्याचा धक्का बसला.

या बदलाची सुरवात ३९ वर्षीय नवेंदू कुमारने केली होती. तो बेल्हीचा रहिवासी आहे. तो आता न्यूयॉर्कमध्ये मॅरील लिंचमध्ये काम करतो. त्याने गावातील युवक-युवतींसाठी २०१३ मध्ये संगणक प्रशिक्षणाला सुरुवात केली होती. २० संगणक, इंटरनेट कनेक्शन, एक टॅब्लेट, जनरेटर, प्रोजेक्टर आणि मोठ्या स्क्रीनचा समावेश असलेल्या लर्निंग सेंटरमुळे मुलींमध्येही सकारात्मक बदल झाला होता. २०१३च्या पहिल्या बॅचमध्ये २० मुली होत्या, तर दुसऱ्या बॅचमध्ये ही संख्या दुप्पट झाली होती.

सुरुवातीला नवेंदूने प्रशिक्षण देण्यासाठी दोन महिन्यांची सुटी काढली होती. आता त्याच्या पहिल्या बॅचच्या काही मुली गावातील इतर मुलांना शिकवत आहेत. या मुलींपैकीच एक ज्युली आहे. नवेंदू स्काइपच्या माध्यमातून दोन वर्ग घेतो. अखेर त्याला या कामाची प्रेरणा कोठून मिळाली? नवेंदू गरीब कुटुंबातून आला होता. जेव्हा जेव्हा भारतात येत होता तेव्हा तो वाढत्या खासगी शाळा आणि वाढीव शुल्क पाहायचा.
एक दिवस त्याने विचार केला की, शिक्षण सर्वांना मोफत असावे. विशेषत: गरिबांसाठी. मग त्याने होप-ट्रीट कॉम्प्युटर सेंटरची सुरुवात केली. तो इंटरनेटच्या माध्यमातून हिंदीतील सर्व विषयांच्या व्हिडिओ शोधत असतो आणि मुलांना दाखवतो. प्रशिक्षण केंद्रात प्रत्येक मुलाला प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. त्या प्रश्नाचे उत्तर गुगलवर शोधले जाते. नवेंदूचे म्हणणे आहे की, मुली संगणकाचा वापर करतात तेव्हा त्या त्यांच्या हक्क आणि सन्मानाबाबत जागरूक होतात. त्यांची आर्थिक स्वातंत्र्याची योजना तयार होते. कुटुंब आणि मित्रपरिवारासोबत त्या हुंडा प्रथेविरोधात मोकळेपणाने बोलतात. मुला-मुलींमध्ये समानतेबद्दल चर्चा करतात. त्यांच्या फेसबुक पेजवर असे लिहिलेले आहे,
‘इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या मोफत माहितीचा उपयोग योग्य पद्धतीने करून आयुष्यात बदल घडवून आणता येतात. ज्या मुलींना संगणकाचे ज्ञान आहे त्या स्थानिक नोकरीसाठी अर्जदेखील करू शकतात.’
फंडा हा आहे की...
जर संगणक आणि इंटरनेटसारख्या गोष्टींचा वापर चांगल्या कामासाठी केला तर लोकांचे मतपरिवर्तन केले जाऊ शकते. विचारांमध्ये सातत्याने बदल करणे, हीच यशाची गुरुकिल्ली आहे.