‘तुम्ही जग पाहू शकत नाही म्हणून काय झाले, जग तुम्हाला पाहील असे काहीतरी करून दाखवा.’ कदाचित मनोधैर्य वाढवणारे हे शब्द कदाचित उत्कृष्ट असतील. हळूहळू दृष्टीहीन होत असलेल्या
आपल्या मुलास त्याची आई हे शब्द सांगू शकते.
भावेश भाटियाची आई स्वत: कँसरच्या चौथ्या स्टेजवर होती आणि तिनेसुद्धा आपल्या मुलास हेच शब्द सांगितले. डॉक्टरांनी तिला सांगितले की, तुमच्या मुलाच्या डोळ्यांची ज्योत हळूहळू मालवत असून तो काही दिवसांतच पूर्णपणे अंध होईल. मात्र, भावेश डॉक्टरांच्या अंदाजापूर्वीच दृष्टिहीन झाला. तो जन्मापासून अंध नव्हता. तो उत्कृष्ट खेळाडू होता, पण वयासोबत त्याची दृष्टी कमी होत गेली.
२३ वर्षांचा असताना भावेशने आपली दृष्टी पूर्णपणे गमावली होती. यासोबतच त्याचे क्रीडा क्षेत्रातील करिअरही संपुष्टात आले होते. पदवी मिळवल्यानंतर त्याने एका हॉटेलमध्ये टेलिफोन ऑपरेटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. काही वर्षांनंंंतर व्यवस्थापनाने आंधळेपणामुळे त्याला कामावरून कमी केले. आई कँसरचा सामना करत होती आणि वडील महाबळेश्वर येथील एका विश्रामगृहात केअरटेकर होते. भावेशची एका फर्निचरप्रमाणे घरामध्ये राहण्याची इच्छा नव्हती. तो अॅक्युप्रेशर आणि बॉडी मसाज करणे शिकला आणि एका स्थानिक हॉटेलमध्ये पर्यटकांची मसाज करायला लागला.
यादरम्यान त्याने नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाइंडच्या प्रतिनिधींची भेट घेतली आणि मेणबत्ती बनवण्याचे प्रशिक्षण घेतले. आता तो रात्रीच्या वेळी मेणबत्त्या बनवतो आणि सकाळी चर्चच्या बाहेर विकायला जातो. २००३ मध्ये शहरातील एका सोशल क्लबने भावेशला एका प्रदर्शनादरम्यान स्टॉल लावण्यासाठी आमंत्रित केले होते. तेव्हापासून त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. यानंतर आश्चर्यकारक असेही काही घडले. सुट्यांमध्ये मुंबईतील एक पर्यटक महाबळेश्वरला आली. ती भावेशला म्हणाली की, मी जोपर्यंत येथे आहे, तोपर्यंत तुला मेणबत्त्या विकण्यास मदत करेन. आठ दिवसांनंतर ती तरुणी परत जात असताना, माझ्याशी लग्न करशील का, असे तिने भावेशला विचारले.
भावेशसोबत लग्नाच्या निर्णयासाठी नीताने आपल्या कुटुंबीयांना राजी करण्यासाठी खूप मेहनत घेतली. आज ती एका भव्य कँडल बिझनेस आणि वॅक्स म्युझियमची प्रमुख आधारस्तंभ आहे. तिच्यासोबत २०० दृष्टिहीन लोक काम करतात. नीता सनराईज कँडल्स नावाच्या कंपनीची संस्थापिकादेखील आहे. तिने केवळ १५ हजार रुपयांचे कर्ज घेऊन एका खोलीतून या व्यवसायाला सुरुवात केली होती.
आता भावेश आणि नीता ९००० प्रकारच्या डिझाइन असलेल्या मेणबत्त्या रिलायन्स इंडस्ट्री, रॅनबॅक्सी, बिग बझार, नारोदा इंडस्ट्रीज यासारख्या कॉर्पोरेट्स आणि रोटरी क्लबसारख्या संस्थांना पुरवठा करतात. भावेश इंग्लंडहून वॅक्स मागवतो. त्यांच्या फॅक्टरीमध्ये दररोज २५ टन वॅक्स येते. कँडल बिझनेसमध्ये जम बसवल्यानंतर भावेश खेळाच्या मैदानात परतला. तो गोळापेक, थाळीफेक आणि भालाफेक या क्रीडा प्रकारांमध्ये पारंगत आहे. त्याने पॅरालिम्पिकमध्ये १०९ पदके जिंकली आहेत.
भावेश दररोज ५०० दंडबैठका लगावतो आणि आठ किलोमीटर धावतो. त्याने आपल्या फॅक्टरीमध्येच एक जीम तयार केले असून तिथे तो नियमितपणे जात असतो. धावण्याचा सराव करताना नीता नायलॉनच्या दोरीचे एक टोक व्हॅनला बांधते आणि दुसरे टोक भावेशच्या हातात देते. त्यानंतर भावेश ज्या वेगाने धावतो त्याच वेगाने ती व्हॅन चालवते. भावेश २०१६ मध्ये होणाऱ्या ब्राझील पॅरालिम्पिकची तयारी करत आहे. त्याच्या महत्त्वाकांक्षा खूप उंच आहेत. जगातील सर्वात उंच मेणबत्ती बनवण्याची त्याची इच्छा आहे. सध्या २१ मीटरचा विक्रम असून तो जर्मनीच्या नावावर आहे. त्याने विविध व्यक्तींचे मेणाचे पुतळेदेखील बनवले आहेत. त्यामध्ये
नरेंद्र मोदी,
अमिताभ बच्चन आणि सचिन तेंडुलकर यांचा समावेश आहे. त्याची २०१६ मधील पॅरालिम्पिक खेळांमध्ये देशासाठी सुवर्णपदक जिंकण्याची इच्छा आहे.
फंडा हा आहे की...
एक अंध व्यक्ती जग पाहू शकत नाही, पण त्याच्या कामावर जगाची नजर अवश्य पडेल. जग त्याला पाहील आणि त्याच्या कष्टाचा आदर करेल. कठोर परिश्रमाची ओळख व्हावी, हे शक्यच नाही.