पहिली कथा : समुद्राची पाणी पातळी वाढत चालल्याने ताज्या पाण्याचे स्रोत कमी होत आहेत. यामुळे अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्य भयंकर दुष्काळाच्या छायेत आहे. इतिहासामध्ये पहिल्यांदाच कॅलिफोर्नियातील एक महानगर प्रशांत महासागरातील पाण्याचा वापर दैनंदिन गरजांसाठी करण्याच्या तयारीत आहे. ते शहर आहे सॅन डियेगो काउंटी. येथे सुमारे ६३ अब्ज रुपयांमध्ये एक डीसॅलिनेशन प्लांट उभारला जात आहे. यामध्ये समुद्राच्या खाऱ्या पाण्याचे रूपांतर पिण्याच्या पाण्यामध्ये केले जाईल.
नोव्हेंबरपर्यंत हा प्लांट सुरू होण्याची अपेक्षा आहे. कॅलिफोर्नियातील शहरे पाणी टंचाईवर मात करण्यासाठी समुद्राच्या पाण्याचा वापर करण्यामध्ये सक्षम आहेत की नाही, हे या प्लांटच्या यशावर अवलंबून आहे. जे तंत्रज्ञान एकेकाळी महाग आणि पर्यावरणासाठी हानिकारक असल्यामुळे रद्द करण्यात आले होते, त्याचाच आता उपाय म्हणून अवलंब केला जात आहे. सातत्याने दुष्काळाचा सामना करणाऱ्या दाट लोकसंख्या असलेल्या टेक्सासनेदेखील अनेक सागरी डिसॅलिनेशन प्लांट उभारले आहेत.
फ्लोरिडामध्ये आधीपासूनच असाच एक प्लांट असून तिथे अशाच प्रकारच्या इतर प्लांटची स्थापना करण्याची मागणी होत आहे. कारण समुद्रातील पाण्याची पातळी वाढल्याने पाणीपुरवठ्यावर वेगाने परिणाम होत आहे. कॅलिफोर्नियातील काही गावांमध्ये सागरी पाण्याचे शुद्धीकरण करणारे छोटे प्लांट आहेत. हंटिगंटन बीचवर मोठा प्लांट उभारण्याची योजना असून याद्वारे दाट लोकसंख्या असलेल्या शहरांना पाणीपुरवठा करता येईल. लॉस एंजिलिस शहराच्या उत्तर-पश्चिमेत सांता बारबरामध्ये सुमारे २५ वर्षांपूर्वी एक डिसॅलिनेशन प्लांट उभारण्यात आला होता. चांगला पाऊस झाल्यानंतर तो बंद करण्यात आला.
दुसरी कथा : संपूर्ण जगात कोळ्याची समस्या आहे. मात्र, रशियातील काही भागात ही समस्या डोकेदुखी ठरत आहे. मॉस्को इंस्टिट्यूट ऑफ फिजिक्स अँड टेक्नॉलॉजीच्या संशोधकांना रेशीम विकसित करणारे कॉर्डिक टिश्यू मानवी हृदयातील टिश्यूप्रमाणे वागत असल्याचे आढळून आले. लवचिक आणि विषरहित असल्याने ते मानवी हृदयासाठी फायदेशीर असल्याचे त्यांनी सिद्ध केले आहे. कोळ्याच्या जाळ्यांची निर्मिती करणारे अानुवंशिक फायबर प्रोटीन स्पायड्रॉइन मानवी हृदयाचे टिश्यू बनवण्याचे चांगले साधन असल्याचे सिद्ध झाले आहे. लॅबोरेटरी ऑफ बायोफिजिक्स ऑफ एक्सायटेबल सिस्टिमचे प्रमुख प्रा. कोन्स्टाइन एग्लादेज यांच्या देखरेखीखाली संशोधक हृदय टिश्यूच्या इंजिनिअरिंगवर काम करत आहेत. त्यांनी पूर्णपणे क्रियाशील हृदय टिश्यूची निर्मिती यापूर्वीच केली आहे.
कोळ्याचे जाळे अत्यंत हलके असून ते दीर्घ काळ सक्रिय राहत असल्याचेही आढळून आले आहे. संशोधनानुसार ते स्टीलपेक्षा पाचपट मजबूत, नायलॉनपेक्षा दुप्पट लवचिक आणि
आपल्या लांबीपेक्षा तिप्पट दाब सहन करण्यास सक्षम आहेत. कोळ्याच्या जाळ्यांच्या टिश्यूचा मानवी हृदयामध्ये यशस्वी वापर केला जाऊ शकतो, असा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे.
तिसरी कथा : पुण्यातील हिंजेवडी पोलिस जागरूक आहेत, पण त्यांच्या सुरक्षेच्या उपायांची माहिती लोकांपर्यंत पोहोचू शकत नव्हती. कारण पोलिसांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या परंपरागत जाहिराती परिणामकारक नव्हत्या. परिसरातील ९९ टक्के लोक आयटी सॅव्ही आहेत, पण पोलिस कॉम्प्युटर सॅव्हीदेखील नाहीत. पोलिस नागरिकांमधील या दरीमुळे गुन्ह्यांची संख्या वाढली. ही दरी कमी करण्यासाठी पोलिसांनी आयटीचीच मदत घेतली. पोलिसांनी हिंजेवडी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी एक
फेसबुक पेज तयार केले. अधिकाऱ्यांनी या पेजवर चोरीच्या ताज्या घटनांबाबत माहिती पोस्ट करण्यास सुरुवात केली. तसेच आपल्या आसपास होणाऱ्या कोणत्याही संशयास्पद हालचालींची माहिती देण्याचे आवाहन केले, जेणेकरून सुरक्षेच्या दृष्टीने कारवाई करता येईल. ‘क्राइम प्रिव्हेंशन अवेअरनेस’ नावाच्या या पेजवर सुरुवातीलाच ९९ लोक ऑनलाइन होते. आयटी पार्कच्या आसपास गुन्ह्यांची संख्या कमी करण्यासाठी पोलिस या पेजवर सुरक्षेच्या टिप्सही देत आहेत.
फंडा हा आहे की...
समस्या आयुष्याचा भाग आहेत, पण प्रत्येक समस्येचे उपायामध्ये रूपांतर करण्याची अपेक्षा एका समजूतदार माणसाकडून केली जाते.