आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा - पडद्यावरील जीवनाचे खऱ्या आयुष्यात रूपांतर व्हावे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तो मेगा फोन उचलतो आणि आपल्या कर्मचाऱ्यांना म्हणतो की, जर तुमचा जाती आणि धर्मावर विश्वास असेल तर कामावर येण्याची गरज नाही. त्यानंतर तो अत्यंत राजकीय अंदाजात पुन्हा म्हणतो की, ज्यांचा जाती-धर्मावर विश्वास आहे त्यांनी कामावर यावे, असे मला वाटत नाही. त्याऐवजी ज्यांच्या रक्तात भारतीयता वाहत आहे, त्यांनीच कामावर यावे. तसेच जे स्वत:ला आधी भारतीय मानतात, त्यांनी कामावर यावे. मी यानंतरचे दृश्य पाहू शकलो नाही. कारण लोक उभे राहिले आणि टाळ्या वाजवायला लागले.
जेव्हा ६४ वर्षीय रजनीकांत यांनी पडद्यावर हा डायलॉग म्हटला होता, त्या वेळी काय झाले होते, हे मला नंतर सांगण्यात आले. जेव्हा ते बोलतात तेव्हा, चित्रपटगृहातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये त्यांचे चाहते असेच आनंदाने नाचतात. रजनीकांत, सोनाक्षी सिन्हा आणि अनुष्का शेट्टी अभिनीत चित्रपट ‘लिंगा’मधून पुन्हा एकदा प्रमाणित झाले आहे की, चित्रपटसृष्टीचा राजा (रजनीकांत) परत आपल्या सिंहासनावर आला आहे. तथापि, २०११ मध्ये ते आजारी असताना त्यांचे चाहते अत्यंत निराश झाले होते. रजनीकांत यांची प्रसिद्धी सीमांमध्ये बांधली जाऊ शकत नाही. त्यांच्या चित्रपटांसाठी लोकांमध्ये जो वेडेपणा दिसतो, तो कोणत्याही सिनेताऱ्यासाठी त्याने कितीही पैसा चित्रपटासाठी लावला तरी दिसत नाही.
हॉलीवूडची ट्रॅकिंग एजंसी रेनट्रॅकच्या मते, रजनीकांत यांच्या वाढदिवसानिमित्त १२ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या ‘लिंगा’ने अमेरिकन बॉक्स ऑफिसवर ‘हंगर गेम्स-२’लाही मागे टाकले आहे. ‘हंगर गेम्स’ १५८३ स्क्रीनवर झळकला होता. या चित्रपटाने पहिल्या दिवशी सर्व स्क्रीन मिळून १.१९ कोटी रुपयांची कमाई केली. तथापि, ‘लिंगा’ने ९१ स्क्रीन मिळून १.२९ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. दुसरीकडे हजारो मैल दूर गुवाहाटीजवळील बाम गावातील विश्वनाथ चरियाली सब-डिव्हिजनल कोर्टामध्ये प्रॅक्टिस करणारे ६४ वर्षीय वकील कुमूद बरुआ यांनी केलेले कार्य त्यांच्या सीमांच्याही पुढचे होते. त्यांनी विश्वनाथ चरियालीमध्ये गेल्या दोन वर्षात शेकडो वृक्षांची लागवड केली. मात्र, त्यांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचले नाही.
बरुआ फार पूर्वीपासून वृक्ष आणि स्वच्छ निसर्गावर प्रेम करत आले आहेत. जेव्हा कोणीच स्वच्छ भारत किंवा सेउज आसाम (ग्रीन आसाम) अभियानाचे नावही ऐकले नव्हते, तेव्हापासून त्यांनी स्वच्छता अभियान राबवण्यास सुरुवात केली होती. त्यांनी आतापर्यंत सुमारे ५५० झाडे लावली आहेत. ते दररोज न्यायालयाला जाण्यापूर्वी हातात झाडू घेऊन गावाची स्वच्छता करतात. विश्वनाथ चरियालीमध्ये आपल्या घरापासून २० किलोमीटरच्या परिघातील प्रत्येक रस्ता त्यांनी झाडून काढला आहे. वृक्षारोपणाशिवाय ते प्रत्येक वृक्षाच्या सुरक्षेसाठी त्याच्या चहुबाजूंनी तारेचे कुंपण करतात. गेल्या १८ महिन्यांमध्ये ते सातत्याने झाडांना पाणी देत आहेत. झाडे जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी आतापर्यंत तीन लाख रुपये खर्च केले आहेत. आपल्या मोहिमेचे महत्त्व एकेदिवशी लोकांना नक्की पटेल, सर्वजण एकत्र येतील आणि हे अभियान पुढेही असेच चालवतील, असा आत्मविश्वास कुमूद यांना आहे. रस्त्याची सफाई करताना आपण कोणत्या जाती-धर्माचे आहोत, याकडे ते लक्ष देत नाहीत. ते फक्त काम करत राहतात. तथापि, समाजातील काही लोक त्यांचा विरोधही करतात. त्यांची मदत करण्याऐवजी त्यांना टोमणे मारत राहतात. तथापि, रजनीकांत आपल्या चित्रपटातील संवादाच्या माध्यमातून लोकांना जे सांगत आहेत, तेच कुमूद खऱ्या आयुष्यात अभियानाच्या माध्यमातून सांगत आहेत.
फंडा हा आहे की...
चित्रपटांपासून तुम्ही प्रेरित व्हाल तर ठीक आहे, परंतु ज्याप्रमाणे रजनीकांत आपल्या प्रशंसेची वाट पाहतात, त्याप्रमाणे कुमूद बरुआ राबवत असलेल्या मोहिमेसाठीही लोकांना प्रेरित करण्याची आता वेळ आली आहे. कारण काळ खूप वेगाने पुढे जात आहे.