आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मॅनेजमेंट फंडा - मिशन पॉसिबल : व्हरायटी द्या आणि सर्वांना घेऊन चला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विविधता : जयपूर येथे नुकताच लिटरेचर फेस्टिव्हल पार पडला. काही वर्षांपूर्वी या फेस्टिव्हलमध्ये फक्त १४ लोक होते. मात्र, या वर्षी यामध्ये सहभाग घेणाऱ्यांची संख्या २.५ लाखांपर्यंत झाली. कारण या महोत्सवाने लोकांना विविधता दिली. एका ओळीत सांगायचे झाल्यास वेगवेगळी पार्श्वभूमी असणाऱ्या लोकांना ‘रेस्टॉरंट थाळी’प्रमाणे त्यांचे आवडते कार्यक्रम किंवा वस्तूंची निवड करण्याचे स्वातंत्र्य दिले.
प्रत्येक सरत्या वर्षासोबत लोक येथे फक्त साहित्य आणि लेखकांसाठीच येत नाहीत, तर ते खाण्यासाठी, खरेदी करण्यासाठी, कलेसाठी; एवढेच नाही तर तिकीट खरेदी करून संगीत रजनीचा आस्वाद घेण्यासाठी आणि साहजिकच पुस्तके लिखाणावर चर्चा करण्यासाठी येतात.
विशेष म्हणजे या अडीच लाख लोकांपैकी एकानेही या पाचदिवसीय महोत्सवाबाबत कोणतीच तक्रार केली नाही. या वेळी संगीत रजनी कार्यक्रम हवा महाल आणि आमेर येथे घेण्यात आला होता, जेणेकरून दरवर्षी वाढणाऱ्या लोकांसाठी चांगल्या सुविधा देता येतील. या महोत्सवामध्ये हॉर्वर्ड बिझनेस स्कूलने रस दाखवला. विप्रोसारख्या कॉर्पोरेट कंपन्या अशा मोठ्या आयोजनांमध्ये संवाद कला शिकण्यासाठी आपले एक्झिक्युटिव्हदेखील पाठवत आहेत. या महोत्सवापूर्वी मी चेन्नई येथे ‘झी’चे मालक सुभाष चंद्रा यांची एका लग्नसमारंभात भेत घेतली होती. ते म्हणाले होते की, ‘हा केवळ साहित्याचा महोत्सव नाही, तर हे वैश्विक संमेलन आहे.’

सर्वांना सोबत घेऊन चला : २००६ मध्ये झालेल्या वाघांच्या गणनेतून त्यांची संख्या खूप कमी असल्याचे सिद्ध झाले. त्याच वर्षी सुप्रीम कोर्टाने गोवा मायनिंग प्रकरणात राष्ट्रीय उद्यान आणि अभयारण्यांच्या एक किलोमीटर वर्तुळामध्ये खोदकाम करण्यावर बंदी घातली. वाघ संरक्षकांना वाटले की, हा महत्त्वाचा निर्णय आहे. तरीही वाघांची संख्या वाढली नाही. मग जनजागृती अभियान राबवले.
केंद्र सरकारने कृती आराखडा तयार केला. परिणामी, वाघांची संख्या ३० टक्क्यांनी वाढल्याचे वृत्त २० जानेवारी २०१५ रोजी प्रसिद्ध करण्यात आले. २०११ मध्ये १७०६ वाघ होते, २०१४ मध्ये ही संख्या २२२६ एवढी झाली. स्थानिक लोकांना जोडणे, हा सर्वात महत्त्वाचा कृती आराखडा होता. वन अधिकाऱ्यांनी सरकार आणि एनजीओ यांच्यामध्ये अनौपचारिक पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून वाघ संरक्षणाच्या या मोहिमेशी स्थानिक लोकांना जोडण्यास सुरुवात केली.

स्थानिक आदिवासी समुदायातील युवकांना पर्यटकांचे गाइड म्हणून प्रशिक्षण दिले. त्यांना पक्षी आणि प्राण्यांच्या अनेक प्रजाती ओळखण्याची कला शिकवली. तसेच सहजपणे आपले काम करता येण्यासाठी त्यांना कामापुरती इंग्रजी भाषादेखील शिकवली. वने आणि वन्यजीवांचे संरक्षण कसे केले जाते, याचेही प्रशिक्षण देण्यात आले. वने आणि वन्यजीवांचे संरक्षण करणे त्यांच्यासाठी किती फायद्याचे आहे, हेदेखील समजावून सांगितले. अखेर महत्प्रयासानंतर बदल घडून आला. देशातील ७० राष्ट्रीय उद्यान आणि अभयारण्यांमध्ये वाघांची संख्या वाढायला लागली.
फंडा हा आहे की...
कोणतेही मिशन अशक्य नाही. फक्त एवढे करा, शेवटच्या माणसालासुद्धा विविधता द्या आणि त्याच्याशी संबंधित प्रत्येक गोष्ट आपल्या अभियानाशी जोडा.