आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विडंबन -\' राजा विक्रम आणि म्हातारी \'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाघाप्रमाणे दमदार पावले टाकत राजा विक्रम पुन्हा एकदा जंगलातून काटेकुटे तुडवीत वाटचाल करू लागला। का घडले असावे ? कुठे चुकले असावे ? टाइमिंग जमले नाही का ? कुठे कमी पडलो आपण असे एक ना अनेक प्रश्न मनात रुंजी घालत होते। हतातली तलवार तर कधीच म्यान करून ठेवली होती। मित्रांनीच एवढा मोठा दगा फटका केला होता की आता वेताळाची सुद्धा भीती वाटेनाशी झाली होती। आला तर आला वेताळ , काय होईल फार तर ?टाइम पास होईल त्याच्या बुड न शेंडा असलेल्या प्रश्नांची उत्तरे देवून। तसाही आता आपल्याकडे भरपूर वेळ आहे , मग धास्ती तरी कशाची घ्यायची ? राज्यभिषेकाची वेळ ही निघून गेली आहे , हाता तोंडाशी आलेला घास असा अचानक हातातून पडला आणि उपाशी राहण्याची वेळ आली , वाघाचे काळीज असून , शिकार करण्याची कला असूनही अशी उपाशी राहण्याची वेळ आली , असा विचार मनात येताच राजा मनाशीच हसला आणि पुढे चालु लागला। एवढ्यात शेजारच्या झाडावरून लोम्बकळत वेताळ गड़गड़ाटी हास्य करीत खाली आला आणि रीतिरिवाजानुसार राजाच्या खांद्यावर येवून बसला। राजा ही कसेनुसे हसला आणि आता वेताळ नेहमीचेच डॉयलॉग बोलणार एवढ्यात राजा विक्रमाने चपळाईने वेताळाला गप्प बसण्याची खुण केली व स्वतः बोलू लागला।
' वेताळा , आधीच माझ्या परममित्रांच्या विचित्र आणि धक्कादायक वागण्याने डोक्याची शंभर शकले झालीच आहेत , त्यात तू तुझे अति फ़ालतू आणि पठडीतले प्रश्न विचारुन आणखीनच खोपड़ी फिरवू नकोस बाबा।
कारे राजा , असे का म्हणतोस ? आपण आपली परंपरा , जुनी परंपरा मोडायची का ? '
' हो ! परंपरा मोडण्याचेच दिवस आहेत हे , अरे पंचवीस वर्षांची परंपरा मोडून काढली आमच्या मित्रांनी , अन तू तुझ्या प्रश्न विचारण्याच्या परंपरेला घेवून बसला आहेस वेताळा ?
हूं ! फारच दुखावलेला दिसतो आहेस तु हं …………
होरे वेताळा ! पण आज आपणही परंपरा मोडून प्रश्न मी विचारणार आणि उत्तरे तु देणार आहेस।
खरच फारच दुखावलेला दिसतो आहेस हं तू राजा ?
होय रे वेताळा ! पण तु आज कुठलाही प्रश्न विचारणार नाहीस , तु फ़क्त उत्तरे द्यायची। काय ?
विचार राजा , काय विचारायचे आहे ते विचार।
असे का घडले असावे वेताळा ? अरे , पंचवीस वर्ष मैत्री टिकवली , तेहि वाईट दिवसात साथ निभावली। अन मित्राची थोडीशी ताकद वाढताच आम्हाला साफ़ विसरले। ' दोस्त दोस्त ना रहा , प्यार प्यार ना राहा , ए जिंदगी हमें तेरा , एतबार ना राहा , एतबार ना राहा '
'उगी राजा उगी , 'संग' तो नाही आता ' गम ' करू नकोस।
ते जाऊ दे , विषय भरकटवू नकोस , आणि माझा प्रश्नाचे उत्तर दे , नाही तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्या पायावर लोळायला लागतील। आणि आपले नाव इतिहासात अजरामर होईल , परंपरा बदलली म्हणून।
राजा विक्रमा ! धीर धर , तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी देणार , तुझ्याशी सवाल जवाब करून मी तुझ्या एवढाच हुशार झालो आहे हं। तेव्हा क्षणभर धीर धर विक्रमा !
मतदानाचे निकाल लागल्यापासून धीरच तर धरतो आहे वेताळा। पटकन सांग आता , वेळ दवडू नकोस आमच्या कृतघ्न मित्रांसारखा।
राजा विक्रमा ! तु लहानपणी आजोबांकडून म्हातारी अन वाघाची गोष्ट ऐकली आहेस का ?
कुठली ? चल रे भोपळ्या टुणुक टुणुक ची ?
बरोब्बर ………… !
त्याचे काय आता ?
गोष्टीत ' म्हातारी ' लेकीकडे जायला निघते , जंगलातून जाताना वाटेत तीला कोल्हा भेटतो , लांडगा आडवा येतो , आणि शेवटी वाघ ही वाट अडवतो , सर्वच तिला खाऊन टाकण्याची भाषा करतात। तेव्हा ती म्हातारी काय कारण पुढे करते ठावुक आहे ना ?
हो वेताळा ! म्हातारी म्हणते ' थांबा , लेकीकडे जाईल , तूप - रोटी खाईल , लठ्ठ होईल , मग तू मला खा।
अरे वा ! तुला तर पूर्ण गोष्ट आठवते राजा विक्रमा।
हो ! आजोबा खुप गोष्टी सांगायचे रोज झोपण्याआधी।
बर बर ! तर म्हातारी आपल्या अक्कल हुशारीने दर वेळेला वाचते आणि वाटचाल करते। होना ?
हो , पण वेताळा तू मला हे का सांगतो आहेस ? तू आजोबा आहेस होय माझा ?
विक्रमा , अरे तुझे ही त्या जंगलातील वाघासारखेच झाले आहे रे। जेव्हा जेव्हा तुला चान्स होता , तेव्हा तेव्हा त्या म्हातारीने तुला उल्लू बनवले आणि पसार झाली , आणि तू उपाशीच राहिलास।
अरे देवा ! असे झाले होय।
अरे देवा काय ? तू वाघासारखा असून तू माणुसकी दाखवली आणि म्हातारी ही मनुष्य असून सुद्धा ' वाघुस्की ' दाखवली। आता बस हात चोळत आय मीन पंजे चोळत। आता म्हातारी लट्ठ गुट्ठ् झाली आणि तुला वाकुल्या दाखवते आहे , समजले , आयमीन राजा विक्रमा ?
अरे देवा !
राजा , बालपणी तु फ़क्त ऐकायचे काम केलेस पण व्यावहारिक जीवनात उपयोग करून घ्यायला विसरलास , अन त्यामुळेच तुझी आज ही अवस्था झाली आहे।
म्हणजे ? वेताळा तुला असे म्हणायचे आहे का की म्हातारीला वाघाने तेव्हाच खाऊन टाकायला हवे होते ?
ते मी कसे सांगू ? पण एक नक्की वाघासारखे नुसतेच शुर असुन चालत नाही तर व्यावहारिक चतुरपणा ही आवश्यक आहे , टाइमिंग साधने आवश्यक आहे। आज तुला सत्तेच्या जवळ पोहोचुन सुद्धा रानावनात वनवासाला निघाल्याप्रमाणे फिरावे लागत आहे।
वेताळा ! आता तूच मार्गदर्शन कर की पुढे मी काय करावे ?
बालपणी जातक कथा वाचल्या त्याची पुनः उजळणी कर , मार्ग सापडेल। विचार कर तु वाघ असून उपाशीच राहिलास , अन म्हातारी ने तुला उल्लू बनवले आणि स्वतः लट्ठ मुट्ठ झाली। तु बसलास तिच्याकडे बघून जिभल्या चाटत।
पण म्हातारी कधी न कधी तर भेटेल वेताळा ?
तू बस वाट बघत , अरे म्हातारीने तुला शेंडी लावली हे तुला अजूनही कळत नाहिये , केवढी मोठी ही हैडलाइन आहे न्यूज़ चैनल वाल्यांसाठी।
वेताळा , तु मस्करी करतो आहेस माझी ?
विक्रमा अवघा महाराष्ट्र तुझी मस्करी करतो आहे रे। टाइमिंग ला महत्व आहे , गेलेला क्षण येत नाही। आता भिंतीवर पंजे मारत बस मांजरी सारखे।
वेताळा , आपली मर्यादा ओलांडू नकोस। मला राग आला तर तुझ्या कवटीची शंभर शकले करेन मी।
हे बरोबर नाही हं राजा विक्रमा ! एक तर तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी दिली आहेत , तुझ्या मेंदूचा भुगा झालाच आहे विचार करून। तु तुझ्या डोक्याचा विचार कर माझ्या कवटीची शंभर शकले करण्या पेक्षा। सावधान विक्रमा सावधान ! हाहाहाहा ………। वेताळ खोखो हसायला सुरुवात करतो आणि राजा विक्रमाच्या खांद्यावरून टुनकण उडी घेवून झाडावर लोम्बकळु लागतो।