आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्राचा जवान इस्रायलमध्ये शहीद, गान याव्नेमध्ये लष्करी इतमामात शेवटचा निरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गाझा/ जेरुसलेम - गाझापट्टीजवळ हमासने केलेल्या हल्ल्यात एका महाराष्ट्रीय वंशाच्या जवानाला आपला जीव गमवावा लागला. या 27 वर्षीय जवानाचे नाव बराक रफाल डेगोरकर असे होते. डेगोरकर हे इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्षात प्राणाची आहुती देणारे पहिलेच भारतवंशीय होत.
रविवारी गान याव्नेमध्ये हजारो लोकांनी त्यांना राजकीय आणि लष्करी सन्मानासह शेवटचा निरोप दिला. डेगोरकर हे इंजिनिअर कोअरच्या राखीव दलात तैनात होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी कायद्याची पदवी संपादन केली होती. अनेक वर्षांपूर्वी त्यांचे कुटुंब इस्रायलमध्ये स्थलांतरित झाले होते आणि ते ज्यू समुदायाशी जोडले गेले. इस्रायलमध्ये भारतवंशीय ज्यूंची संख्या सर्वाधिक आहे.

इस्रायलविरोधी अटकेत : फ्रान्सच्या दक्षिणेतील शहर मार्सेलमध्ये इस्रायल आणि पॅलेस्टाइन सर्मथक गटांनी वेगवेगळी निदर्शने करत मोर्चा काढला. सुमारे दोन हजार इस्रायली सर्मथकांनी हातात फ्रान्स आणि इस्रायलचे झेंडे घेऊन हा मोर्चा काढला होता. दरम्यान, पॅलेस्टाइन सर्मथकांनी इस्रायलविरोधी घोषणाबाजी केली. पोलिसांनी निदर्शकांना अडवण्याचा प्रय} केला मात्र, ते आपल्या भूमिकेवर ठाम होते. या दरम्यान, पोलिस आणि त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यात 70 लोकांना ताब्यात घेण्यात आले. इस्रायलविरोधात निदर्शनावर फ्रान्समध्ये बंदी आहे.
ऐंशी हजार भारतवंशीय कुटुंबे : इस्रायलमध्ये सुमारे 80 हजार भारतवंशीय कुटुंबे राहतात. डेगोरकर यांची आई ओरा, वडील मोशे आणि दोन लहान भाऊ येथेच राहतात. दोन्ही भाऊ गाझा सीमेवर राखीव सैन्यदलात कार्यरत आहेत.
ईदमुळे 24 तासांची युद्धबंदी लागू
रमजान ईदच्या मुहूर्तावर नागरिकांना खाद्यपदार्थ खरेदी करण्यासाठी हमासने 24 तासांची युद्धबंदी मान्य केली आहे. संयुक्त राष्ट्राने केलेल्या विनंतीवरून इस्रायली लष्कर आधीच राजी झाले होते. मात्र, हमासने यास नकार दिला होता. या संघर्षात आतापर्यंत 1 हजार 60 पॅलेस्टिनी आणि 46 इस्रायली मारले गेले.
तोफ पडल्याचे इस्रायलकडून मान्य
गाझामधील संयुक्त राष्ट्राच्या एका शाळेवर आपल्या सैन्याने डागलेली तोफ पडल्याचे इस्रायलने मान्य केले आहे. तोफ पडली त्या वेळी शाळा पूर्ण रिकामी होती. त्यामुळे कोणत्याही प्रकारची प्राणहानी झाली नाही. या शाळेचा वापर हमास शस्त्रास्त्रे ठेवण्यासाठी करत होती, असे इस्रायल लष्कराच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.

(छायाचित्र : बराक रफालच्या अंत्यविधीवेळी त्याची आई ओरा व कुटुंबीयांना शोक अनावर झाला.)