आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 11 Thousand Citizens Killed In Syria, Western Media Disclosed

सिरियामध्ये 11 हजार नागरिकांची छळ करून हत्या, पाश्चात्त्य मीडियातून गौप्यस्फोट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दमास्कस - सिरियातील सत्ताधारी आणि बंडखोर यांच्यातील संघर्षात धरपकड करण्यात आलेल्या सुमारे 11 हजार नागरिकांचा अनन्वित छळ झाला. एवढेच नाही, तर छळ करून त्यांना ठार करण्यात आले, असा दावा पाश्चात्त्य वृत्तपत्रांनी केला आहे. यातून सिरियाचा भयानक चेहरा जगासमोर आला आहे. त्यामुळे शांती चर्चेच्या पाश्र्वभूमीवर आंतरराष्ट्रीय समुदायात खळबळ उडाली आहे.
सिरियातील सरकारने युद्धकैद्यांच्या नावाखाली आपल्याच नागरिकांचा नियोजनपूर्वक प्रचंड छळ केला. त्याची असंख्य छायाचित्रे उजेडात आली आहेत. छायाचित्रांचे विश्लेषण करण्यात आल्यानंतर हा दावा करण्यात आला आहे. ब्रिटनच्या ‘गार्डियन’ आणि ‘सीएनएन’ने हा दावा करून गौप्यस्फोट केला आहे. एका अहवालावर आधारित हा वृत्तांत प्रकाशित करण्यात आला आहे. त्यात सिरियातील आजवरच्या हिंसाचाराची सविस्तर माहिती आहे. एकीकडे सिरियातील हिंसाचार आणि सरकार-बंडखोर यांच्यातील संघर्ष थांबावा म्हणून स्वित्झर्लंडमध्ये बुधवारपासून दोनदिवसीय बैठकीला सुरुवात होणार आहे. त्यात बंडखोरांच्या प्रतिनिधींनी सहभागी होऊन वाटाघाटी कराव्यात यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाकडून दबाव वाढत असतानाच बैठकीच्या एक दिवस अगोदर हा अहवाल जाहीर झाल्याने खळबळ उडाली आहे. दुसरीकडे इराणला बैठकीचे आवतण मंगळवारी मागे घेण्यात आले. इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांशी दीर्घ चर्चेनंतर सिरियाप्रश्नी होणा-या शांतता चर्चेत सहभागी होण्यासाठी संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून यांनी इराणला निमंत्रण दिले होते. त्याला अमेरिका आणि सिरियातील बंडखोर गटाने विरोध दश्रवला होता. त्यामुळे संयुक्त राष्ट्राकडून या निर्णयावर माघार घेण्यात आली.
दररोज 50 मृतदेह
सरकारच्या छळ छावण्यांमध्ये किमान 50 जणांना ठार करण्यात येते, अशी माहिती फोटोतून उजेडात आली आहे. पोलिस फोटोग्राफर्सनी त्यांची छायाचित्रे घेतली. 2011 ते 2012 डिसेंबरपर्यंतच्या हिंसाचाराची फोटोच्या साह्याने सविस्तर माहिती अहवालात देण्यात आली आहे.
सत्य बाहेर कसे?
ह्यूमन राइट्स वॉच संस्थेच्या निरीक्षकांनी सिरिया सरकारच्या काही इमारतींचा अभ्यास केला. त्यासाठी हजारो छायाचित्रांची जमवाजमव करण्यात आली. त्या सर्व छायाचित्रांचे बारकाईने निरीक्षण केल्यानंतर सरकारची तपास केंद्रे म्हणजे छळ छावण्या असल्याचे पुढे आले. त्याचबरोबर ताब्यात घेण्यात आलेल्या आंदोलकांना नंतर कशा प्रकारे ठार केले गेले, याची धक्कादायक माहितीदेखील त्यातून चव्हाट्यावर आली आहे. अहवाल तयार करण्यासाठी निवृत्त युद्ध गुन्हेविषयक सरकारी वकिलाची मदत घेण्यात आली. त्यासाठी पोलिस फोटोग्राफर्सकडून 55 हजार फोटो मिळवण्यात आले. त्यात 11 हजार युद्धकैद्यांची माहिती मिळाली.
प्रयोगशाळेचाही दाखला : मानवी हक्क संस्थेने हेरगिरी करून मिळवलेल्या छायाचित्रांची सत्यता पडताळण्यासाठी फॉरेन्सिक पॅथॉलॉजिस्ट स्टुअर्ट हॅमिल्टन यांचीही मदत घेण्यात आली. त्यांनी प्रतिमांचा सखोल अभ्यास केला. ताब्यात घेण्यात आलेल्या लोकांचा भयंकर छळ केला जात असल्याचे स्पष्ट झाले, असे ‘बीबीसी’च्या वृत्तात म्हटले आहे.
जीनिव्हा-2’ मध्ये काय घडणार? : स्वित्झर्लंडमध्ये सिरियातील पेच सोडवण्यासाठी बुधवारपासून सुरू होणा-या बैठकीला जीनिव्हा-2 असे म्हटले जाते. बैठकीत या अहवालानंतर आंतरराष्ट्रीय समुदाय काय भूमिका घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
01 लाख नागरिकांचा आतापर्यंतच्या हिंसाचारात मृत्यू
34 महिन्यांपासून (तीन वर्षे) हिंसाचार
नेमका कोणाचा अहवाल?
ह्यूमन राइट्स वॉच या संस्थेच्या वतीने मंगळवारी वार्षिक अहवाल जाहीर करण्यात आला. सीएनएन वृत्तवाहिनी व गार्डियन दैनिकांनी हा अहवाल प्रसिद्ध केला.
सरकारच्या विरोधात ठोस पुरावा
सरकारने नागरिकांची हत्या केली आहे. त्यांचा हिंसाचाराला पाठिंबा आहे. फोटोमधून मिळालेली माहितीही त्याचाच पुरावा आहे. सरकारच्या विरोधातील हा प्रबळ पुरावा ठरतो.
-प्रोफेसर सर गिओफ्री नाइस, अहवालाचे एक लेखक.